रोगनिवारणामधील अडथळे - (भाग-१)
महा एमटीबी   19-Nov-2018


 

अल्कोहोल किंवा दारू पिण्यामुळे यकृतावर थेट परिणाम होत असतो. तसेच महत्त्वाच्या अवयवाखाली चेतासंस्थासुद्धा येत असल्याने सर्व नसा बधिर होऊन जातात व या बधिरपणामुळे त्यांची प्रतिक्षिप्त क्रियेची ताकद कमी होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमकुवत होते.


डॉ. हॅनेमान यांनी होमियोपॅथीच्याऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात लिहून ठेवले आहे की, वैद्यकीय चिकित्सकाचे सर्वात मोठे व एकमेव पवित्र कार्य म्हणजे रोग्याला रोगमुक्त करणे व त्याचे आरोग्य परत सुस्थितीत आणणे हे होय. होमियोपॅथीक डॉक्टर हे या तत्त्वाला अनुसरूनच कार्य करीत असतात. रुग्णाची पूर्णपणे तपासणी करून मग व्यवस्थित औषधे आणि मात्रा ठरवून दिल्या जातात. परंतु, काही प्रकरणात असे दिसून येते की, सर्व अभ्यास करून औषध दिले तरी, काही कारणांमुळे रुग्णाच्या रोगनिवारणात काही अडथळे येऊ शकतात. या अडथळ्यांनादेखील बाजूला करावे लागते व त्यानंतरच रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त होतो. हे अडथळे अनेक प्रकारचे आहेत.

 

) रोगाला उद्दीपित करणारी आणि रोग शरीरात स्थिर करणारी कारणे (Exciting & Maintaining causes) - या कारणांमध्ये मुख्यत्वे करून आजूबाजूच्या वातावरणातील घटक, तसेच आहारातील घटक, स्वत:ची व सभोवतालची स्वच्छता आणि काही इतर घटक यांचा अंतर्भाव होतो. या सर्वांचा अभ्यास हा चिकित्सकासाठी गरजेचा असतो. कारण, जोपर्यंत हे अडथळे दूर होत नाहीत, तोपर्यंत माणूस रोगमुक्त होऊ शकत नाही.

 

उदाहरणार्थ - १) आहारातील घटक किंवा सवयी - एखाद्या लहान मुलाला जर जुलाब होत असतील व त्याला औषध दिले, तर ते थांबतात. पण, जर त्या मुलाला दूध प्यायल्यानंतर जुलाब होत असतील, तर दूध हे रोगाला उद्दीपित करणारे कारण आहे आणि तो मुलगा जर दुधाचे सेवन करतच राहिला, तर मात्र तो ‘मेनटेनिंग कॉज’ होतो व जोपर्यंत त्याचे दूध थांबवत नाही, तोपर्यंत त्याला पूर्ण बरे वाटणारच नाही.

 

) एका रुग्णाला सतत बद्धकोष्ठतेचा विकार होता. काहीही केले किंवा कितीही औषधे घेतली तरी, त्याचा बद्धकोष्ठतेचा विकार हा काही केल्या बरा होत नव्हता. अशावेळी रुग्णाच्या सवयी व आजूबाजूचे वातावरण जाणून घेणे गरजेचे होते. जेव्हा त्या रुग्णाला खोलात विचारले गेले तेव्हा अशी माहिती मिळाली की, तो माणूस त्याचे सर्व अन्न अॅल्युमिनिअमच्या भांड्यात शिजवत असे आणि तेव्हा अडथळा काय आहे, याचा शोध लागला. अॅल्युमिनिअम जर शरीरात गेले, तर त्याच्या प्रभावामुळे माणसाला प्रचंड बद्धकोष्ठता होते. बद्धकोष्ठता निर्माण करणे हा अॅल्युमिनिअमचा गुणधर्म आहे. त्यामुळे त्या रुग्णाला अॅल्युमिनिअमची भांडी न वापरण्याचा सल्ला दिला गेला व त्याचा सकारात्मक परिणाम झाला. रुग्ण काही दिवसातच पूर्णपणे रोगमुक्त झाला.

 

काही रुग्णांना मद्य, धुम्रपान, तंबाखूचे सेवन अशा प्रकारची व्यसने असतात. ही सर्व मादक द्रव्ये शरीराच्या सर्व नसांवर आणि पर्यायाने मेंदूवर व चेतासंस्थेवर विपरीत परिणाम करत असतात. या व्यसनांच्या आहारी गेलेल्या रुग्णांमध्ये चेतासंस्था पटकन प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्य प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. जे लोक तंबाखूचे अतिसेवन करतात किंवा मशेरीची सवय असते, अशा लोकांनासुद्धा पोटाचे विकार होतात व बद्धकोष्ठता होते. जोपर्यंत हे लोक तंबाखूचे सेवन कमी किंवा बंद करत नाहीत, तोपर्यंत त्यांना पूर्णपणे आराम मिळू शकत नाही. अल्कोहोल किंवा दारू पिण्यामुळे यकृतावर थेट परिणाम होत असतो. तसेच महत्त्वाच्या अवयवाखाली चेतासंस्थासुद्धा येत असल्याने सर्व नसा बधिर होऊन जातात व या बधिरपणामुळे त्यांची प्रतिक्षिप्त क्रियेची ताकद कमी होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमकुवत होते. त्यामुळेच रोगाला उद्दीपित करणारी ही कारणे रोगनिवारणाच्या प्रक्रियेत सतत अडथळा आणतात. पुढील भागात आपण या अडथळ्यांबद्दल आणखीन जाणून घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/