गुजरातमधील उत्तर भारतीय प्रश्न चिघळला
महा एमटीबी   09-Oct-2018
 
 

अहमदाबाद : गुजरातमधील उत्तर भारतीयांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच चिघळू लागला असून उत्तर प्रदेश, बिहारमधून रोजगारासाठी गुजरातमध्ये आलेले हजारो लोक पुन्हा आपापल्या गावांकडे स्थलांतर करू लागल्याचे दिसत आहे. सुमारे २० हजारहून अधिक उत्तर भारतीयांनी गुजरात सोडून अन्यत्र स्थलांतर केल्याची माहिती मिळत असून उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे हात असल्याचा संशय असलेल्या सुमारे ४०० हून अधिक संशयितांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या हल्ल्यांमागे ठाकोर सेना या संघटनेचा हात असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते व आमदार अल्पेश ठाकोर हे या संघटनेचे प्रमुख असून उत्तर भारतीयांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करतानाचा अल्पेश यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होऊ लागल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

 

राज्यातील साबरकांठा जिल्ह्यात दि. २८ सप्टेंबर रोजी एका १४ वर्षीय गुजराती अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर साबरकांठा, मेहसाणासह राज्यातील सहा ते सात जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात गेल्या काही दिवसांपासून हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे रोजगारासाठी राज्यात आलेल्या उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश आदी राज्यांतील हिंदी भाषिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात गुजरात सोडून अन्यत्र जाऊ लागले आहेत. गुजरातमधून आतापर्यंत सुमारे २० हजारहून अधिक उत्तर भारतीयांनी स्थलांतर केले असल्याचा अंदाज आहे. औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुजरात राज्यातील या घटनेमुळे आर्थिक क्षेत्रातही फटका बसू लागल्याचे दिसत आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावरही हा मुद्दा आता तापू लागला आहे.

 

 
 

अल्पेश ठाकोर अडचणीत : गुजरात विधानसभेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान प्रकाशझोतात आलेले काँग्रेस नेते व आमदार अल्पेश ठाकोर या प्रकरणी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांना समाजमाध्यमांवरून प्रक्षोभक मजकूर प्रसिद्ध करून आणखी चालना दिल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी नुकतीच ठाकोर सेनेच्या राहुल परमार सोशल मिडिया समन्वयकाला अटक केली. तसेच, त्याच्या माध्यमातून असेच प्रक्षोभक संदेश पसरवणाऱ्या आणखी १०० हून अधिक कार्यकर्त्यांची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचेही समजते. अल्पेश ठाकोर हे या ठाकोर सेनेचे प्रमुख आहेत. दुसरीकडे, स्वतः अल्पेश ठाकोर यांचेच एक चिथावणीखोर भाषणही समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली असून गुजरातमधील या परिस्थितीला काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

 

पोलिसांकडून कठोर कारवाई : राज्यातील या खळबळजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने कडक पावले उचलली असून या प्रकरणी आतापर्यंत सुमारे ४३१ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्र असलेल्या व उत्तर भारतीय लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणली असून गेल्या ४८ तासांत अशी हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केला असून लोकांनी हिंसाचाराला थारा न देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

..तर स्वतःहून तुरुंगात जाईन ! : गुजरातमध्ये फक्त एका ठिकाणी हिंसाचार झाला आहे. मी त्याचा निषेध करतो. जर मी कोणाला धमकी दिली असेल मी स्वतःहून तुरूंगात जाण्यास तयार आहे. मला असली आमदारकी नको. मी बिहारमध्ये जाईन आणि तेथेच निवडणूक लढवेन. गुजरातमधील सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे ठाकोर समाजातील लोकांचे संरक्षण करावे लागेल.

- अल्पेश ठाकोर, आमदार, काँग्रेस

-

- माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/