संदर्भ वरचेवर बदलत आहेत...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे संदर्भ वरचेवर बदलत चालले आहेत. एकेकाळी जगात कोणत्याही आंतरराष्ट्रीय संबंधांना संयुक्त अमेरिका आणि संयुक्त सोव्हिएत यांच्यातील शीतयुद्धाचा संदर्भ लावला जात असे. मात्र, जागतिकीकरणानंतर रणांगणातील युद्धापेक्षा बाजारपेठांमधील युद्धाचीच चर्चा जास्त जोरात चालू झाली आहे. संयुक्त सोव्हिएतच्या विभाजनानंतर शीतयुद्ध जवळजवळ संपले. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेला, दहशतवादाचे आव्हान सार्या जगासमोर असल्याचा साक्षात्कार झाला. तालिबानवर कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेने जागतिक समुदायाचे दहशतवादाच्या विरोधात सामूहिक मत तयार करण्याला सुरुवात केली तेव्हा रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेची वकिली करत जगातील काही देशांना भेटी देताना जगाने पाहिले आहेत. इस्लामिक दहशतवादाचे आव्हान भारताला भेडसावत असताना, जगाला या दहशतवादाची झळ अजून लागलेली नव्हती. अमेरिकेसारखे देश भारतातील दहशतवादी कारवायांकडे पाहताना त्यांना सोयीचा असणारा आशिया खंडातील दोन देशांतील एक खेळ, असे त्याकडे पाहात होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोघांनाही न दुखावता मोघम विधाने करत झुलवीत होते.
 
 
मात्र, अमेरिकेला दहशतवादाचा दणका बसला आणि दहशतवादाकडे पाहण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला एक कलाटणी मिळाली. इस्लामिक दहशतवादाचा झोत सद्दाम हुसैन, ओसामा बिन लादेन आणि आता आयएसआयएस अशा पद्धतीने बदलत गेला, तसतसे या दहशतवादाचे स्वरूप आणि त्यामुळे ग्रस्त होणार्या जगातील देशांची व्याप्ती विस्तारतच गेली आहे. नेमक्या याच काळात जगातील इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात तात्त्विकदृष्ट्या आणि प्रात्यक्षिक पातळीवर संघर्ष करणारी राजकीय शक्ती भारतात सत्तारूढ झाली. नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा भारताचा आणि विशेषत: मोदी ज्या चळवळीचे नेतृत्व करत आहेत, त्या चळवळीचा दृष्टिकोन प्रार्थनापद्धतीच्या विरोधाशी निगडित नाही, तर प्रार्थनापद्धतीच्या अतिरेकी आग्रहाच्या विरोधाशी निगडित आहे, हे जगाला पटवून देण्यात वरचेवर यशस्वी होत चालले आहेत. प्रार्थनापद्धतीच्या अतिरेकी आग्रहाला विरोध करताना भारतातील मोठ्या समुदायाचा दृष्टिकोन आपल्या एकाच एक उपासनापद्धतीचा तसाच, अतिरेकी प्रचार करण्याशी काहीएक संबंध नाही तर मानवतेच्या कल्याणाशी, प्रत्येकाच्या जगण्याच्या हक्काशी, प्रत्येकाच्या उपासनेच्या किंवा उपासना न करण्याच्याही स्वातंत्र्याशी निगडित असा हा सहिष्णू दृष्टिकोन आहे, ही भारतीय तत्त्वज्ञानाची मूळ बैठक जगासमोर आग्रहाने शब्दाने आणि कृतीनेही मांडण्यात मोदी सरकार वरचेवर यशस्वी झाले आहे.
 
अर्थात, या यशामागे जगाच्या कल्याणाचा निखळ आणि शुद्ध अस्सल भारतीय विचार, हे एक मोठे कारण आहे तसेच कोणताही विचार पटवून देण्यासाठी त्या विचारामागे संघटित शक्तीचे सामर्थ्य असावे लागते. हे सामर्थ्य भारतीय जनतेने स्पष्ट बहुमत देत नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे केले, हे मोठे कारण आहे. त्यानंतर मोदी यांनी भारतातून जगाच्या कानाकोपर्यात जाऊन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ठसा उमटविणारे जे भारतीय आहेत, त्यांच्यामध्ये जाणिवेचे एक स्फुरण निर्माण केले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या, परदेशातील दौर्यांवर सवंग टीका करण्यापर्यंत त्यांनी दौरे केले. प्रत्येक दौर्यात अमेरिकेच्या मेडिसन स्क्वेअरपासून ते दुबईपर्यंत तेथे असलेल्या भारतीयांनी ‘‘मोदीऽऽऽ मोदीऽऽऽ’’ असे नारे लावत भारतीय विचारांच्या या प्रवक्त्यामागे सद्भावनेची जी ताकद उभी केली, त्यामुळे मोदी आणि मोदी सरकार यांच्या भूमिकेचे महत्त्व जगाच्या लेखी काही पटीने वाढले आहे. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताची भूमिका, एकशेवीस कोटींची बाजारपेठ किंवा शांततेचे पाठ सांगणारा देश किंवा आगामी काळातील दुर्लक्ष न करण्याजोगी एक सामरिक शक्ती, इतकीच मर्यादित ठेवली नाही.
 
त्याच्याही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय योगदिवसासारखा विषय जगासमोर मांडला आणि जगाला देण्यासारखे भारताकडे आणखीही काही आहे, हे जगाच्या नजरेत आणले. भारतीय उपखंडातील देशांना शपथविधीपासून महत्त्व देऊन, या देशात दौरे करून, या देशांना अंतराळातील भारतीय कौशल्याचा लाभ मिळवून देत भारताला आशियाई देशांचे नव्हे, तर या देशातील जनतेचेही नेतृत्व करणारी ताकद, अशा स्वरूपात जगासमोर स्थापित केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीकरिता जाताना, भारताने त्याला जोडून भारत-अमेरिका संबंध दृढ होण्यासाठी एक कार्यक्रम आखला, त्याचा पहिला टप्पा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री यांच्यातील बैठकीच्या रूपाने यशस्वी रीत्या पार पडला होता. भारतातील पाक प्रायोजित दहशतवादाच्या नावाने गळे काढत अमेरिकेशी चर्चा करणे, एवढेच भारत-अमेरिका संबंधाचे रूप जगासमोर मनमोहनसिंग सरकार असताना पुढे येत असे. पहिल्यांदा भारत-अमेरिका संबंधाला याशिवाय अनेक अन्य आयाम जोडले गेले. भारत-अमेरिका यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत धोरणात्मक आणि व्यापारविषयक चर्चा झाली होती.
 
 
दहशतवादाच्या विरोधातला लढा अधिक तीव्र आणि परिणामकारक करण्याचे एक कलम तर अनिवार्य आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांततेचे मोघम उपदेश करण्याच्या एक पाऊल पुढे जात, पाकिस्तानच्या पदराआडून भारताच्या विरोधात अतिरेकी कारवाया करणारे दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि लखवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यक्रम आखण्यापर्यंत विषय पुढे नेऊन ठेवला, हे महत्त्वाचे आहे. भारत आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्या जाहीरनाम्यात, भविष्यात परस्पर व्यापारीसंबंधांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सपासून पाच पटीने वाढ करत, भविष्यात हा व्यापार पाचशे कोटी अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणाही करण्यात आली होती. हे करत असताना केवळ व्यापाराच्या आकडेवारीपुरते संबंध न ठेवता भावनिक पातळीवरही विचार करण्यात आला होता. अमेरिकेने सांगितले आहे की, भारतात 26/11 चा जो मुंबईवरचा हल्ला झाला त्यामागील मुख्य सूत्रधारांना पाकिस्तानने कठोर शिक्षा करायलाच हवी, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. इतक्या बारीक तपशिलात आणि इतक्या स्पष्टपणे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याने पाकिस्तानविरोधात भूमिका मांडणे, हे भारतीय मुत्सद्देगिरीचे खरे यश आहे. भारताचे परराष्ट्रधोरण केवळ जागतिक मुत्सद्देगिरीपुरते किंवा शिष्टाचारापुरते मर्यादित नसून, भारताला या संबंधांचा व्यापारविकासाच्या प्रक्रियेमध्ये कसा उपयोग करून घेता येईल याचाही उद्देश त्यामागे आहे, हे स्पष्ट करणारे आहे. शिवाय, भारताचे जगातील वाढत चाललेले महत्त्व, मोदी यांचे आंतरराष्ट्रीय संबंधातील योगदान, भविष्यात भारताला अधिक सुरक्षित आणि अधिक समृद्ध करण्याकडे चाललेले प्रयत्न, अशा अनेक गोष्टी ठळकपणे पुढे आल्या आहेत...
@@AUTHORINFO_V1@@