भगदत्त!
महा एमटीबी   14-Nov-2018
 
 
 

प्राग्ज्योतिष्यम्हणजे आता ईशान्येकडे जो आसाम प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा राजा भगदत्त. भौमासुर आणि भूमी (पृथ्वी) यांना आठ पुत्र होते. एकदा भौमासुराने इंद्राची कवचकुंडले पळविली. त्यामुळे चिडून कृष्णाने त्याचे सात पुत्र मारले. त्यावेळी कृष्णाला प्रार्थना करून भूमीने भगदत्तसाठी अभयदान मागितले. तो नरकासुराचा वंशज होता आणि नरकासुराला कृष्णाने मारले म्हणून भगदत्त हा श्रीकृष्णाचा कट्टर वैरी झाला होता. भगदत्त इंद्राचा घनिष्ठ मित्र आणि त्याला अर्जुनाविषयी खूप प्रेम होते. उत्तम योद्धा म्हणून तो अर्जुनाची प्रशंसाच करत असे. भगदत्ताकडे दोन महाभयंकर दिव्यास्त्रे होती. शक्ती अस्त्र आणि वैष्णव अस्त्र. त्या दिव्य अस्त्रांमुळे तो अजिंक्यच होता. भगदत्ताने तेव्हा बगदाद शहर वसविले, अशीही एक कथा प्रचलित आहे.

 
 

ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रीतिक असे पूर्वादी अष्टदिशांस पृथ्वीचे आधारभूत, आठ महाकाय हत्ती आहेत, असे पुराणांतून सांगितलेले आढळते. या हत्तींची मस्तके, गंडस्थळे अनेक योजने रूंद अशी होती. यातील एक सुप्रीतिक नावाचा महाकाय हत्ती भगदत्तकडे होता. या महाकाय हत्तीवर बसून भगदत्त युद्ध करत असे. कौरव-पांडव महायुद्धात भगदत्ताने सुप्रीतिक हत्तीवर बसून भीमालाही त्राही भगवान करून सोडले. शेवटी भीमालाही युद्धभूमीतून पळ काढावा लागला. भगदत्ताकडे शक्ती अस्त्र आणि वैष्णव अस्त्र अशी दिव्यास्त्रे होती. या युद्धाच्या वेळी भगदत्त खूप वयस्कर होता, इतका की त्याच्या डोळ्यांच्या पापण्या खाली लोंबत होत्या. त्या डोळ्यांवरती येऊ नये आणि डोळे झाकले जाऊ नये म्हणून त्याने रेशमी वस्त्राने या बांधून घेतल्या होत्या. श्रीकृष्णाला त्याचे हे रहस्य ठाऊक होते.

 
 

भगदत्त आणि त्याच्या हत्तीने पांडव सेनेचा विद्ध्वंस आरंभला हे पाहून अर्जुन कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, या भगदत्ताकडे माझा रथ वळव. मला त्याला आणि त्याच्या हत्तीला मारलेच पाहिजे. पण, त्याच क्षणी त्रिगर्त राजांनी अर्जुनास युद्धाचे आव्हान दिले. त्यामुळे तो पेचात पडला. मग श्रीकृष्णाने त्याला त्रिगर्तावर वज्रास्त्र सोडायला सांगितले. त्या अस्त्राने त्रिगर्तांची अक्षरश: वाताहत झाली. हे पाहून कृष्ण खूप खूश झाला पण सुशर्मा, मात्र अजून जीवंत होता. अर्जुनाने घनघोर युद्ध करून त्याला बेशुद्ध पाडले. नंतर अर्जुन भगदत्ताकडे निघाला. हत्तीवर बसलेल्या भगदत्ताने अर्जुनावर जोरदार हल्ला केला. सुप्रीतिक हत्तीच्या साहाय्याने तो अर्जुनाला चिरडूनच टाकणार होता. पण, कृष्णाने चपळाईने त्याचा रथ बाजूला नेला म्हणून अर्जुन वाचला. अर्जुनाने भगदत्ताचे धनुष्य आणि हत्तीचे चिलखत तोडण्यात यश मिळवले. अतिशय मारक अशी दोन अस्त्रे भगदत्ताने कृष्णावर सोडली आणि तिसरे अस्त्र अर्जुनावर सोडले. अर्जुनाच्या मुकुटावर ते अस्त्र येऊन आदळले. भगदत्ताने अर्जुनाकडे एक अंकुश फेकून मारला. त्या अंकुशावर त्याने वैष्णव अस्त्र मंतरून सोडले होते.

 
 
श्रीकृष्णाला ते कळले आणि त्याने वैष्णवास्त्र आपल्या छातीवर झेलून धरले. त्या अस्त्राचे एका पुष्पमालेत रूपांतर झाले. कारण, पूर्वी कृष्णानेच एकदा चुकून हे अस्त्र पृथ्वीला दिले होते आणि तिने ते आपला पुत्र नरकासुर याला दिले. पुढे नरकासुराने ते अस्त्र भगदत्ताला दिले. अर्जुन कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, तू तर युद्धात भाग घेणार नाही अशी शपथ घेतली होतीस. आता ती माझ्यासाठी का मोडलीस? “यावर कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हे वैष्णवास्त्र आहे. ते ज्याच्यावर सोडले जाते त्याचा मृत्यूच होतो. मी तुझा मृत्यू कसा पाहू शकेन? यासाठी मीच माझी शपथ मोडली आणि मी दिलेले ते अस्त्र माझ्याकडे परत घेतले एवढेच! या अस्त्रामुळेच आतापर्यंत भगदत्त अजिंक्य होता पण, आता त्याला आणि त्याच्या हत्तीला मारणे सोपे झाले आहे. आता मात्र विलंब करू नकोस.” कृष्णाने अर्जुनाला भगदत्ताच्या पापण्यांवर बांधलेल्या वस्त्राचा बाण मारून वेध घे,” असे सुचवले. त्याने तसे करताच ते वस्त्र तुटले आणि भगदत्ताच्या पापण्या त्याच्या डोळ्यांवर लोंबू लागल्या. त्याला काही दिसेनासे झाले. मग अर्जुनाने सुप्रीतिक आणि भगदत्त या दोघांवर बाण सोडून त्यांचा अंत केला. त्या महान योद्ध्याला अर्जुनाने प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि मानवंदना दिली. त्याच्या या कृत्याचे सर्वांनी कौतुक केले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/