अवनीनंतरचे कवित्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |


 


 

अवनीच्या दोन्ही पिलांनी शिकारी आणि प्राणीमित्र या दोघांनाही खोटे ठरविले आहे. पशु-मानव संघर्षात विवेक हा सर्वात मोठा सुवर्णमध्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.


यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे १३ माणसांना मारणाऱ्या अवनी वाघिणीनंतरचे कवित्व अद्याप संपलेले नाही. एका वाघिणीच्या माणसे मारण्यानंतर समाजातले शक्य ते सर्व प्रकारचे घटक या विषयात सहभागी झाले. प्राणीमित्र संघटना, न्यायालये, सरकार आणि एक शिकारीसुद्धा. अवनीनंतरचे कवित्व संपलेले नाही ते तिच्या दोन शावकांमुळे. अंदाजे वर्षभर वयाचे हे दोन बछडे आजही पांढरकवडाच्या आसपासच्या जंगलात आहेत. अवनीला ठार मारण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या ‘नवाब’ या नवाबी थाटातल्या शिकाऱ्याचे म्हणणे मान्य केले, तर अवनीच्या बछड्यांनाही नरमांसाची चटक लागली आहे. त्यामुळे तेही माणसे मारू शकतात. त्यामुळे त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे. अवनीला ठार मारून दोन-तीन आठवडे झाले असतील, पण अद्याप अवनीच्या बछड्यांनी मारलेल्या माणसांच्या काही बातम्या आलेल्या नाहीत. त्या येऊही नयेत. कुणीही अशा भयंकर पद्धतीने आपल्या घरातील सदस्य अशाप्रकारे गमावणे दुःखदच. त्याचा सहानुभूतीनेच विचार केला पाहिजे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे. ‘अवनी’ हे प्राणीमित्रांनी दिलेले नाव. वस्तुत: वनविभागाच्या दफ्तरदरबारी तिचे नाव ‘टी १’ होते. आता अवनीच्या अकरा महिन्यांच्या पिलांबाबतीत चर्चा सुरू आहे. अवनीची पिले आईखेरीज तडफडून मरतील, हा दावा खुद्द पिलांनीच खोटा ठरवला आहे. शिकारी नवाबचा दावाही पिलांनीच खोटा ठरवला आहे. आता प्रश्न उरतो की, मग अशा प्रश्नाचे करावे काय? अवनीबाबतचे सारे प्रकरण तापत असताना या सुदृढ वाघिणीच्या वर्तनाविषयी बरीच माहिती बाहेर आली आहे. ही सगळी माहिती वैज्ञानिक व निरीक्षणाच्या आधारावर नोंदली गेली असल्याने त्यात रंजक काहीच नाही. त्यामुळे माध्यमांना त्यात फारसा रस नाही. अवनीने माणसांवर जेव्हा जेव्हा हल्ले केले, तेव्हा तेव्हा ती पिलांसोबतच होती. वाघांमध्ये माद्यांना जेव्हा मातृत्व प्राप्त होते, तेव्हा त्यांच्यातील आई त्यांना अत्यंत आक्रमक करते. पिले वयाच्या एका टप्प्यापर्यंत जात नाहीत, तोपर्यंत माद्या त्यांच्या अवतीभवती कुणाचेही अस्तित्व सहनच करीत नाहीत.

 

अवनीकडून जे घडले ते यातूनच. जिम कॉर्बेट हा नरभक्षक वाघांचा अट्टल शिकारी. हाच कॉर्बेट नंतर संवेदनशीलपणे व्याघ्रसंवर्धनाच्या कामाला लागला. नरभक्षक झालेल्या वाघाच्या वर्तनाचे सगळेच तपशील नोंदवून ठेवले आहेत. अवनीनेच मारलेल्या माणसांचा आकडा काही वर्षातला आहे. वाघ वाचवायचे की माणूस? या डाव्यांच्या लाडक्या प्रश्नाला उत्तर नाही. अर्थात दोन्ही. कारण, ‘परिसृष्टी’ नावाची संस्था जर टिकवायची असेल तर वाघ महत्त्वाचा आहे आणि माणूससुद्धा. मग अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा त्याकडे अपघाताच्या स्थितीप्रमाणेच पाहिले पाहिजे. अशा परिस्थितीकडे निष्कर्ष काढण्याचे उदाहरण म्हणून मुळीच पाहू नये. भूतदया आणि निसर्ग संवर्धन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. एक भावनेवर आधारित, तर दुसरे वर्तनशास्त्रावर. पशुमानव संघर्ष ही समस्या या पिढीत आपल्याला अनुभवता येत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रसारमाध्यमांचा माहिती-तंत्रज्ञानाचा वाढलेला प्रभाव. यापूर्वीही अशा गोष्टी घडतच होत्या. माणसाने जंगलावर हल्ला केल्याने प्राण्यांनी ठरवून गावावर हल्ला केल्याच्या ललित कथा मराठी साहित्यात आहेतच. ‘पॅराडाईम शिफ्ट’ नावाचा अतिशय सुंदर शब्द व्यवस्थापन शास्त्रात आहे. ‘दृष्टिकोनातला बदल’ असे त्याचे मराठीत भाषांतर करता येईल. जगभर आता आपल्या भवताली जगणाऱ्या सजीवांना सहचर म्हणून स्वीकारण्याचा कल वाढत आहे. रक्ताने माखलेल्या मृत जनावराच्या मानेवर पाय देऊन फोटो काढणारे शिकारी आता अमानुष वाटतात. अवनीला ठार मारण्यासाठी आलेल्या शिकाऱ्याला विरोध झाला, तो याच कारणासाठी. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. भारतात सापडणाऱ्या वाघाच्या प्रजातीचे अस्तित्व आज केवळ भारतातच उरले आहे. एक चतुष्पाद प्राणी म्हणून नव्हे, तर अन्नसाखळीतला वाघ हा महत्त्वाचा घटक आहे. जिथून वाघ नाहीसे झाले, त्या ठिकाणचे जलस्त्रोत कालांतराने संपत गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आज भारतात वाघांची संख्या वाढत असल्याचे आशादायक चित्र आहे. ही आनंदाची बाब असली तरी स्थानिकांसाठी तो तितक्याच चिंतेचा किंवा रोजगाराचा विषय आहे.

 

मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक यासारख्या राज्यात ‘व्याघ्र पर्यटन’ हा आर्थिक स्त्रोताचा खूप मोठा मार्ग झाला आहे. यात स्थानिकांना रोजगारातून मिळालेला वाटाही लहान नाही, हे विसरता कामा नये. वाहनचालक, गाईड, हॉटेल कर्मचारी एक ना अनेक अशा संधी या क्षेत्रात नव्याने आल्या आहेत. ताज वगैरेसारखे समूह या व्यवसायात उतरले ते इथल्या अर्थकारणामुळेच. वाघांमुळे रोजगार मिळत असलेल्या लोकांची संख्या मोजायचे ठरविले किंवा वनोपजाची मूल्ये निश्चित करायचे झाले, तर ती काही हजारांत आणि दुसऱ्या घटकाची मूल्ये काही लाखांत जाऊन पोहोचतात. याचा अर्थ वाघांनी माणसे मारायला हरकत नाही, असा मुळीच होत नाही. इथे वैज्ञानिक हस्तक्षेपाची गरज आहे. पशुंच्या वर्तनशास्त्रावर आता बऱ्यापैकी संशोधन झाले आहे. ज्या वाघांच्या अस्तित्वाखालील जंगलात राहायचे आहे, त्यांना या परिस्थितीत जुळवून घेऊनच राहावे लागेल. अवनीसारखे वर्तन असणाऱ्या जनावरांपासून दूर राहणे तंत्रज्ञानाच्या आधारावर आता शक्यही आहे. अशा क्षेत्रात जळणाच्या लाकडासाठी लोकांना जंगलात जायला लागू नये, यासाठी गॅस वाटपाचे काम शासनाने अत्यंत उत्कृष्टपणे केलेले आहे. भाकड चराऊ जनावरे बदलून दुभती जनावरे देण्याचेही प्रयोग आहेतच. यामुळे चरायला मोकाट जनावरे सोडली जात नाहीत व शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. हे सगळे प्रयोग सध्याच्या शासनाने अतिशय चांगल्या प्रकारे केले आहेत. तरीसुद्धा अवनीसारखे प्रसंग होणार, यात शंका नाही. कारण इथे माणसं आणि प्राणी या दोन्हींच्या वर्तनामध्ये शक्यतांचा प्रभावच अधिक असतो. वाघाची पिले साधारणत: दोन ते तीन वर्षांनी आपल्या आईपासून विलग होतात आणि आपले स्वतंत्र आयुष्य सुरू करतात. अवनीच्या दोन्ही पिलांनी अद्याप तरी माणसे न मारता स्वत:चे अस्तित्व टिकविले आहे. पशु-मानव संघर्षात विवेक हा सर्वात मोठा सुवर्णमध्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@