पढतमूर्खाची लक्षणे
महा एमटीबी   14-Nov-2018

दासबोध दशक २.१ या समासातील काही मूर्खलक्षणे आपण पाहिलीत. हा मूर्खपणा टाकून दिला, तर निश्चितपणे व्यावहारिक शहाणपण येते. त्यासाठी शहाण्याने ही मूर्खांची लक्षणे नेहमी लक्षपूर्वक ऐकावीत. त्याने त्यांच्या ठिकाणी चातुर्य येईल, असे समर्थ सुचवतात.

 
 

ऐसी हे मूर्ख लक्षणे । श्रवणे चातुर्य बाणे।

चित्त देऊनिया शहाणे । ऐकती सदा ॥ (२.१.७२)

 

ही मूर्ख लक्षणे न शिकलेल्या म्हणजे अडाणी माणसांची आहेत. पण, गंमत अशी की, चांगले शिकले सवरलेले लोकही स्वार्थीबुद्धीने, आशाळभूतपणे आणि गर्विष्ठपणे मूर्खपणा करीत असतात. अशांना समर्थांनी ‘पढतमूर्ख’ म्हटले आहे. हे शहाणे असून मूर्खासारखे वागतात. या ‘पढतमूर्खा’ची लक्षणे सांगण्यासाठी २.१० हा पूर्ण समास समर्थांनी खर्ची घातला आहे. कारण, अडाणी माणसे लवकर सुधारतात. आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली की, ते त्यांची वागणूक बदलतात, मूर्खपणा सोडून देतात. परंतु, जे बहुश्रुत, व्युत्पन्न आणि ब्रह्मज्ञान सांगणारे पढतमूर्ख असतात, त्यांना आपला मूर्खपणा हा ‘मूर्खपणा’ वाटत नाही. आपल्या मूर्ख विचारांना ते चिकटून राहतात आणि त्यांचे विचार शहाणपणाचे आहेत, असे ते लोकांना सांगतात सुटतात. समर्थांसारख्या एखाद्या अधिकारी व्यक्तीने कानउघडणी केली, तर त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते. आपल्या मूर्खपणाची जाणीव होऊन हे पढतमूर्ख सुधारण्याची शक्यता असते, अन्यथा ते स्वत:लाच शहाणे समजत असतात. काय चांगले ते माहीत असूनही हे निंद्य गोष्टी स्वीकारतात. सदाचाराची किंमत ओळखूनही भ्रष्टाचाराचा अवलंब करतात. हा पढतमूर्ख दुसऱ्याला चांगले मार्गदर्शन करतो, पण स्वत: मात्र स्वार्थापायी उलट वागतो. ब्रह्मज्ञानाच्या चार-दोन गोष्टी कळू लागल्यावर तो स्वैराचाराचा पुरस्कार करतो. स्वधर्माची, पारमार्थिक साधनांची निंदा करतो. हा माणूस ‘पढतमूर्ख’ समजावा.

मुक्त क्रिया प्रतिपादी ।

सगुण भक्ती उच्छेदी ।स्वधर्म आणि साधन निंदी ।

तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.४)

शास्त्रमर्यादा सोडून वागावे, असा तो प्रचार करतो. त्याला आपल्या बुद्धिज्ञानाचा गर्व झाल्याने बाकीच्या लोकांना तो मूर्खात काढतो आणि लोकांमध्ये काय दोष आहेत हेच पाहत बसतो. तो स्वतःला विद्वान समजत असल्याने लोक त्याला एखाद्या ग्रंथाविषयी त्याचे मत विचारतात. पण दुसऱ्याला चांगले म्हणणे त्याला जमत नाही. त्यामुळे तो ग्रंथ मुळातून न पाहता हा उगीच त्या ग्रंथाला नावे ठेवीत बसतो. जर कोणाचे गुण याला सांगितले, तर हा त्याच्यातील दोष पाहत असतो.

समूळ ग्रंथ पहिल्यावीण ।

उगाच ठेवी जो दूषण ।

गुण सांगता अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.८)

या पढतमूर्खाला समर्थांनी दुष्टबुद्धीचा म्हटले आहे. केवळ मत्सराने तो ग्रंथ आरंभापासून न पाहता त्या ग्रंथाला नावे ठेवून हा पढतमूर्ख आपली हीन वृत्ती प्रकट करतो. या संबंधी दुसऱ्या एका समासात स्वामींनी असाच अभिप्राय दिला आहे.

पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण ।

उगाच ठेवी जो दूषण ।

तो दुरात्मा दुराभिमान ।

मत्सरे करी ॥ (१.१.२२)

नेहमी दुसर्‍यांचे दोष काढीत त्यांना नावे ठेवणे ही त्याची सवय होऊन बसते. पण, तेच दोष त्याच्याही ठिकाणी आहेत, हे ज्याला समजत नाही तो ‘पढतमूर्ख’च होय.

दोष ठेवी पुढिलांसी ।

तेचि स्वये आपणासी ।ऐसे कळेना जयासी ।

तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.१३)

हा पढतमूर्ख नेहमी प्रापंचिक गोष्टीस आसक्त असतो. प्रपंचात तो गुंतून पडतो. परमेश्वराला सोडून हा माणसांची स्तुती करतो. जर एखादा माणूस त्याच्याविषयी आदर करून बोलला, तर हा पढतमूर्ख त्या माणसाच्या मनाला गोड वाटेल असेच बोलू लागतो आणि त्या माणसाची कसलीही लायकी नसली तरी, त्याची स्तुती करू लागतो. थोडक्यात, इतरांनी त्याची केलेली चमचेगिरी त्याला अतिशय प्रिय असते. पण जर त्याला दिसून आले की, तो माणूस आपल्याविषयी फारसा आदर दाखवीत नाही, तर हा लगेच त्याची निंदा करू लागतो. आपल्या प्रत्येक कृतीला तो बुद्धिवादाचा आधार घेतो. बरेच वेळी आपला मार्ग चुकला आहे, असे त्या पढतमूर्खाला कळले तरीसुद्धा तो हट्टाला पेटतो. आपले नेमके हित कशात आहे, हे त्याला कळत नाही. एखादे वेळी या पढतमूर्ख पंडिताच्या निरुपणाला काही विद्वान येऊन बसतात तेव्हा तो त्या विद्वानांच्या क्षूद्र वर्णाचा उल्लेख करून त्या विद्वानांना टोचून बोलतो. हा पंडित असला तरी, त्याला मूर्खच म्हणावे लागेल. याला काही पारमार्थिक गोष्टींची प्राप्ती झाली असता, हा आपल्या सद्गुरुची अपेक्षा करतो आणि आपली गुरुपरंपरा चोरून ठेवतो. तो फक्त दुसर्‍यांना शिकवतो, पण त्यानुसार स्वत: वर्तन ठेवीत नाही. ज्या कृतीने भक्तिमार्ग टिकून राहत नाही किंवा त्याचा ढोंगीपणा उघड होतो, अशी कृती करायला तो मागेपुढे पाहत नाही. त्याला ‘मूर्ख’च म्हणावे लागेल. याला परमार्थ यत्किंचितही साधलेला नसताना हा देवाब्राह्मणांचा (सज्जनांचा) द्वेष मनात साठवतो. अशा पढीक माणसाला ‘मूर्ख’ समजले पाहिजे. याचा आणखी एक गुणविशेष म्हणजे, हा पढतमूर्ख स्त्रियांचा संग करतो. स्त्रियांच्या संगतीत राहणे त्याला आवडते. आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडण्यासाठी तो फक्त स्त्रियांच्या पुढे निरूपण करतो आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो. अशा विद्वानाला मूर्खच म्हटले पाहिजे.

स्त्रियांचा संग धरी ।

स्त्रियांसी निरूपण करी ।

निंद्य वस्तु अंगिकारी ।

तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.१८)

काही लोक महायोगी असतात. ब्रह्मज्ञानी असतात. पण लोकांना भविष्य सांगू लागतात. लोकांच्या भोळेपणाचा ते फायदा घेतात. ते पढतमूर्खच असतात. तसेच एखादा विद्वान असूनही लोकांना पैसे घेऊन भविष्य सांगतो तो पढतमूर्खच होय. स्वतः भक्तिहीन, वैराग्यहीन, क्रियाहीन असूनही लोकांना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो. द्रव्यासाठी लोकांना परमार्थ सांगतो त्या पढतमूर्खाला ढोंगीच म्हणावे लागेल. आजकाल तर अशा ढोंगीबाबांचे पेव फुटले आहे. पैशासाठी काही बाबा आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन करतात. हे बाबा सांगतील ती फी देण्याची ज्यांची तयारी असेल, त्यांनाच शिबिरासाठी प्रवेश दिला जातो. समर्थकाळापासून आजच्या काळापर्यंत हे पढतमूर्ख परमार्थाच्या नावावर पैसे घेऊन भोळ्या भाविकांना फसवत आले आहेत. पण तरीही समजात त्यांची प्रतिमा प्रतिष्ठित, उपकार करणारे अशी आहे. लोक त्याच्या दिसण्याला, गारुडाला भुलून त्यांचा उदो उदो करीत आहेत. ही पढतमूर्खांची लक्षणे टाकून देण्यासाठी सांगितली आहेत. काही कमी-जास्त वाटले, तर श्रोत्यांनी क्षमा करावी, असे समर्थ सांगतात.

त्यागावया अवगुण ।

बोलिले पढतमूर्खांचे लक्षण ।

विचक्षणे नीउन पूर्ण । क्षमा केले पाहिजे ॥ (२.१०.३९)

 
 
- सुरेश जाखडी  

[email protected]

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/