‘घरकुला’चे ‘अमेय’ स्तंभ...
महा एमटीबी   23-Nov-2018


 


डोंबिवलीपासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या खोणी या गावात मतिमंद मुलांचे ‘घरकुल’ वसतिगृह सुरु करणाऱ्या अविनाश बर्वे आणि कुटुंबीयांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

कुठल्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक व्यंग असलेले अपत्य आपल्या पोटी जन्माला येऊ नये, असे पालकांना वाटणे अगदी स्वाभाविक. पण, दैवकृपेपुढे आपले काहीएक चालत नाही. अशावेळी या दिव्यांग मुलांना घरातून वेगळी वागणूक दिली जाते, समाजाचा त्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. काही पालक अशा दिव्यांग अपत्यांना स्वीकारुन त्यांचा आयुष्यभर सांभाळही करतात, तर काही पालक अशा शारीरिक-मानसिक विकलांग अपत्यांना थेट दिव्यांगाच्या वसतिगृहांत, आश्रमांत पाठवून जबाबदारीतून मुक्त होतात. पण या मुलांचा सांभाळ करण्यासाठी जशी तारेवरची कसरत त्यांच्या पालकांना करावी लागते, त्याहूनही अधिक परिश्रम या दिव्यांगाना सांभाळणाऱ्या सेवाभावी संस्थांना करावे लागतात. या विशेष मुलांसाठी काहीतरी करावं, या उद्देशाने समाजातही अनेक संस्था कार्यरत आहेत. असेच एक मतिमंद मुलांचे ‘घरकुल’ उभारणारे अविनाश बर्वे...

 

डोंबिवलीपासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या खोणी या गावात मतिमंद मुलांचे ‘घरकुल’ हे वसतिगृह बर्वे कुटुंबीयांनी उभ्या केलेल्या अमेय पालक संघटनेने सुरू केले. ‘घरकुल’ सुरू करण्यामागे कारणही तसेच होते. अविनाश बर्वे यांच्या पत्नी नंदिनी यांच्या पोटी मतिमंद मुलाने जन्म घेतला. आपला मुलगा सर्वसामान्य नाही, हे नंदिनी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांच्या तपासणीत मुलगा कर्णबधिर असल्याचे निदान झाले. मात्र, काही कालावधीनंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, आपला मुलगा मतिमंद आहे. आपले मूल मानसिकदृष्ट्या अधू आहे, हे कळल्यापासून आईवडिलांची जशी अग्निपरीक्षा सुरू होते, तशीच ती बर्वे कुटुंबीयांचीही सुरू झाली. मात्र, बर्वे कुटुंबीयांनी आहे ते सत्य स्वीकारत आपल्या मुलाचा सांभाळ करण्याचे ठरवले. आपल्या मुलाला नंतर त्यांनी मेजर ग. कृ. काळे यांच्या ’अस्तित्व’ या संस्थेत प्रवेश मिळवून दिला. मात्र, आईवडिलांच्या पश्चात मतिमंद मुलांची त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत काळजी घेणारं कुणीतरी हवं, असं मेजर काळे यांनी बर्वे कुटुंबीयांच्या मनात रुजवलं. अशाप्रकारे मेजर काळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मतिमंद मुलांच्या या पालकांनी मतिमंदांचे ‘घरकुल’ साकारायचं ठरवलं. या सामायिक विचारांतून अमेय पालक संघटना जन्माला आली. आपल्या व इतरांच्या मतिमंद मुलांसाठी हक्काचा निवारा उभारण्याचा हा मोठा निर्णय घेऊन बर्वे दाम्पत्याने स्वत:ला या कामात झोकून घेतले. विशेष म्हणजे, सरकारी किंवा इतर कोणाचीही मदत न घेता, आपल्या मुलांसाठी आपण स्वखर्चातून निवारा उभा करायचे या पालकांनी ठरवले. यासाठी त्यांनी डोंबिवली सहकारी बँकेत एक खाते उघडून काही वर्षांसाठी एक ठराविक रक्कम गुंतवली. सहभागी पालकांना अमुक एका रकमेचे बंधन न घालता, सुरुवातीस दर महिन्याला जितकी जमेल तितकी रक्कम जमा करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर गुंतवलेली रक्कम व अजून काही रक्कम मिळून डोंबिवलीजवळील खोणी गावात सव्वा एकर जागा घेतली. येथेच ‘घरकुल’ वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. ‘घरकुल’ उभारण्यामागे सुधा काळे व त्यांचे पती कै. मेजर ग. कृ. काळे या सेवाभावी दाम्पत्याची प्रेरणा असल्याचे बर्वे कुटुंबीय आजही आवर्जून सांगतात.

 

या ‘घरकुल’मध्ये सध्या 20 ते 60 वयोगटातील 30 मतिमंद व्यक्ती गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांचं सुख-दुःख कळत नसलं तरी ते आनंदाने वाटून घेतात. या मुलांना आंघोळ घालण्यापासून ते जेवूखाऊ घालेपर्यंत अगदी सगळी कामं बर्वे कुटुंबीय व ‘घरकुला’तले कर्मचारी करतात. यासोबतच आपण इतरांपेक्षा वेगळे नाहीत, ही भावना या मतिमंदांच्या मनात येऊ नये, यासाठी ‘घरकुल’ कुटुंबीय क्षणोक्षणी प्रयत्नशील असते. एवढंच नाही तर सामान्य माणसासारखं आयुष्य या मतिमंदांना जगता यावं, यासाठी ‘घरकुल’चे सदस्य अहोरात्र झटत असतात. औपचारिक शिक्षणासारखा कोणताही ठराविक अभ्यासक्रम इथे नाही. खेळ, अभ्यास, चित्रकला, गायन, नाटक हा इथल्या दिनक्रमाचा भाग. विशेष म्हणजे, अमेय पालक संघटना आर्थिक मदतीसाठी कोणत्याही मोठ्या व्यक्तीसमोर पदर पसरवित नाही की कोणतीही सरकारी मदत घेत नाही. संस्थेतील या मुलांचा खर्च त्यांचे पालक उचलतात, तर उर्वरित खर्च संस्था उचलते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संस्थेचा आर्थिक खर्च कसा भागवला जातो? तर संस्थेच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून संस्थेसाठी आर्थिक मदत केली जाते. यावर संस्थेची आर्थिक गणिते ठरवली जातात.

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या संस्थेत कोणीही लहान नाही किंवा मोठं नाही, सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. या संस्थेचे काम अधिक बहरत जावो व संस्थेची पाळंमुळं अधिक घट्ट होवोत यासाठी घरकुलला व बर्वे कुटुंबीयांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/