नकारावर मात (भाग २)
महा एमटीबी   12-Nov-2018
 
 

नकारासारखी दुसरी वेदना देणारी जखम शोधून सापडणार नाही. इतर सगळ्या वेदना अगदी प्रियजनांचा मृत्यूसुद्धा आपण दृढ प्रयत्नांनी म्हणा किंवा दैवगतीला शरण जाऊन म्हणा, पचवायचा प्रयत्न करतो. पण, तिरस्कृत अनुभवाचे गाठोडे पाटीवर घेतल्यावर त्याच्या भाराने एकदा का माणूस झुकला की, जोपर्यंत तो ते गाठोडे फेकून द्यायचे धाडस त्याला होत नाही, तोपर्यंत ताठ मानेने जगायची ऊर्मीही त्याला मिळत नाही.

 
 

माणूस म्हणून आपण सामाजिक प्राणी आहोत. लोकांनी आपल्याला स्वीकारले की, आपण आपल्याला बहुमूल्य समजतो. जगाच्या स्वीकृतीने आपली किंमत आपल्याला वाढली असे वाटते, तर जगाच्या नकाराने आपली विवशता वाढते. आपण एखाद्या समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहोत, या भावनेचा चुराडा झाला की, आपण अस्वस्थ होता, अस्थिर होतो. लोकांनी लाथाडण्याची भावना अनुभवत जगणे माणसाला निश्चितच सोपे वाटत नाही. पण, जेव्हा ती भावना आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिचा आपल्या अस्तित्वावर होणारा भावनिक दुष्परिणाम कसा रोखता येईल व आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कसा वाढवता येईल, याचे ज्ञान खूप मदतीचे ठरते. नकाराची जाणीव अनुभवताना आपली पहिली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला नकार दिला आहे, त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये, असे आपल्याला वाटते. काही झाले तरी त्या व्यक्तीचे तोंड मला पुन्हा पाहायला लागू नये, ही आपली इच्छा असते. आपली प्रतिक्रिया जितकी बालिश आहे, तितकीच ती अप्रामाणिक आहे. कारण, लाथाडले जाणे वा नकार मिळणे यासारख्या गोष्टी किंवा असे अनुभव किंवा प्रसंग आयुष्यात एका अमुक एका क्षणीच येत नाहीत. कधी थोड्या, तर कधी मोठ्या प्रमाणात या घटना आपल्या आयुष्यात सतत घडत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला नकार देणार्‍या व्यक्तींना टाळता येणे शक्य नाही. तथापि, त्यावेळी त्या घटनेची अस्वीकृती हा त्या क्षणी आपल्या हातून टाळता येणारा क्षण असला तरी, नंतर तो क्षण आपल्याला तसा व्यवस्थित हाताळता येणेही शक्य होते, हे लक्षात आल्यावर फासे सुलटे पडणे कठीण नाही. त्यामुळे नकाराच्या खेळात जिंकायचे असेल, तर नुसते मनाचे धाडस कामाचे नाही, त्यासाठी विचारांची प्रगल्भता अत्यंत महत्त्वाची आहे. महाभारतात द्युतात धर्माराजाचे अविचारी मन शकुनीच्या कुटील नीतीपेक्षा अधिक हानिकारक ठरले व पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागला. म्हणून तर अशा ठोकर देणार्‍या खेळात अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे आत्मचिंतन. खरे तर अस्वीकृतीचा अनुभव हा आत्मचिंतन व आत्मनिरीक्षण करण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आहे. आपण एखादी चूक केली तर ती का केली, कशी केली, याची वेळोवेळी होणारी जाणीवही खूप महत्त्वाची आहे. कारण, या चुका पुन्हा पुन्हा घडू न देता आपण होकाराची व यशाची एक एक पायरी आरामात चढू शकतो.

 
 

आपल्या आयुष्यात आपण नकाराचे सकारात्मक विश्लेषण करायचे ठरविले, तर आपल्या लक्षात येते की, नकाराचा आपल्यावर जो आघात झाला तो खरे तर जितका आपण आपल्या कल्पनेत ठरविला होता, तितका भयानक नव्हता. आपण नकारातून पुढे जायची संधी मिळवतो ती प्रगल्भ विचारांमुळेच. शिवाय एखादा नकारासारखा विघातक भासणारा अनुभव आपल्याला कधीतरी येऊ शकतो, हे मनाला मान्य असले तर नकाराची संहारक अनुभूती सहन करायची सक्षमता सहज वाढते. आपली प्रत्येक कृती अपेक्षित उद्दिष्टापर्यंत पोहोचेल याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही. पण म्हणून आपण प्रयत्न करू नयेत का? आज दोन ते पाच टक्के लोकांनाच प्रयत्न केल्यावर नोकरी मिळते. पण, याचा अर्थ नकाराच्या भीतीने उरलेल्या ९५ टक्के लोकांनी प्रयत्न न करता स्वस्थ बसायचे ठरवले, तर काय भयानक परिस्थिती उद्भवेल याची कल्पनाही करता येत नाही. कधीतरी आपण त्या दोन ते पाच टक्के नोकरी मिळवणार्‍या लोकांमध्ये पोहोचू शकू, हा विश्वास शेवटी महत्त्वाचा आहे.पहिल्यांदा जेव्हा नकाराची अनुभूती भावनिक क्षोभ निर्माण करते तेव्हा त्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढून शांत ठेवायचा प्रयत्न करावा, जेणेकरुन आपले प्रगल्भ विचार आपल्या मनाचा ताबा घेऊ शकतील. मन जरा शांत झाले की, हे नक्की का झाले व कसे झाले, याचा विचार करायचा. स्वतः थोडे वस्तुनिष्ठ राहून विचार केला, तर आपण काही करू शकलो असतो का, याचे उत्तर सापडू शकेल. वस्तुनिष्ठ राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या भावनांना आपण ताब्यात ठेवू शकतो. आपले मन आवश्यक असणार्‍या बदलांसाठी मोकळे ठेवू शकतो. अशावेळी स्वत:ला महत्त्वाचा प्रश्न विचारणे आवश्यक आहे तो म्हणजे, ‘मी स्वत:ला बदलू शकतो का?’ नकार म्हणजे आपल्या जीवनपथावरचा शेवट नव्हे. आपल्या जीवनाचा मार्ग जेव्हा आपणच निर्माण करतो, तेव्हा अडमडणे आलेच व ठेचाळणे असणारच. पण, महत्त्वाचे काय आहे की, तुम्ही स्वत:ला सांभाळून पुन्हा उभे कसे राहू शकता? कारण, थांबला तो संपला. कधीकधी व्यवहारचातुर्य वापरले, तर ज्या रस्त्यावर आपण अडखळलो हे लक्षात येताक्षणी आपल्याला दुसरा रस्ता शोधायला सुरुवात करणे सोपे जाईल. या नव्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जास्त सोयीस्कर वाटायला लागेल. थोडक्यात काय, तर पुनश्च प्रयत्न करायचा. जिथे नकार मिळाला आणि आत्म्याला ठेच पोहोचली तिथे थांबायचे नाही. ही गोष्ट अशासाठी महत्त्वाची की, ठेचाळलेले व दुखावलेले मन खच्ची होत राहणार. नैतिक खच्चीकरणांतून मनाची ऊर्जा संपलेली व आत्मविश्वास ढळलेला असला, तर पुन्हा त्याच घोड्यावर स्वार व्हायला जमत नाही. यासाठी पुन्हा एकदा तिथेच संधी न मागता त्या परिस्थितीतून बाहेर पडणं आवश्यक आहे. नव्या दमाने आणि नव्या आत्मविश्वासाने नवी दिशा चोखाळणे कधीकधी व्यावहारिक शहाणपणाचे द्योतक आहे. यशाचे गमक आहे.

 
 

दुसरा सर्वसामान्य मार्ग म्हणजे, आपला ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांनी आपल्याला साथ दिली अशा मित्रमंडळींमध्ये पुन्हा सामील होणे. आश्चर्य वाटेल, पण पुन्हा आपल्या माणसांच्या सहवासात रममाण होताना मिळणारं प्रोत्साहन अनोखं असतं. आत्म्याला सामर्थ्य देणारं असतं. सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे, सगळ्या जगाने झिडकारल्यावरसुद्धा स्वत:च्या मनाला प्रेमानं जगवणारे आपले स्वत:चेच सक्षम विचार. नोकरीत नकार, प्रेमात नकार, कुटुंबात नकार, समाजात नकार, नकारच नकार. पण, तरीही स्वत:चा आत्मसन्मान सांभाळणारा शेवटी समाधानीच राहतो. कारण, मन सक्षम व समर्थ असतं. आपली वेगळी अशी सात्विक आणि तात्त्विक वाट घेऊन चालणारे जगातील अनेक लोक इतरांपेक्षा वेगळे असतात. अशावेळी जगानं त्याना स्वीकारावं, अशी परिस्थिती असेलच असे नाही. केवळ इतरांच्या जगण्याच्या व्याख्येत न बसणारे, कितीही प्रामाणिक असले व सच्चे असले तरी, अनेक लोक झिडकारले जातात ते बर्‍याचदा त्यांच्या त्या अनमोल स्वभावप्रवृत्तीमुळे. अशावेळी ते आपली ’एकला चलो रे’ वृत्ती मात्र सोडत नाहीत. कारण, त्यांचा ठाम विश्वास असतो स्वत:वर व स्वत:च्या कर्तृत्वावर. एकूण काय, तर नकारामुळे उद्भवणार्‍या भावनिक जखमा भरून काढणे शक्य आहे. त्यातून होणारे मानसिक खच्चीकरण थांबविणेही शक्य आहे.

 
 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/