चित्रपट व्यवसायाचे बदलते गणित
महा एमटीबी   10-Nov-2018चित्रपटाच्या पूर्वी केलेल्या प्रसिद्धीमुळेच हा चित्रपट पहिल्याच दिवशी ४०-५० कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर गोळा करणार, अशी भाकितं करण्यात आली होती. मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच ५२.२५ कोटींपेक्षा जास्त गल्ला या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जमवला आणि याचबरोबर ‘बाहुबली २’ व ‘हॅप्पी न्यू ईयर’चारेकॉर्ड मोडीत काढला.

 

दोनच दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्यासारख्या मोठ्या नायकांचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. साहजिकच या चित्रपटाचे जोरदार विपणन करण्यात आले. अमिताभ बच्चन, आमीर खान बरोबरच कतरिना कैफ, फातिमा सना शेख हेसुद्धा कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पूर्वी केलेल्या प्रसिद्धीमुळेच हा चित्रपट पहिल्याच दिवशी ४०-५० कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर गोळा करणार, अशी भाकितं करण्यात आली होती. मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच ५२.२५ कोटींपेक्षा जास्त गल्ला या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जमवला आणि याचबरोबर ‘बाहुबली २’ व ‘हॅप्पी न्यू ईयर’चा रेकॉर्ड मोडीत काढला. या चित्रपटाला नंतर बऱ्याच समीक्षकांनी नाकारलं, हे ही तितकचं खरं. असे असूनसुद्धा दुसऱ्या दिवशीच्या कमाईत मात्र तब्बल ३२ कोटी रुपयांची भर पडली. या चित्रपटाच्या यशापयशाची गणितं ही नंतर तपासली जातीलही. मात्र, चित्रपटाचं निर्मितीमूल्य, त्याचं करण्यात आलेलं मार्केटिंग आणि प्रदर्शन याची गणितं बघितल्यास हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला, असंच आपण म्हणू शकतो.

 

चित्रपटाची प्रसिद्धीपूर्वी कमाई

 

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची निर्मिती जवळपास २१० कोटी रुपयांमध्ये झाली होती. यात काही रक्कम कमी-जास्त असू शकते. मात्र, २०० कोटींपेक्षा जास्त खर्च हा नक्कीच आला होता. या चित्रपटाला त्याचे डिजिटल आणि सॅटेलाईट अधिकार विक्रीतून १४० कोटी रुपये मिळाले. अॅमेझॉन प्राइम नेटवर्क आणि सोनी टेलिव्हीजन यांनी ७०-७० कोटी रुपयांना हे अधिकार विकत घेतले. या दोन्ही संस्थांचा ‘यशराज फिल्म्स’सोबत खूप जुना संबंध आहे. याखेरीज चित्रपटाला इतर कोणत्या घटकांतून पैसे मिळतात, हेसुद्धा आपण बघूया. चित्रपटाला त्यातील संगीताचा हक्क विकून पैसा कमवता येतात. ‘इन सिनेमा ब्रँडिंग,’ तर काही उत्पादन जी आहेत किंवा चित्रपटाचे नाव जोडले जाते त्याद्वारे चित्रपटाला पैसा मिळतो. प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसमध्ये प्रेक्षक चित्रपटाचे तिकीट खरेदी करतात त्याद्वारे पैसा मिळतो. चित्रपटगृहात प्रसिद्धींच्या गोष्टींद्वारे पैसा मिळतो. अशी वेगवेगळी चित्रपटांची पैसे मिळवण्याची माध्यमे आहेत. परंतु, सर्वात मोठं आणि महत्त्वाचे माध्यम म्हणजे ‘प्रत्यक्ष तिकीट विक्रीहोय. या प्रत्यक्ष तिकीट विक्रीची गणितंसुद्धा काळाप्रमाणे बदललेली दिसतात.

 

काळाप्रमाणे चित्रपटाचे बदलेले गणित

 

सुरुवातीच्या काळी चित्रपट चार आठवडे चालला तरी तो यशस्वी ठरायचा. त्यानंतर पहिला बोलपट ‘आलम आरा’ आला. तो १२ आठवडे चालला आणि चित्रपटाच्या यश- अपयशाची गणितं तिथूनच बदलली. त्यानंतर ५० दिवस चाललेला चित्रपट ‘हिट,‘ १०० दिवस चाललेला चित्रपट ‘सुपरहिट,’ २५ आठवडे चाललेला चित्रपट ‘सिल्व्हर ज्युबली,’ ५० आठवडे चाललेला ‘गोल्डन ज्युबली,’ ७५ आठवडे चाललेला चित्रपट ‘प्लॅटिनम ज्युबली,’ अशी चित्रपटाबद्दलची यशापयशाची गणित मांडली जात होती. मात्र, काळाप्रमाणे यात बदल झाला. मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होऊ लागली. फक्त हिंदीच नव्हे, तर इतर भाषांमधील चित्रपटांच्या प्रदर्शनाची गरजही वाढली. लोकप्रियता मिळवणे आवश्यक ठरू लागले. देशोदेशीचे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. त्यांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग होऊन ते प्रदर्शित झाले. त्यामुळे चित्रपटांची ही गणितं बदलून ‘किती दिवस’ यापेक्षा एकूण ‘किती गल्ला’ गोळा होतो यावर चित्रपटाचे यशापयश ठरू लागले. यात आमीर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटाने पहिल्यांदा १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आणि ‘१०० कोटी रुपये’ हे चित्रपटांच्या यशापयशाचे गणित म्हणून किंवा एक निर्देशांक म्हणून मानले जाऊ लागले. नंतरच्या काळामध्ये १०० चे २०० कोटी रुपये, २०० चे ३०० कोटी रुपये असा हा टप्पा वाढतच गेला. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित करून, दोन ते तीन आठवड्यांत चित्रपटाचं यशापयश ठरू लागलं. जुन्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जमा झाल्या. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांत प्रदर्शित झाला आहे. थ्रीडी रुपातसुद्धा उपलब्ध झाला आहे. जवजवळ जगभरात सात हजार पडद्यांवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापैकी पाच हजार चित्रपटगृहं ही भारतातील आहेत आणि दोन हजार हे भारताबाहेरील आहेत. भारताबाहेरचा विचार करता, डॉलर, पौंड किंवा इतर विदेशी चलनांमधून मिळालेली कमाईसुद्धा आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानसारख्या देशातसुद्धा म्हणजे जिथे हिंदी चित्रपटांना विरोध केला जातो, तिथेसुद्धा १२० चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आमीर खान हा चीनमध्ये जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे चीनमध्येसुद्धा हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. आमीर खानचे अनेक चित्रपट चीनमध्ये मोठ्या प्रमाणवर यशस्वी झाले होते. तेव्हा चीनमध्येसुद्धा १४५ कोटी रुपयांचे अधिकार ‘ए. ई. स्टार फिल्म कंपनी’कडून मिळालेले आहेत. ‘यशराज’ हे चित्रपटाचे वितरण करत आहे. त्यांची स्वत:ची वितरण व्यवस्था आहे आणि त्याद्वारे त्यांनी या चित्रपटाची खूप मोठी प्रसिद्धी केली आहे. यु-ट्यूबसुद्धा या चित्रपटाच्या टीझरने किंवा वेगवेगळ्या व्हिडिओंनी अगदी ओसंडून वाहते आहे. जेव्हा एखादा निर्माता चित्रपट प्रदर्शित करतो, तेव्हा चित्रपटाच्या वितरणावर देखील त्याला सर्वात जास्त भर द्यावा लागतो आणि अशा वेळी या स्पर्धेत अगदी मुरलेले निर्मातेच तग धरतात. यात तुलनेने छोट्या आणि नवीन चित्रपट निर्मात्याला चित्रपट जरी चांगला असला तरी, चित्रपटगृह सहजासहजी उपलब्ध होत नाही. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जवळजवळ ५० कोटी रुपये मोठ्या ‘सुपरस्टार’च्या चित्रपटासाठी खर्च केले जातात तेव्हा छोट्या निर्मात्यांना एवढा खर्च परवडणारा नसतो. तरीदेखील चित्रपट चालवायचा आहे, तर चित्रपटाचा खर्च उचलावा लागतो. परंतु, ते काही परवडणारे नसते. त्यामुळे मग छोटे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत नाहीत किंवा त्या चित्रपटांना तितकीशी बाजारपेठ मिळत नाही.

 

चित्रपटांची वितरण प्रक्रिया

 

चित्रपटाचा जेव्हा मुहूर्त ठरतो, त्यावेळी बरेचसे वितरक ठरविले जातात. मात्र, मुळात चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाला सिनेमागृहात पोहोचविण्यासाठी प्रत्यक्ष वितरक हे जबाबदार असतात आणि चित्रपटात जे काही असेल, उदा. त्याचे कथानक, अभिनय, संगीत, चित्रण हे सगळं कितीही चांगलं असलं तरी, ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम हे वितरकाचंच असतं. त्यामुळे वितरणाला चित्रपटात खूप महत्त्वाचं स्थान आहे.

 

चित्रपट वितरक काय करतो?

 

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरविल्यावर यात अर्थात सुट्टीचे दिवस, आठवड्याची अखेर, सण किंवा विशिष्ट मुहूर्त मग दिवाळी असो, ईद असो, ज्यावेळी लोकांना वेळ असतो किंवा लागून उन्हाळी सुट्ट्या, नाताळ सुट्टी असे दिवस असतात त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो.

 

निर्माता आणि वितरक यांच्यातील व्यापाराचे स्वरूप

 

निर्माता आणि वितरक यांच्यात दोन प्रकार असतात. एक असतो तो वितरक, जो पूर्णत: पैसे देऊन चित्रपट खरेदी करतो आणि त्यावेळी वितरक चित्रपट बघतो आणि मग तो निर्मात्याला बघून चित्रपट स्वत: प्रदर्शित करतो आणि त्याचे एकत्रित पैसे देऊन पूर्ण वितरणाचे हक्क घेतो व चित्रपट जर चालला तर यात वितरकाला फायदा होतो. दुसरा भाग मिनिमम गॅरेंटी वितरक. स्वत: लावलेला पैसा पहिल्यांदा काढतो आणि मग नंतर येणारा ४० टक्के स्वत:ला आणि उरलेले ४० टक्के तो निर्मात्याला देतो. उर्वरित 20 टक्के हा इतर खर्च असतो. याखेरीज काही वितरक प्रदर्शकसुद्धा असतात. त्यांचे स्वत:चे चित्रपटगृह असते. सॅटेलाईटच्या आधारे चित्रपट दाखविला जातो. काही ठिकाणी प्रोजेक्टरवर दाखविला जातो. मात्र, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट वितरक आणि निर्मात्याचं नातं कसं आहे, चित्रपटाचं नाव किती मोठं आहे, त्यातील कलाकार किती मोठे आहेत, निर्माता कोण आहे? चित्रपटातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील कोणते कलाकार प्रसिद्ध आहे. म्हणजे अगदी जुन्या काळापासून पाहिलं, तर मिथुनदाचे चित्रपट आपल्याकडे फ्लॉप झाले तरी, बंगालमध्ये ते चालायचे. धर्मेंद्रचे पंजाबमध्ये चित्रपट सुपरहीट व्हायचे. रजनीकांतचे हिंदी चित्रपट तामिळमध्ये सुपरहीट होतात. त्यामुळे हा सगळा विचार वितरकांना करावा लागतो.

 

चित्रपट वितरणातील समस्या

 

मुळात आजकाल चांगले कथानक असलेले आणि कमी बजेटचे आणि कलाकार तुलनेने लोकप्रिय नसलेले चित्रपट येतात. त्यांना काही विशिष्ट मल्टिप्लेक्समध्ये जागाही मिळते, पण वितरक मात्र मिळत नाही. त्यांना चित्रपटगृह बहुदा मिळत नाही किंवा त्यांना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी, मार्केटिंगचा जो खर्च आहे तो झेपत नाही आणि त्यामुळे ते चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे आपण म्हणू शकतो. मोठ्या बॅनरचे जे चित्रपट असतात किंवा वेगवेगळे निर्माते असतात, त्यांची मदत न घेता, स्वबळावर ज्यांना चित्रपट निर्मिती करायची आहे, अशा निर्मात्यांना ही गोष्ट कठीण जाते. बऱ्याचवेळा चित्रपटासाठी जितका पैसा लागत नाही, त्यापेक्षा अधिक पैसा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि वितरणासाठी लागतो. मार्केटिंग असेल तरच वितरक त्यामध्ये रस घेतो, हेही तितकेच खरे. बऱ्याचशा चांगल्या कलाकृतींना चित्रपटगृहाचे मालक दुय्यम वागणूक देतात आणि त्यामुळे चांगले चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत नाहीत. चित्रपटगृहाचे मालक प्रदर्शन आणि जाहिरात यावर केलेला खर्च बघून त्याचं ‘स्थान’ ठरवतात. त्यामुळे ते बऱ्याच चित्रपटांचे वितरणच करत नाही. स्वतंत्र निर्मिती असणाऱ्या चित्रपटांचे विषय वेगळे असतात, कथानक वेगळे असते, कलाकार बऱ्याचदा हे अपरिचित असतात अशा चित्रपटांना लवकर वितरक मिळत नाही. वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत असा चित्रपट कसा पोहोचतो, हे बघणे जास्त महत्त्वाचे आहे. पण तसे होत नाही. परंतु, आजकाल समाजमाध्यमांमुळे या ट्रेंडमध्ये फरक पडला आहे. जितक्या मोठ्या प्रमाणावर मोठे निर्माते खर्च करतात, तितक्या मोठ्या प्रमाणावर चौथा निर्माता किंवा स्वतंत्र निर्मार्त्याला काम करता येत नाहीत, हे सत्य आहे. बरेच चांगले चित्रपट हे आपण नंतर कधीतरी टिव्हीवर बघतो.

 

मराठी चित्रपट आणि वितरण

 

मराठी चित्रपट मुळात आशयप्रधान, कथानकप्रधान असतात. हे चित्रपट ग्रामीण किंवा निमशहरी भागांवर आधारित असतात. मराठी चित्रपटांना हक्काची बाजारपेठ असते. सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद अशा ‘ब’ दर्जाच्या शहरांत मराठी चित्रपट खूप चालतात. मोठ्या शहरांत आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तर तो चित्रपट यशस्वी ठरत नाही. मध्यंतरी काही राजकीय पक्षांनीसुद्धा चित्रपट वितरकांना आणि चित्रपटगृह मालकांना याबद्दल इशारे दिले होते. मात्र, तरी यात विशेष फरक पडला असे आपल्याला दिसत नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची जी वेळ असते ती संध्याकाळची वेळ, शुक्रवार, शनिवार, रात्रीचे शो अशी असते. तालुका किंवा तालुकावजा गावातील एक पडदा चित्रपटगृहदेखील हल्ली बंद पडली आहेत आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर मल्टिप्लेक्समध्ये वाढ झाली आहे आणि एक पडदा चित्रपटगृह चालवणे आता परवडत नाही. त्यामुळे मराठी चित्रपटांना हक्काची प्रदर्शनाची चित्रपटगृहे मिळत नाही, असे आपण म्हणू शकतो. मर्यादित बजेटमध्ये तयार होणारे चित्रपट हे त्यांच्या आर्थिक गणितानुसार यशस्वी होत असतील. मात्र, त्यांचा प्रेक्षकवर्ग हा मर्यादित असतो. महाराष्ट्रात ग्रामीण भागात चित्रपट प्रेक्षकांची संख्या खूप मोठी आहे, परंतु, मराठी चित्रपट निर्माते ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. यात ‘सैराट’सारखा चित्रपट अपवाद असतो. ज्यात ग्रामीण कथानक असलं तरी तसं कथानक शहरातही घडत असतं. हिंदी चित्रपटांना ‘रिपीट प्रेक्षक’ जास्त असतो.हे मराठी चित्रपटांच्या बाबतीत होत नाहीत.त्यामुळे मराठी चित्रपटांचे अपयश आणखी जास्त जाणीवपूर्वक दिसून येते. टिव्हीवरील प्रसारणाचे हक्क, विदेशातील हक्क यात मराठी चित्रपट मागे पडतो व त्यांना हवा तितका पैसा मिळत नाही. मराठी चित्रपट हा तिकीट बारीवर यशस्वी होण्याची आवश्यकता आहे. वाढलेले अर्थकारण, प्रसिद्धीमध्ये मराठी चित्रपट मागे पडतो. त्यामुळे यावर मराठी चित्रपटाने भर द्यावा, असे वाटते, तरच मराठी चित्रपट सर्वसमावेशक किंवा भावणारा होऊ शकतो.

 

-प्रा. गजेंद्र देवडा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/