हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय करावा : भैय्याजी जोशी
महा एमटीबी   02-Nov-2018
 
 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर उभारण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू समाजाचीही राम मंदिर लवकरात लवकर उभारले जावे अशी अपेक्षा आहे. न्यायालयानेही या प्रकरणी हिंदू समाजाची भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. भाईंदरमधील उत्तन येथे रा.स्व.संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा शुक्रवारी समारोप झाला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

राम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. त्याचा लवकरच निकाल लागण्याची अपेक्षा होती. २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णय होईल अशी आशा होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय अनिश्चित काळासाठी टाळला. तसेच न्यायालयाची प्राथमिकता वेगळी असल्याचे सांगण्यात आले. हा मुद्दा न्यायालयाच्या अग्रक्रमात नाही. परंतु न्यायालयानेही हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन याचा पुनर्विचार करावा, असे भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंस्वेक संघ हा न्यायालयाचा आणि संविधानाचा आदर करतो. पण न्यायालयानेही भावनांचा विचार करणे आवश्यक आहे. राम मंदिरासंबंधी कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. परंतु कोणताही पर्याय नसल्यास सरकारने यावर विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

 

अनेक गोष्टी सहमतीने होत असतात. त्यासाठी दबावाचा वापर करणे आवश्यक नसते. यापूर्वीही देशात असलेल्या सरकारने राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा केली आहे. मात्र, संवेदनशील विषयांवर न्यायालयाने लवकर निर्णय देणे अपेक्षित आहे. आवश्यक असल्यास राम मंदिरासाठी पुन्हा एकदा आंदोलनदेखील केले जाईल, असे ते बोलताना म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यावर आपली भूमिका मांडली. रामजन्मभूमीबाबत सकारात्मक भूमिका घेणा-यांसोबत आम्ही असू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
 
 

राहुल गांधींना गंभीरतेने घ्यायची गरज नाही

 

आपण खरे हिंदू असून रा.स्व. संघाने आपल्याकडून हिंदूत्व शिकावे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले होते. याबद्दल प्रश्न विचारला असता राहुल गांधींची वक्तव्य गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया भैय्याजी जोशी यांनी दिली. राहुल गांधी यांचे कोणतेही वक्तव्य गंभीर नसते. ते ज्याप्रकारे बोलतात ते गंभीरतेने घेण्याजोगे विषय नसतात, असेही ते म्हणाले.

 

स्त्री पुरूष भेदभाव नाही

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही स्त्री पुरूष असा भेदभाव करत नाही. शबरीमालाचा विषय हा केवळ महिलांच्या मंदिराच्या प्रवेशाबाबत मर्यादित असल्यास आम्ही सहमत आहोत. हिंदू परंपरेतही कधी स्त्री पुरूष असा भेदभाव नाही. परंतु काही मंदिरांचे नियम असतात आणि काही परंपराही असते. त्यानुसार चालणे आवश्यक असल्याचे भैय्याजी म्हणाले. काही जणांना हे आपल्या हक्कांवरचे अतिक्रमण वाटते. परंतु विषय मान्यतेचा, परंपरेचा असतो. यावर चर्चा केल्याशिवाय निर्णय अपेक्षित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संघ कार्याचा विस्तार वाढला

 

कार्यक्रमादरम्यान, भैय्याजी जोशी यांनी संघ कार्यांच्या विस्ताराबद्दलही माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून संघाची घोडदौड गतीने सुरू असल्याचे ते म्हणाले. रा.स्व.संघाच्या कार्यात दीड पटीने वाढ झाली असून जवळपास ३३ हजार ५०० गावांमध्ये संघाचे अविरत कार्य सुरू आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत १४०० ठिकाणी विस्तार करण्यात आला आहे. सध्या रा.स्व. संघाच्या ५५,८२५ शाखा असून यावर्षी २२०० शाखा वाढल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षभरात १ लाख स्वयंसेवक रा.स्व. संघाशी जोडले गेले असून सध्या ६१ हजार ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. १०-१५ गावांचे एक युनिट असे अनेक युनिट करण्यात आले आहे. १ लाख ७० हजार गावांमध्ये स्वयंसेवक अनेक कामे करत असून संघाची २५ मोठी रूग्णालये आणि १२ ब्लड बँक आज देशभरात कार्यरत आहेत. शिक्षणासाठी आणि नागरिकांच्या प्राथमिक उपचारासाठीही आज अनेक स्वयंसेवक कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पर्यावरणाची बदलती स्थिती आणि पाण्याची स्थिती ही देशापुढील मोठी समस्या आहे. या बैठकीत आम्ही जलसंधारण आणि पर्यावरणासाठी एक स्ट्रक्चर उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/