मेजर सोमनाथ शर्मा आणि कौशिक धर
महा एमटीबी   01-Nov-2018परवा २७ ऑक्टोबर, २०१८ या दिवशी देशभरातल्या भूदल सैनिकी छावण्यांमध्ये ‘इन्फन्ट्री डे’ साजरा झाला. त्या निमित्ताने या पायदळाच्या दिवसाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर टाकलेला हा प्रकाश...

 

आपल्याकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत सारखेच कसले कसले दिवस साजरे होत असतात. खरं पाहता त्या त्या क्षेत्रांतल्या कर्तबगार व्यक्तींच्या स्मरणाचा काँग्रेसी संस्कृतीच्या पुढाऱ्यांनी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी या दिवसांचा पार चुथडा करून टाकला आहे. पुढाऱ्यांची भंपक भाषणं आणि कार्यकर्त्यांचं पुढे-पुढे करणं, यातून असलेली प्रेरणसुद्धा नष्ट होते. सुदैवाने सैनिकी दलांना ही लागण झालेली नाही. ज्या कारणासाठी दिवस साजरा केला जातो, त्याचं महत्त्व, गांभीर्य आणि पावित्र्य कसोशीने राखलं जातं. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातली चेतना, प्रेरणा आणि राष्ट्रीय अस्मिता यांना उजाळा मिळतो. भाले-तलवारी यांना पुनःपुन्हा पाणी पाजून धारदार ठेवलं जात असे. बंदुकांना पुनःपुन्हा तेलपाणी करून अद्ययावत ठेवल जातं, तसं व्यक्तीच्या चित्ताचं भांडं लखलखीत ठेवण्यासाठी अशा दिवसांची गरज असते.

 

तसा १५ जानेवारी, हा ‘सेना दिवस’ आहेच, पण सेनेत म्हणजे भूदलामध्येसुद्धा अनेक विभाग, उपविभाग आहेत. त्यापैकी ‘इन्फन्ट्री’ म्हणजे पायदळाचा दिवस आहे २७ ऑक्टोबर. यंदाचा हा ७१ वा पायदळ दिवस होता. भारत स्वतंत्र झाल्यावर फक्त सव्वादोन महिन्यांतच भारतीय सैन्यावर काश्मीर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. ती निभावण्यासाठी पायदळाची १६१व्या इन्फन्ट्री ब्रिगेडची पहिली ‘शीख’ ही बटालियन दि. २७ ऑक्टोबर १९४७ या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता श्रीनगरच्या विमानतळावर उतरली. तिचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल रणजित राय. यानंतर अभूतपूर्व असा रणसंग्राम झाला. स्वतंत्र भारताच्या सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण शौर्याने आणि युक्तीने शत्रूचा साफ बिमोड केला. भारतीय पायदळाची ही आगेकूच सुरू राहिली असती तर काश्मीर पूर्णपणे मुक्त झालंच असतं. पण, खुद्द पाकिस्तानचंच अस्तित्व टिकणं अशक्य झालं असतं, असा अभिप्राय लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांनीच व्यक्त केलेला आहे. हा भीमपराक्रम मुख्यत: पायदळाने गाजवला. हवाई दलाने त्याला थोडी साथ दिली, पण थोडीच. कारण, हवाई दलाकडे पुरेशी विमानं आणि पुरेसं मनुष्यबळ होतंच कुठे? त्यामुळे पायदळाच्या क्षात्रतेजाची ही कसोटी होती. पायदळ त्या परीक्षेला पुरेपूर उतरलं. ते स्मरण जागवण्यासाठी २७ ऑक्टोबर हा ‘इन्फन्ट्री डे.’

 

भारतीय सेना अतिशय गांभीर्याने हा दिवस साजरा करते. त्या निमित्ताने लेफ्टनंट कर्नल रणजित राय, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर एल. पी. सेन, शिपाई दिवानसिंह यांच्यासह असंख्य ज्ञात आणि अज्ञात वीरांचं स्मरण केलं जातं. त्यांनी रक्त सांडलं, त्यांनी डोकं वापरून शत्रूला कात्रीत पकडलं म्हणून काश्मीर बचावलं. त्यांच्याप्रति आपण सगळे कृतज्ञ आहोतच, पण फक्त १० वर्षांचा तो कौशिक धर, जेमतेम २5 वर्षांचे ते चंद्रप्रकाश आणि वेदप्रकाश ते जगदीश अब्रोल, ते प्रा. बलराज मधोक, ते पंडित प्रेमनाथ डोगरा आणि इतर शेकडो, हजारो ज्ञात-अज्ञात संघ स्वयंसेवक यांच्याबद्दल कृतज्ञता कुणी व्यक्त करायची? त्यांना स्वतःला कसलीच कीर्ती नि प्रसिद्धी नको होती. आपापलं कार्य पार पाडून ते कधीचेच अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. त्यांची आठवण काढणं, त्यापासून प्रेरणा घेणं हे आपण नाहीतर कोण करणार? जम्मू-काश्मीर या संस्थानी प्रदेशात १९३९ साली बलराज मधोक या तरुणाने रा. स्व. संघाची शाखा सुरू केली. बलराजजींच्या अथक प्रयत्नांनी लवकरच शाखांची संख्या आणि उपस्थिती वेगाने वाढू लागली. बलराजजींच्या कामाची महत्त्वाची उपलब्धी म्हणजे राज्यातल्या एका ऐतिहासिक, पराक्रमी अशा अब्रोल घराण्यातला जगदीश हा युवक संघात तर आलाच, पण प्रचारक बनला. खेरीज पंडित प्रेमनाथ डोगरा हे अत्यंत प्रतिष्ठित गृहस्थ संघात आले. त्यांच्याकडे संघचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

 

काश्मीरचे महाराज हरिसिंह यांनी भारतात सामील होण्यास विलंब लावला. तोपर्यंत पठाणी टोळीवाल्यांच्या वेषातील पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण करून बारामुल्लापर्यंत धडक मारली वगैरे कथा सांगितल्या जातात. सत्य हे आहे की, बलराज मधोक, पंडित प्रेमनाथ डोगरा, पंजाब प्रांत संघचालक रायबहादूर बद्रीदास, उत्तर प्रदेश प्रांत संघचालक, बॅरिस्टर नरेंद्रजितसिंह या सर्वांचा महाराजांशी उत्तम संपर्क होता. ते सर्वजण महाराजांना पाकिस्तानच्या आणि शेख अब्दुल्लाच्या घातकी कारवायांची माहिती देऊन सामीलनाम्यावर सही करण्यासाठी त्यांचं मन वळवत होते. महाराज या गोष्टीला अगदीच तयार नव्हते, असं नाही. पण, सामीलनाम्यावर सही म्हणजे नेहरूंना शरण जाणं, हा जो त्याचा अर्थ होता, तो त्यांना मानवत नव्हता. कारण, नेहरू काश्मीरची सत्ता शेख अब्दुल्लाकडे सोपवणार, हे अटळ भवितव्य होतं. अनेक मोठी माणसं महाराजांना भेटत होती, सल्लामसलती चालू होत्या. दि. १८ ऑक्टोबर १९४७ या दिवशी सरसंघचालक प. पू. श्रीगुरुजी महाराजांना भेटले. पण, महाराजांचा निर्णय होत नव्हता. तिकडे रावळपिंडीत महंमद अली जीनांनी निर्णय घेऊन टाकला. २६ ऑक्टोबरला ईद होती. या वर्षीच्या ईदची नमाज आपण श्रीनगरच्या मशिदीत अदा करणार, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानुसार २२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पठाणी टोळीवाल्यांच्या वेषातील पाकिस्तानी सैन्याने काश्मीर संस्थानावर हल्ला चढवला. संस्थानी सैन्यातल्या मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सहकाऱ्यांना ठार केलं आणि ते आक्रमकांना जाऊन मिळाले.

 

महाराजांनी सामीलनाम्यावर सही केली, पण दिल्लीत नेहरू आणि माऊंटबॅटन यांनी तो स्वीकारायला वेळ काढला. अखेर २६ ऑक्टोबरला तो स्वीकारण्यात आला. आता श्रीनगरमध्ये सैन्य पाठवायला हवं. पण, सैन्य आणि युद्धसामग्री यांच्या वाटणीमुळे सैन्याचं सगळं संघटन पार विस्कळीत होऊन गेलं होतं. लक्षात घ्या, यावेळी फाळणी होऊन नि स्वातंत्र्य मिळून जेमतेम सव्वा दोन महिने झाले होते. कशीबशी ‘१ शीख’ ही बटालियन सज्ज करून ‘डाकोटा’ या मालवाहू विमानातून २७ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता श्रीनगर विमानतळावर उतरविण्यात आली. हा विमानतळ सज्ज व्हावा म्हणून आधीचे छत्तीस तास संघाचे स्वयंसेवक मजुरांप्रमाणे राबले. केवळ श्रीनगरच नव्हे, तर जम्मू आणि पूँछ इथल्या धावपट्ट्याही स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी तयार केल्या.

 

२७ ऑक्टोबर नंतर ३१ ऑक्टोबरला मेजर सोमनाथ शर्मा यांची ‘४ कुमाऊँ’ ही रेजिमेंट श्रीनगरला उतरली. बडगामकडे निघालेल्या मेजर शर्मांच्या तुकडीला दिसलं की, जेमतेम दहा वर्षांचा एक पोरगा लाल रुमाल दाखवून आपल्याला थांबायला सांगतोय. ते थांबले. हा पोरगा होता कौशिक धर. संघाचा बालस्वयंसेवक. त्याने मेजर शर्मांना बडगाम परिसरातल्या घुसखोरांच्या ठिकाणांची इथ्यंभूत माहिती दिली. मेजर शर्मा त्याला बरोबर घेऊन पुढे निघाले. ३ नोव्हेंबर या दिवशी मेजर शर्मांच्या ८० लोकांच्या कंपनीवर तब्बल सातशे पठाणांनी आक्रमण केलं. प्रचंड शौर्य गाजवून मेजर शर्मा पडले. आता तर शत्रूला आणखीनच चेव चढला. ते पाहून दिवानसिंह भयंकर संतापला. कोण होता तो? तो एक साधा शिपाई म्हणजे ‘गनर’ होता. त्याने आपली मशीनगन कमरेवर पेलली आणि ‘कुमाऊँ रेजिमेंट’ची युद्धघोषणा ‘कालिका मैय्या की जय’ देत समोरच्या पठाणांवर वाघासारखी झेप घेतली. किमान ३० पठाण त्याने खटाखट उडवले. मुख्य म्हणजे, त्याची एक गोळी पठाणांच्या म्होरक्याची मांडी फोडून गेली. पठाणांनी थोडी माघार घेतली. तेवढ्या अवधीत ‘४ कुमाऊँ’च्या उरलेल्या कंपनीने वेढा फोडून सुरक्षित माघार घेतली. शिपाई दिवानसिंह आणि कौशिक धर दोघेही ठार झाले. मेजर शर्मा आणि शिपाई दिवानसिंह यांना मरणोत्तर अनुक्रमे ‘परमवीरचक्र’ आणि ‘महावीरचक्र’ मिळालं. ते रास्तच आहे. कौशिक धरला काय मिळालं? आमच्याकडच्या दहा वर्षांच्या किती मुला-मुलींना कौशिक धरचं नाव तरी माहित्येय?

 

आपल्या हवाई दलाच्या नजरचुकीने शस्त्रसामग्रीचे काही खोके शत्रूने व्यापलेल्या क्षेत्रात पडले होते. त्याच्याजवळच आपलं गाव होतं कोटली. तिथला संघाचा कार्यवाह होता चंद्रप्रकाश नावाचा तरुण. त्याने आपल्या शाखेवर सांगितलं की, ते खोके गुपचूप उचलून आणण्यासाठी सैन्याला आपली मदत हवीय. मात्र, यात जीव जाण्याची जवळजवळ खात्री आहे. त्यावर शाखेत उपस्थित तरुण निवडावे लागले. तेव्हा उरलेले लोक नाराज झाले. जीवाची बाजी लावून या आठ जणांनी ते खोके सुखरूप आणले. त्यात वेदप्रकाश आणि आणखी दोघे मरण पावले आठांपैकी चौघे उरले. काश्मीर भारतातच राहिला पाहिजे, यासाठी खर्ची पडलेल्यांना अशा अनेकांना अभिवादन.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/