पाकचे स्वप्नभंग
महा एमटीबी   21-Nov-2018

 


 
 
 
राजकीय अस्थिरता, आर्थिक कोंडी आणि दहशतवादी कुरघोड्या यामुळे चहूबाजूंनी स्वतःवर संकट ओढवल्यानंतरही भारताकडे सदैव अपेक्षेने पाहायची पाकची सवय काही केल्या जात नाही. पण, अनेक वेळा भारताची कशी कोंडी करता येईल, या नादात पाक स्वतःच खड्ड्यात जातो. त्यामुळे पाकिस्तान या देशाला जणू ही अपयशाची कीडच लागली आहे. त्यात आता ज्या अपेक्षेने ‘ते’ भारतीय क्रिकेट बोर्डाकडे पाहत होते, त्या त्यांच्या इराद्यालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लाथडले. त्यामुळे ‘ना घर का ना घाट का,’ अशी पाकिस्तानची परिस्थिती झाली आहे. मुळात भारत विरुद्ध मैदानावर किंवा मैदानाबाहेर विजय मिळवण्याची क्षमता नसताना, सतत सामने लढण्याची खुमखुमी असणाऱ्या पाकिस्तानचे कौतुक करायला हवे. त्यामुळे पाकिस्तान बोर्डाने बीसीसीआयवर ४४७ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा जो दावा केला होता, तो पूर्णत: फोल ठरला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००९ साली शेवटची मालिका झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ‘क्रिकेट’ या विषयावर अनेकवेळा चर्चा झाल्या, पण २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका खेळली गेली नाही. कारण, पाकसह मालिका खेळण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असते आणि पाक दौऱ्यासाठी सरकारची परवानगी मिळालेली नाही. याचा भारताला काहीही तोटा झाला नसला तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे खूप नुकसान झाले. याच धर्तीवर मग पीसीबीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिकेबाबतचे सहमती पत्र छापून घेतले. पण, भारताने ते मान्य न केल्याने बीसीसीआयने टाकलेला हा बाऊंसर काही पीसीबीला झेलता आला नाही आणि ते रडत गेले आयसीसीकडे. मात्र, आयसीसीच्या तक्रार निवारण समितीने बीसीसीआय विरुद्धचा पाकिस्तानचा आरोप फेटाळून लावला आणि याउपर हा निर्णय बंधनकारक राहणार असून याविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अपीलही करू शकणार नाही. त्यामुळे आता पीसीबीचे बीसीसीआयकडून ४४७ कोटी उकळण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. तरी आगामी टी-२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारतासमोर उभा राहणार आहे, त्यामुळे यावेळी तरी त्यांचे विजयाचे स्वप्न पूर्ण होईल का? हे १९ जून, २०१९ ला कळेलच...
 

क्रीडा क्षेत्रात ‘अच्छे दिन’

 

२०१८ या वर्षाच्या अंती भारतीय क्रीडा क्षेत्राला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले, हे काही नाकारता येत नाही. यावर्षी सर्वच खेळात भारत अगदी सगळ्या देशांवर भारी पडला. पण, तरीही ऑलिम्पिक असो किंवा आशियाई स्पर्धा, भारताला अजूनही पहिल्या पाच देशांमध्ये यायचा मान मिळाला नाही. यासाठीच २०२४ आणि २०२८ या ऑलिम्पिकच्या दृष्टीने पाऊल उचलणे महत्त्वाचे झाले आहे. त्याच दृष्टीने केंद्रीय क्रीडामंत्री आणि ऑलिम्पिक पदकविजेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमात गुणवान आणि कौशल्यवान अशा शालेय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची उपलब्धता सरकारकडून करून देण्यात येईल. पण, या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र दिसत असताना राज्यवर्धन यांनी स्वत: या उपक्रमाकडे जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली. या उपक्रमामुळे क्रीडा क्षेत्रात प्रगती तरी होईलच, तसेच अधिकाधिक मुलांना खेळांचे चांगले प्रशिक्षणही मिळेल. त्यामुळे २०२० साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ही परिस्थिती बदलण्याची शक्यता नक्कीच आहे. पण, याबरोबरच २०१६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत पदकतालिकेत ६७व्या क्रमांकावर होता. त्यामुळे २०२८ साली तरी भारत अव्वल असेल, असा विश्वास राज्यवर्धन यांनी व्यक्त केला. भारताच्या एकूण क्रीडा क्षेत्रातील प्रगतीकडे कितीही सकारात्मक दृष्टीने पाहिले तरी, खेळाडूंच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हा विषय टाळता येणे शक्य नाही. कारण, कोणत्याही खेळात खेळाडू जेवढा ‘फिट’ तेवढा तो मैदानावर ‘हिट’ असे म्हटले जाते, त्यामुळे केवळ ‘इनफॉर्म’ खेळाडूंकडे लक्ष देण्यापेक्षा ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून गावागावातून खेळाडू तयार करण्याचे लक्ष्य साधणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याकडून खेळाचे किती सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाचे प्रयत्न होऊ शकतात, यापेक्षा स्पर्धेत उतरण्यापूर्वी आम्ही किती पदके जिंकू याची कल्पना येणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ ‘अच्छे दिन’ आहेत म्हणून त्यात रमून जाण्यापेक्षा ते कसे टिकून राहतील, याकडे खरे तर लक्ष द्यायला हवे. बाकी २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत भारत निदान पहिल्या १० देशांमध्ये असेल, यात काही शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/