शैलपुत्री
महा एमटीबी   09-Oct-2018

 


 
 
 
वन्दे वात्र्छितलाभाय चन्द्राधकृत शेखराम्।

वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशास्विनीम्॥

 

माता दुर्गाजी आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री नावाने ओळखल्या जातात. पर्वतराज हिमालय यांची कन्यारूपात जन्मल्यामुळे शैलपुत्री हे नाव पडले. वृषभस्थित या माताजींच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल सुशोभित आहे. ज्या नवदुर्गा म्हणून संबोधितात, त्यांपैकी या प्रथम दुर्गा होय.

 

आपल्या पूर्वजन्मी या प्रजापती दक्ष यांच्या कन्या म्हणून त्यांचा जन्म झाला. त्या वेळी सती नावाने पुकारीत असत. यांचा विवाह भगवान श्रीशंकर यांच्याबरोबर झाला. एके वेळी प्रजापती दक्षाने फार मोठा यज्ञ केला. सर्व देव-देवतांना यज्ञास निमंत्रण दिले; परंतु श्रीमहादेवांना निमंत्रण दिले नाही. सतीने ऐकले की, आपल्या वडिलांनी खूप मोठा यज्ञ करण्याचे नियोजन केले आहे. त्या वेळी त्यांच्या मनात आले की, आपणही यज्ञास जावे व त्यात सहभाग घ्यावा. सतीने भगवान शंकराला आपल्या मनातील इच्छा सांगितली. सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्यांनी सांगितले की, “प्रजापती आपल्यावर रागावले आहेत. त्यामुळे तेथे जाणे श्रेयस्कर होणार नाही. या यज्ञात जाणीवपूर्वक आपणास बोलावले नाही, सर्व देव-देवतांना बोलावले आहे. त्यामुळे तेथे जाणे नको.” पण सतीचे या बोलण्याने समाधान झाले नाही. आपल्या वडिलांकडे एवढा मोठा यज्ञ आहे, तेथे आई-बहिणींना भेटता येईल, तेवढाच आनंद मिळेल. भगवान शंकरांनी सतीची प्रबळ इच्छा पाहून यज्ञास जाण्याची अनुमती (परवानगी) दिली.

 

सती वडिलांच्या घरी ज्या वेळी गेली, त्यावेळेस तिचा कोणीही आदरसत्कार केला नाही, ना तिच्याबरोबर कोणी बोलणे केले. सगळ्यांनी तिच्याकडे काणाडोळा केला, फक्त जन्मदात्या आईने गळाभेट केली. वहिनींनी टोमणे मारून तिचा तिरस्कार केला. नातेवाईकांच्या या व्यवहारामुळे मनाला खूप यातना झाल्या. त्यांनी हेही पाहिले की, भगवान शंकरांप्रती प्रेमभावना नाही, त्यांच्याविषयी तिरस्काराची भावनाच जास्त होती. दक्ष शंकरांप्रती अपमानजनक अपशब्दच बोलत होते. हे सर्व दृश्य पाहिले अन् ऐकल्यावर मनात खिन्नता आणि अतिशय राग उत्पन्न झाला. आपण भगवान शंकराचे न ऐकल्यामुळे येथे येऊन फार मोठी चूक केली, हे मनोमनी पटले.

 

सती शंकर भगवानांविषयी अपमान सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी त्याक्षणी शरीर योगाग्निद्वारा अग्नीमध्ये भस्म केले. आकस्मित वज्राघातासमान या दु:खद घटनेचे वृत्त ऐकून शंकर भगवान क्रोधित झाले. त्यांनी आपल्या गणांना पाठवून यज्ञाची पूर्णपणे नासधूस केलीसतीने योगाग्निद्वारा आपले शरीर भस्मांकित केल्याने पुढील जन्मी शैलराज हिमालयाची मुलगी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला. याच नावाने ती प्रसिद्ध झाली. पार्वती, हैमवती या नावानेही तिला संबोधले जाते. उपनिषदांच्या एका कथेनुसार, या हैमवतीने देव-देवतांचे गर्वभंजन केले होते. शैलपुत्रीचा विवाह भगवान शंकरांबरोबर झाला. पूर्वजन्मानुसार या जन्मी श्रीशंकराची अर्धांगिनी झाली. नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गाचे महत्त्व अनंत शक्तिरूप आहे. नवरात्रीत प्रथम दिवशी त्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. प्रथम दिवशी उपासनेत योगी आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थित करतात व येथूनच पुढे योगसाधनेस प्रारंभ होतो.

 
- पुरुषोत्तम काळे
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/