आले ‘झीरो’ चे पोस्टर!
महा एमटीबी   01-Nov-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा बहुचर्चित सिनेमा ‘झीरो’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. शाहरुख सोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघी या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी ‘जब तक है जान’ सिनेमात या तिघांनी एकत्रित काम केले होते. त्यानंतर आता हे त्रिकुट प्रेक्षकांना ‘झीरो’च्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. अभिनेता शाहरुख खान याने झीरोमध्ये एका बुटक्या तरुणाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
 
 
 
 

सिनेमाची कथा या बुटक्या तरुणाभोवती फिरते. हा तरुण एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. ही अभिनेत्री कतरिना कैफ हिने साकारली आहे. तसेच या सिनेमात अनुष्का शर्मा हिने एका अपंग मुलीची भूमिका साकारली असल्याचे कळते. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुख हा अनुष्कासह तिच्या व्हिलचेअरवर बसलेला दिसतो. या पोस्टरमुळे प्रेक्षकांची ‘झीरो’विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. बॉलिवुडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांनी या सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली आहे. श्रीदेवी यांनी केलेला हा अखेरचा सिनेमा आहे. २ नोव्हेंबर रोजी ‘झीरो’चा ट्रेलर प्रदर्शित होत आहे. २०० कोटी रुपयांचा हा बिग बजेट सिनेमा असून येत्या २१ डिसेंबर रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहात येत आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/