व्वा! अशोकराव!!
महा एमटीबी   01-Nov-2018

 
परवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि घोटाळ्यात ‘आदर्श’ ठरलेले अशोकराव चव्हाण भारीच संतापले होते. राज्यातल्या शेतकर्यांबद्दल कधीनव्हे एवढी कणव त्यांना दाटून आली होती. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या हितासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा कांगावा करायला त्यांची वाणी जणू सळसळत होती. कंठ कसा दाटून आला होता त्यांचा. तसेही, सत्ता हातून गेल्यापासून कॉंग्रेसच्या तमाम जनांना आता अचानक गोरगरिबांचे हितैषी, शेतकर्यांचे कैवारी, शोषित-पीडितांचे प्रेषित व्हावेसे वाटू लागले आहे. आपल्या काळात आपण काय दिवे लावले होते, याची पूर्ण कल्पना आणि जाणीव असली, तरी सध्याच्या सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करायला त्या पक्षाचे नेते कसे त्वेषाने सरसावले आहेत. निवडणुकीच्या मुहूर्तावर तर तलवारी पाजळून सिद्ध झालेत सारे सरकारवर तुटून पडायला. हा मुहूर्त जसजसा जवळ येतोय् तसतशी आवेशालाही धार चढतेय् त्यांच्या! आता आपल्या अशोकरावांचेच बघा ना! केवढा म्हणून त्रागा झाला त्यांचा.
 
 
शेतकरी असा दुष्काळात असताना सरकार नुसतेच स्वस्थ बसले असल्याचा आरोप आहे त्यांचा. पत्रकारांसमोर बोलताना तर त्यांच्या मनातला राग नको तेवढ्या तीव्रतेनं व्यक्त होत होता. (हो! त्याशिवाय ते रागावलेत, हे कळणार कसे कुणाला? आणि कुणालाच कळले नाही तर मग अर्थ काय उरतो त्यांच्या संतापण्याला?) तर, स्वारी जाम संतापली. म्हणाली, मुंबईत वातानुकूलित खोलीत बसणार्या मुख्यमंत्र्यांना, उन्हातान्हात काम करणार्या, अहोरात्र राबणार्या शेतकर्यांच्या वेदना कळणार कशा? शेतकर्यांना बसणारी झळ त्यांना कशी कळणार? खरं आहे अशोकरावांचं! इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या खोलीतला एसी काढूनच टाकला पाहिजे बघा! हो! खुद्द चव्हाणसाहेबांनीही उन्हातान्हात बसूनच मुख्यमंत्रिपदाचा कारभार चालवला होता!
 
 
कॉंग्रेसच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी तोच कित्ता गिरवला होता. हो की नाही हो चव्हाणसाहेब? खरंतर याच शेतकर्यांच्या वेदना ध्यानात ठेवून या पक्षाचा प्रत्येक नेता आजवर राजकारणात वावरला. शेतकर्यांसाठीच्या संघर्ष यात्रेसाठी एसी बसगाड्या आणल्या. लुच्चे लेकाचे. अशोकरावांच्या वेदना कळल्याच नाहीत त्यांना. उपाय नसल्याने एसी बसमध्ये बसावेच लागले. पर्यायच नव्हता. फक्त शेतकर्यांच्या हितासाठी. दस्तुरखुद्द अशोकराव चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला तोदेखील शेतकर्यांच्या हितासाठीच! त्या इमारतीतले फ्लॅटस्, जे त्यांनी स्वत:च्या नातेवाईकांसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना, आपल्या बापजाद्यांची संपत्ती समजून खिरापतीसारखे वाटले होते, तेदेखील बळीराजाच्या हितासाठीच! एरवीही चव्हाणसाहेब आणि त्यांच्या पक्षाने, अगदी त्यांच्या सहकारी पक्षाच्या नेत्यांनीही कालपर्यंत सत्तेत असताना जे काही केले, ते सारे शेतकर्यांचे हित ध्यानात ठेवूनच केले होते. कोळसा घोटाळ्यापासून तर कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनातील गडबडीपर्यंत सारेकाही फक्त शेतकर्यांसाठी होते. अगदी पवारसाहेबांनी आदिवासींच्या जमिनीवर डल्ला मारून उभारलेली लवासा सिटी असो, की साहेबांच्या पक्षनेत्यांनी शेतकर्यांच्या जमिनी
 
 
उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी उभारलेले सेझ प्रकल्प असोत, सारेकाही शेतकर्यांच्या हितासाठीच होते, याचा विश्वास बाळगा लोकहो! दुष्काळाचे निमित्त करून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून लावल्या जाणार्या चारा छावण्या आणि पाणी पुरवण्याच्या निमित्ताने उभारलेल्या टँकर चेनमधून पोटं जरी त्या पक्षाच्या चेल्याचपाट्यांची भरत जात असली, तरी योजना मात्र शंभर टक्के शेतकर्यांच्या हिताची होती, याचीही खात्री बाळगावी बळीराजाने. कापसाचे भाव काय, शेतमालाच्या आधारभूत किमती काय, खतं-बियाण्यांचा काळाबाजार काय... कुणाच्या फायद्यासाठी होता सांगा? अहो, यात वेगळं काय सांगायचं? शेतकर्यांच्याच फायद्याचं! अशोकराव चव्हाण म्हणतात ते काय खोटं आहे? दुष्काळ पडला रे पडला की, लागलीच वातानुकूलित खोलीतून बाहेर पडलेले असायचे चव्हाणसाहेब! शेतकरी उन्हात तर मीही उन्हातच राहणार, असा पण केलेला असायचा त्यांनी! बेचैन असायचे शेतकर्यांच्या प्रश्नांवरून. रात्ररात्र झोप लागायची नाही त्यांना.
 
खरं सांगायचं तर, चव्हाणसाहेबांएवढे शेतकरीहिताचे काम आजवर कुणीच केले नाही (असे त्यांचे स्वत:चे मत आहे!) शेतकर्यांच्या हालअपेष्टाही त्यांच्याएवढ्या कुणालाच कळल्या नव्हत्या बघा! शक्य झाले असते ना, तर सत्तेच्या त्यांच्या काळात त्यांनी दुष्काळ पडूदेखील दिला नसता! पण, ते त्यांच्या हातात नव्हते. म्हणून मग दुष्काळ पडल्यावर त्यांनी चारा छावण्या, टँकर घोटाळ्याचे मार्ग शोधले. त्यांच्या बगलबच्च्यांनी तिथेही खाबुगिरी केली. पण, एक मात्र खरं बरं! ही खाबुगिरीदेखील त्यांनी केली, ती फक्त शेतकर्यांचे हित ध्यानात ठेवून. त्यामुळे त्यांच्या हेतूवर शंका घ्यायलासुद्धा जागा नाही कुठेच. सत्तर हजार कोटींची कर्जमाफी करूनही प्रत्यक्षात शेतकर्यांपर्यंत ती पोहोचली नाही, प्रशासनिक पातळीवर त्याची वाट लागली, अधिकारी-बाबूंनीच हजम केला सारा पैसा, यातही कुणाचा दोष नव्हता बरं! उलट, कास्तकारांच्या लाभाचा विचार करूनच प्रशासनाने शेण खाल्ले अन् ती वस्तुस्थिती ध्यानात ठेवूनच तत्कालीन सरकारने एकाही खादाड अधिकार्याला हात लावला नाही.
 
 
तर, लोकहो! सांगायचा मुद्दा असा की, अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या पूर्वीचे, त्यांच्या पक्षाच्या तालमीत तयार झालेले तमाम मुख्यमंत्री फक्त शेतकर्यांच्या हितार्थ जगले. यांचे सरकारी बंगले, त्यातील सार्या सुविधा त्यांनी उपभोगल्या त्याही केवळ लोककल्याणार्थ. ऐन दिवाळीत शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून ऊस जाळणे असो, की मग कधीकाळी शरद जोशींच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर झालेला अमानुष लाठीमार... सर्व घडामोडींत केवळ आणि केवळ शेतकर्यांच्या कल्याणाची भावना सामावलेली होती सरकारच्या मनात. त्यामुळे सध्याचे सरकार यातले काहीच करीत नसल्याची खंत अशोक चव्हाणांसारख्या ‘आदर्श’ फेम नेत्याला असणे स्वाभाविकच. त्यांनी तशी ओरड करणे हेदेखील निसर्गदत्त. तेव्हा लोकहो, चव्हाणसाहेबांचे, त्यांच्या कॉंग्रेस पक्षाचे शेतकरीप्रेम लक्षात घ्या. त्यांची खाबुगिरी दुर्लक्षित करा. त्यांनी नागवले होते, रडकुंडीला आणले होते, हे विसरून जा. त्यांची धोरणे चुकीची होती, याची चर्चाही करू नका. त्यांनी शेतकर्यांच्या समस्यांचे कायम राजकारण केले, हेही मनातून काढून टाका. आता लक्षात घ्या त्यांचे (बेगडी) प्रेम. त्यांची नौटंकी. आपल्यासाठी त्यांनी व्यक्त केलेल्या त्राग्यामागील राजकारणही समजून घेतले की, मग निवडणुकी जवळ आल्या असल्याचे आपसूकच ध्यानात येईल आपल्या...