विधिमंडळ सदस्यांना एसटीमधून मोफत प्रवास
महा एमटीबी   09-Oct-2018
 
 

मुंबई : महाराष्ट्राच्या सन्माननीय आजी-माजी विधिमंडळ (विधान सभा/परिषद आमदार) सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकार्‍यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

 
 
महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या सन्माननीय व्यक्ती विधानपरिषद अथवा विधानसभेत निवडून आल्या आहेत अशा आजी व माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकार्‍यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधानमंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आजी व माजी विधिमंडळ सदस्यांनी सर्वसामान्यांचे हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एसटीमधून प्रवास केल्यास, त्यातून सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. यातून असुरक्षित, अवैध व खाजगी वाहतुकीऐवजी सुरक्षित व वक्तशीर धावणार्‍या एसटीचा पर्याय जास्तीत जास्त लोकांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन रावते यांनी केले.
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/