आणीबाणीतील मिसाबंदी, सत्याग्रहींना लवकरच मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

ज्येष्ठ नेते आ. नाथाभाऊंच्या प्रयत्नांना यश : लोकतंत्र सेनानी संघाच्या प्रदेश बैठकीत 52 प्रतिनिधींचा सहभाग


जळगाव
आणीबाणीतील मीसाबंदी तसेच सत्याग्रही बंधूना लवकरच स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा मिळणार असल्याची माहिती राजकीय मीसाबंदी व डी.आय.आर. सत्याग्रहींचे अखिल भारतीय संघटन असलेल्या महाराष्ट्र प्रदेश लोकतंत्र सेनानी संघाच्या भुसावळ येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आली. यासाठी ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते, त्याला अखेर यश आले आहे.
 
भुसावळ येथे झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील सुमारे 52 देशभक्त उपस्थित होते. महाराष्ट्रात 2014 मध्ये या लढ्याला सुरुवात झाली. परंतु 2017 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आ. नाथाभाऊ खडसे यांनी हा ज्वलंत विषय लावून धरला होता.
 
14 फेब्रुवारी, 2018 ला महाराष्ट्र शासनाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. समितीने शासनाला शिफारस केल्यानुसार ‘मिसा’ अंतर्गत अटक झालेल्या व्यक्ती आणि सत्याग्रहींना स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा मानधन देण्याचा निर्णय शासनाने 3 जुलै, 2018 ला घेतला. त्यानंतर 15 नोव्हेेंबर, 2018 च्या शासननिर्णयानुसार मानधन मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना प्रदान करण्यात आले.
 
 
मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी याबाबत त्वरेने निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून लवकरात लवकर ही कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
 
हा विषय मानधनापुरताच मर्यादित न राहता स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे प्रवास सुविधा, वैद्यकीय सुविधा, ताम्रपट देवून सन्मान आदी बाबी येत्या 26 जानेवारी, 2019 पयर्र्ंत अंमलात आणाव्या असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
18000 देशभक्तांना अटक
 
1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणार्‍या महाराष्ट्रातील सुमारे 18000 देशभक्तांना अटक झाली होती. आता 43 वर्षानंतर ही संख्या कमी होत जेमतेम 2800 वर आली आहे.
 
त्यामुळे शासनाने मानधनाच्या विषयाला विलंब न लावता असलेल्या देशभक्तांची तरी आयुष्याची सायंकाळ थोडी सुखात जावी याचा विचार करावा असा सूरही या बैठकीत निघाला.
 
बैठकीत लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विश्वास कुळकर्णी आणि शेेंदुर्णी येथील मीसाबंधू उत्तमदादा थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दीक्षित (परतूर), उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर (नाशिक), सचिव श्रीकांत शिंदे (सांगली) यांचीही उपस्थिती होती.
 
प्रारंभी आणिबाणी काळातील परंतु आता हयात नसलेल्या सवार्र्ंना श्रध्दांजली वाहण्यात आली. सत्याग्रही अनिल तारे यांच्या देशभक्तीपर गीताने सुरुवात झाली.
 
प्रास्ताविक भुसावळ येथील मीसाबंधू गजानन केर्‍हाळकर यांनी केले. सूत्रसंचालन नागपूर येथील अजय सालोडकर तर आभार भुसावळ येथील मीसाबंधू प्रकाश (पोपटशेठ) मुळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वासुदेव वारके, सोनू मांडे, दिलीप ओक, मांडळकर, केदार ओक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे सहकार्य लाभले. सामूहिक पसायदानाने सांगता झाली.
@@AUTHORINFO_V1@@