त्रिगुण त्रिपुरीं वेढीला...
महा एमटीबी   21-Nov-2018

 


 
 
 
आज त्रिपुरारी पौर्णिमा. या रात्री चंद्र तेजस्वी असतो. चंद्र मनाचा कारक आहे. मनावर सुपरिणाम करणारी ही पौर्णिमा असते. या पौर्णिमेला साधना अधिक फलदायी होते. दीपाद्वारे तेजाचे, आत्मज्योतीचे पूजन करून त्रिगुणाच्या अंध:कारातून बाहेर आणणारी त्रिपुरी पौर्णिमा आहे. सर्वत्र दीपोत्सव करून आत्मतेजाचा अलौकिक आनंद प्रदान करणारी ही पौर्णिमा!
 

पौर्णिमा अन्य दिवसांपेक्षा वेगळी असते. पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश अधिक असतो. चंद्राच्या प्रकाशाने अवनी सुंदर दिसते. इतर पौर्णिमांपेक्षा कार्तिक पौर्णिमा महत्त्वपूर्ण असते. या दिवशी शिवपूजन करून १०८ दीप लावतात. दीपांचे पूजन करून दीप अर्पण केले जातात. दीपपूजन म्हणजे तेजाचं पूजन! अंध:कार दूर सारून प्रकाश पसरविणारे दीप! हे दीप कशाचे प्रतीक आहेत? आत्मज्योत..आत्मतेजाचे प्रतीक आहेत. अज्ञानाचा अंधार दूर करणारे दीप आहेत. आत्मज्योतीचा प्रकाश अंतरात असतो. मायेच्या जाड आवरणामुळे तो प्रकाश, तेज दिसत नाही. त्यामुळे जीव सुखदु:खाच्या लाटांवर हेलकावे घेत राहतो. तीन गोष्टींनी युक्त असणारी ती त्रिपुरी पौर्णिमा!

 

तारकासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने त्याला वर दिले. त्यामुळे तो उन्मत्त झाला, फार माजला. अत्याचार, छळ करून त्याने त्रैलोक्यामध्ये हाहा:कार माजवला. इतकेच नाही तर विश्वकर्म्याकडून अंतराळात धातूची तीन अभेद्य शहरे बांधून घेतली. ही शहरे तारकासुराने तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन या तीन पुत्रांना देऊन त्यांना अधिपती केले. या सगळ्यांनी विश्वाचा खूप छळ केला. शेवटी सगळ्या देवांनी शंकराकडे जाऊन छळापासून सोडविण्याची विनंती केली. भक्तवत्सल असणाऱ्या शंकराने तारकासुराशी तीन दिवस युद्ध केले. त्याची तीनही नगरे उद्ध्वस्त केली. त्याचा वध केला. सगळीकडे आनंदोत्सव झाला. देवांनी तारकासुरापासून सुटका झाली म्हणून दिवाळी साजरी केली. या तिथीला ‘त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. याच तिथीला ‘देवदिवाळी’ असेही म्हणतात.

 

तारकासुराची कथा रूपकात्मक आहे. तीन अभेद्य शहरे म्हणजे सत्त्व, रज, तम होय. हे त्रिगुणच माणसाला आत्म्यापर्यंत जाऊ देत नाहीत. तीन पुत्रांना राज्य देऊन अधिपती केले म्हणजे काय केले? त्रिगुण म्हणजेच तीन पुत्र होत. त्या त्रिगुणांना अधिपती केल्यावर जीवाची प्रगती कशी होणार? सत्व, रज, तम हे त्रिगुणच आपल्या मनावर राज्य करणार! याचा प्रतिकार केला म्हणजे काय? तमोगुणापासून सुटका करून रजोगुण दूर सारला. सत्त्वगुणाच्या पलीकडे गेला. एक वेळ तमोगुण, रजोगुण नाहीसे करणे शक्य आहे, परंतु सत्त्वगुणाच्या पलीकडे जाणे अवघड आहे. त्रिगुण प्रबळ झाले की, जीवाची शिवत्वाकडे वाटचाल होणे शक्य नाही. जीव हा मूळचा शिव आहे. तो शुद्ध, स्वच्छ आहे. जेव्हा जीव जन्माला येतो ना तेव्हा तो आपले मूळ स्वरूप विसरून जातो. तो त्रिगुणाच्या आहारी जातो. त्रिगुण त्याच्या जीवनाचा ताबा घेतात.

 

नरदेहाचे सार्थक भगवंताची भक्ती करून मुक्तीपर्यंत जाण्यात आहे. मुक्ती केव्हा प्राप्त होते? जेव्हा जीव तिन्ही गुणांचा निरास करण्यात यशस्वी होतो ना तेव्हा मुक्ती मिळते. सकल सृष्टी त्रिगुणात्मक आहे. हे त्रिगुणच माणसाला खेळवतात. त्याला सतत त्रस्त करतात. त्रस्ततेमुळे मुक्तीचा अस्त होतो. जो सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण ओलांडून पुढे जातो ना तेव्हाच त्याची उन्नती होते. उन्नतीच्या प्रकाशमार्गावर आत्मतेजाचे दीप लावायचे. हे ज्यांना जमले ना ते संतत्वाला पोहोचले. सामान्य माणूस त्रिगुणातून निर्माण होणाऱ्या सहा रिपूंच्या आहारी जातो. षडरिपू घालवताना थकून जातो. एक गेल्यासारखा वाटला की, दुसरा हजर होतो.

 

त्रिपुरी पौर्णिमेला चंद्र तेजस्वी असतो. चंद्र मनाचा कारक आहे. मनावर सुपरिणाम करणारी ही पौर्णिमा असते. या पौर्णिमेला साधना अधिक फलदायी होते. दीपाद्वारे तेजाचे, आत्मज्योतीचे पूजन करून त्रिगुणाच्या अंध:कारातून बाहेर आणणारी त्रिपुरी पौर्णिमा आहे. सर्वत्र दीपोत्सव करून आत्मतेजाचा अलौकिक आनंद प्रदान करणारी ही पौर्णिमा! अंतर्बाह्य प्रकाशच प्रकाश पसरविणारी पौर्णिमा! प्रकाशाच्या पावन पर्वावर पौर्णिमा मनामनाला उजळून टाकते. प्रकाशवाटेवर घेऊन जाणारी पौर्णिमा! सामान्य माणसाला असामान्य अवस्थेपर्यंत पोहोचविणारी पौर्णिमा! संत ज्ञानेश्वर महाराजांनी सतराव्या अध्यायात म्हटले आहे.

 

त्रिगुण त्रिपुरीं वेढीला । जीवत्वदुर्गी आडिला।

तो आत्मशंभूने सोडविला। तुझिया स्मृती॥

 

त्रिगुण, त्रिपुर याने वेढलेला जीव अभेद्य दुर्गावर अडकून पडतो. तो आत्मरूपी शंभू सोडवितो. जीवाला आत्मरूपी शंभूच मानवयोनीत सोडवू शकतो. पाप-पुण्य समसमान झाली की, मनुष्यजन्म प्राप्त होतो. याच जन्मात... योनीमध्ये मानव आत्म्यापर्यंत जाऊन ‘ज्ञानाचा बोध’ करून घेऊ शकतो. स्वरूपाचं ज्ञान फक्त मानवयोनीमध्ये होऊ शकते. म्हणूनच माणसाने उपासना, साधना करून आत्मतेजापर्यंतचा तेजस्वी प्रवास वेगाने करावा. माणसाचे ‘स्वरूप’ कळून ते पचनी पाडले की, आचरणात येते. ‘मी’चे समर्पण केले की, जीव आत्मतेजाने तळपू लागतो. त्याचे अफाट तेज सर्वत्र पसरते. सर्वत्र प्रकाश पसरून सौंदर्य वृद्धिंगत होते. आत्मसौंदर्याची प्राप्ती ही अलौकिक प्राप्ती असावी. त्रिपुरी पौर्णिमेला चंद्राच्या शांत प्रकाशाच्या किरणांमध्ये आत्मतेजाच्या प्राप्तीकरिता पूरक, पोषक अशी शक्ती असते. आपण तिचा लाभ करून घेऊन अक्षय आनंदाची प्राप्ती करून घ्यायला हवी नं!

 

- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/