आम्ही जातो आमुच्या गावा : मराठी व्याकरणातून उलगडलेले ’मित्व’...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

राज्यनाट्य स्पर्धा समीक्षण

 
जळगाव,
प्रत्येक मनुष्य जन्माला एकटा येतो आणि येतांना तो निर्विकार असतो. त्याच्यासोबत त्याचे नाव नसते की पद, प्रतिष्ठा नसते. असते फक्त शरीर आणि बुद्धी.आणि जसजसा तो मोठा होतो,
 
बुद्धीच्या जोरावर उन्नत होऊन यशाची चव घेतो तसतशी त्याच्यामध्ये त्याच्याही नकळत त्याचा स्वतःचा ‘अहं’ वसू लागतो.त्याचा हा अहंकार त्याला त्याच्या मूळ स्वभावापासून दूर नेऊन स्वतःला गोंजारायला भाग पाडतो.
 
आय अ‍ॅम दि बेस्ट ही एकच भावना त्याच्या डोक्यात आणि हृदयात असते. मात्र या अहंकारामुळे मनुष्याचे काय नुकसान होते हे सांगणारी संहिता ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या संजय पवार लिखीत आणि किरण अडकमोल दिग्दर्शित नाटकाची होती.
 
का पासून खर्‍या अर्थाने राज्य नाट्य स्पर्धेला सूर गवसला असे म्हणायला हरकत नाही.आता येणार्‍या दिवसात ही स्पर्धा अधिक रंजक आणि उत्साहवर्धक होईल यात शंकाच नाही.जळगावातील स्थानिक संस्थांची नाटके सुरु झाली म्हणजे रसिकांची गर्दी अमाप होते याचा प्रत्यय कालपासून येतोय. पण आज अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे नाटक असूनही अपेक्षित रसिकांची गर्दी दिसली नाही.
 
’कुणाच्या आधारे करू मी विचार,कोण देईल जीवाला आधार..या संत तुकारामाच्या अभंगातील ओवीनुसार स्वत:विषयी विचार करणारा आणि मनात भयंकर ‘मी पणा’ बाळगून या कथेचा नायक ‘मी’हा नवलेखक आहे.
 
त्याची जगाकडे पाहण्याची वेगळी अशी नजर आहे. समाजापासून तो अलिप्त राहून स्वतःतच मग्न राहून नवनिर्मिती करू पाहतो.तो समाजातील प्रतिष्ठित असा लेखक आहे, मात्र तो समाजाची घृणा करतो. समाजातील नुसतेच जगणार्‍या लोकांचा त्याला वीट येतो.
 
सार्वजनिक गणेश उत्सवातील साधी 500 रु. वर्गणी देणेही त्याच्या तत्त्वात नाहीय.कारण समाजासाठी आपलं काही देणं आहे हे त्याला मान्यच नाही. त्याच्या अशा या विक्षिप्त स्वभावाचा त्याची पत्नी ‘तू’ आणि मुलगा ’ह्रस्व’ यांना खूप त्रास सहन करावा लागत असतो.
 
 
पण त्याला त्याची तमा नसते.त्याचा उन्मत्तपणा वाढतच जातो.हा उन्मतपणा संपविण्यासाठी आपणराव आणि सगळे मामा टीम काहीतरी करावं असं ठरवतात. मी चा मुलगा र्‍हस्व याला छळणे हा मार्ग ते स्वीकारतात.
 
त्याला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतात आणि त्याला घाबरून मी ची पत्नी आणि मुलगा समाजापुढे नतमस्तक होण्याची तयारी दर्शवतात. मी कसा संपेल याचा ते विचार करतात.आपल्याविषयी आपली पत्नी, मुलगा मरणाची वाट पाहतात या दुःखाने मी व्यसनाला जवळ करून स्वतःच स्वतःचे अस्तित्व धोक्यात आणतो आणि ‘आपुले मरण पाहिले याची डोळा’ अशी स्वतःची स्थिती करून मरण पावतो.
 
त्याच्या पश्चात सर्व आनंदोत्सव साजरा करून मी पणा संपुष्टात आणतात. अशी एकंदरीत कथा.किरण अडकमोल यांनी वठवलेला मी आणि वैभव मावळे यांनी साकारलेला आपणराव सशक्त. जणू दोघांच्या अभिनयाची जुगलबंदीच.
 
आरती गोळेवाले यांनी साकारलेली मी ची पत्नी तू ही तिच्याइतकीच गोड. किरण अडकमोल आणि आरती गोळेवाले यांचे लग्नानंतरचे हे पहिलेच नाटक. दोघांची केमिस्ट्री छान जुळून आली नाटकात.
 
निशा पाटील या चिमुरडीने साकारलेली वेलांटी सुरेखच. पूनम जावरे आणि चैताली क्षीरसागर यांची प्रकाशयोजना प्रभावी. कल्याणी दोडके, अमोल ठाकूर यांचे संगीत अप्रतिम. जुन्या गीतांची संगीत, मराठी दूरदर्शनवरील बातम्या प्रक्षेपणाचे संगीत आणि अभंग, भजन यांचा केलेला कल्पक वापर कौतुकास्पद.
 
रंगभूषा आणि वेशभूषा नाटकाला साजेशी. सचिन आनंद, भाग्यश्री पाटील आणि वैशाली पाटील यांचे नेपथ्य अनुरूप. प्रसंगानुसार त्यात होणारे जलद बदल उत्कृष्टच.मात्र नाटकाची सुरुवात करणार्‍या निवेदिका कल्याणी गुजर यांनी निराशा केली.
 त्यांची धावती व जलद संवादफेक मुलाखतीच्या प्रसंगातही कायम राहिल्याने हवा तो इम्पॅक्ट नाही मिळाला.
 
मी ,तू, आपण, सगळे, काना मात्रा, वेलांटी, उदगार, स्वल्पविराम, विराम काका, नाम, सर्वनाम या मराठी व्याकरणाचा आधार घेऊन संहिता लिहिणे ही संजय पवार या लेखकाची कल्पनाच सुंदर. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ एकूण हलक्या फुलक्या विनोदांनी फुललेली,मी पणाला संपवू पाहणारी मराठी व्याकरणाची शाळा च होती. रसिकांनी आगामी नाटकास हजेरी लावावी ही विनंती. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ ला भावी निकालासाठी शुभेच्छा.
@@AUTHORINFO_V1@@