'पु.लं.'ची (काल्पनिक) रक्तपेढी भेट
महा एमटीबी   09-Oct-2018
 

 
 
 
जनकल्याण रक्तपेढीला आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. यात बहुतेक सर्वच सामाजिक क्षेत्रांचा समावेश आहे. असे असले तरी राहून गेलेल्याही अनेक भेटी आहेतच. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले श्रेष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची भेट अशीच राहुन गेलेली. राहुन गेलेली ही भेट होणे आता प्रत्यक्षात शक्य नसले तरी नुकत्याच येऊ घातलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या कल्पनेव्दारे 'पुलं'ना रक्तपेढीत बोलवायला काय हरकत आहे, असा विचार आम्ही केला; आणि आपल्या दर्जेदार साहित्यकृतींतून कित्येक पिढ्यांना निर्भेळ आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेले पु.ल. रक्तपेढीत आलेसुद्धा. आपल्या रक्तपेढी भेटीत सर्व रक्तदात्यांसमोर ते म्हणाले –
 
(पु.लं.बद्दल आत्यंतिक आदर व्यक्त करुन आणि लेखन-धाडसाबद्दल विनम्र क्षमायाचना करुन -)
 
-------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
 
खरं तर ज्या विषयातली आपल्याला फार गती नाही अशा विषयांमध्ये शिरायचं किंवा अशा ठिकाणी जायचं मी सहसा टाळतो. शिवाय साध्या डासाच्या रक्तानेदेखील मला गरगरतं, हे इथं बसलेल्या बहुतेकांना नक्की महिती आहे. पण रक्तपेढीची ही मंडळी मात्र कदाचित माझ्या मनातली भीती जावी या इराद्याने असेल अक्षरश: हटुनच बसली आणि वेताळाला खांद्यावर टाकून निघालेल्या विक्रमादित्याच्या इरीशिरीने या लोकांनी इथल्या रक्तबंबाळ परिसराचे सांगोपांग दर्शन मला घडवून आज आपला हट्ट अखेर पूर्ण केलाच. अर्थात ज्या मंडळींना गेल्या पस्तीसेक वर्षांपासून माणसांच्या 'रक्ताची चटक' लागली आहे, त्यांच्यासाठी अस्मादिकांस इथे घेऊन येणे म्हणजे अगदीच रक्तहीन चळवळ. कारण आत्ताच डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या पासष्टीनंतर हा 'रक्तपात' थांबतो. आमच्या आयुष्याच्या गाडीने पासष्टीचे स्टेशन मागे सोडुन आता बरीच वर्षे झाल्यामुळे आणि शिवाय साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा अनेक क्षेत्रांत सातत्याने रक्त शोषले गेल्यामुळे मुळात आमच्या शरीरात आता रक्त शिल्लक आहे की नाही, हीदेखील एक शंकाच आहे. अर्थात त्यामुळे अगदी 'सुईच्या अग्राइतकी' सुद्धा भीती न बाळगता अगदी निर्भयपणे आज आम्ही या रक्तपेढीत पाऊल टाकु शकलो आहोत.
 
पण काही का असेना, रक्तपात हा कल्याणकारीसुद्धा असु शकतो हे मात्र आज इथे आल्यावर मला चांगल्या प्रकारे समजलं. मागे एकदा आमच्या फॅमिली डॉक्टरने आपल्या व्यवसायाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना 'आमच्याकडे येणार ती सर्व रोगी माणसं. निरोगी माणसांच्या जगात आम्हाला कोण विचारतो?' अशी सरळ सरळ तक्रार माझ्याकडे केली होती. अर्थात 'मी माझ्या व्यवसायात 'सर्वसूखी' आहे' हे गृहीत धरुन. तरी बरं, 'समिक्षकांच्याच आशीर्वादाने उद्भवलेल्या डोकेदुखीची' तक्रार घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. पण 'कधी नव्हे ते एक डॉक्टर माझ्यासारख्या रुग्णाला आपल्या तक्रारी सांगतोय' या आनंदात आपल्या व्यवसायजन्य व्यथा त्यांना न ऐकवता त्यावेळी मी गप्प बसलो. पण मला त्यांची ती तक्रार तेव्हा मनापासून पटली होती. 'निरोग्यांच्या दुनियेत डॉक्टर उपरा' अशी एक नवी म्हणही मला तिथे बसल्या बसल्या सुचली होती. आज रक्तपेढी बघून मात्र जाणवलं की, इथे रुग्णाईतांपेक्षा अधिक निरोगी माणसांचा वावर आहे, किंबहुना तसे ते आवश्यकच आहे. कारण या निरोगी माणसांच्या इथे येण्यावरच रुग्णाईताची आरोग्यसेवा अवलंबून आहे. त्यामुळे माझ्या फॅमिली डॉक्टरसारखी तक्रार किमान रक्तपेढीतले डॉक्टर्स तरी करणार नाहीत याची मला खात्री आहे. याखेरीज दुसरी एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटली. ती म्हणजे कुठल्याही गाजावाजाशिवाय रक्तदात्यांनी चालवलेले रक्तदानाचे काम. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रस्थामुळे हल्लीचा काळ असा झाला आहे की गल्लीतल्या एखाद्या गटाने सत्यनारायणाची पुजा घातली तरी 'त्याच्या प्रसादामुळे जणू हिंदुस्थानने जागतिक बॅंकेकडुन घेतलेले कर्ज क्षणात फिटणार आहे’ असे वातावरण निर्माण करत अखिल भारतीय स्तरावर हा सत्यनारायण कसा गाजेल याची तजवीज आधीच कार्यकर्ता मंडळींनी केलेली असते. किंबहुना तीच सत्यनारायणामागची 'खरीखुरी' प्रेरणा असते. अशा काळात रक्तदानासारखे महत्कृत्य सातत्याने करुन त्याचा अजिबात गवगवा न करता आणि अन्य कुठलीही अपेक्षा न ठेवता अनेकांना ते तशाच पद्धतीने करण्याला प्रेरित करणे ही खरोखरीच अभिनंदनीय गोष्ट आहे. चांगले काम करुनही त्याची वाच्यता न करण्याची प्रवृत्ती ही प्रगल्भ समाजाची निदर्शक आहे. मुळात अशी उपजत प्रगल्भता असलेले किंवा ती प्रयत्नपूर्वक घडवलेले हजारोजण या प्रकल्पाशी संबंधित आहेत ही बाब थोडक्यात सांगायचे तर 'विषवल्ली असुनी भवती, फुलुनी ये अमृतवेलट' या ओळींप्रमाणे आहे. या लोकांमध्ये सुशिक्षित तरुण-तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचेही मला सांगितले गेले. स्वाभाविकच आहे. शिक्षण जाणिवा देते, ते हे असे.
 
पूर्वीच्या काळात आपले रक्त देण्यासाठी सहजासहजी कुणी तयार होत नसे, असेही मी ऐकले. खरे तर समाजहितासाठी आपली हाडे देऊ करणाऱ्या दधिची ऋषींचे आख्यान इथे कथा-कीर्तनांतून आम्ही वर्षानुवर्षे ऐकले. तरीदेखील त्याच समाजात 'रक्त हवे आहे, बोला, कोण कोण देणार?’ हा प्रश्न रुग्णाभोवतीची गर्दी हटवण्यासाठी डॉक्टरांना विचारावा लागणे हा दुर्दैवी विरोधाभासच. रामकथा चालु असताना भरतभेटीच्या प्रसंगामुळे हमसून हमसून रडणारा एखादा रामभक्त त्याच रामकथेमध्ये दुसऱ्या दिवशी 'माझ्या खांबाजवळच्या जागेवर का बसला?’ असे म्हणत दुसऱ्या एका रामभक्ताबरोबर हमरी-तुमरीवर आलेलाही इथे पहायला मिळतो. एकंदरीतच भरताचा आणि रामाचा त्याग, दधिचीचे आत्मबलिदान या गोष्टी आम्ही आरत्यांपुरत्याच मर्यादित ठेवून दैनंदिन जीवनात या आदर्शांचा वारादेखील आपल्या जगण्याला लागु न देण्याची अगदी पुरेपूर खबरदारी घेतली आहे. सरकारने जारी केलेल्या सुंदर तिकिटांवर पोष्टखाते निर्विकारपणे आपले अनाकलनीय शिक्के मारुन त्या तिकिटांच्या मूळच्या सौंदर्याला जसे वाकुल्या दाखवते तसेच आमच्या भरत-दधिचींसारख्या आदर्शांवर निष्क्रीयतेचे शिक्के मारुन या मूळ आदर्शांना सपक करण्याचे काम गेली हजारो वर्षे आम्ही निष्ठेने करत आलेलो आहोत. 'तुमचा त्याग कितीही महान असला तरी आमचे दुर्लक्ष त्याहून महान आहे’ हे आम्ही अनेकदा सप्रमाण सिद्ध केले आहे. पण असे असले तरी सगळीच परिस्थिती काही वाईट नाही हे मात्र अशा ठिकाणी आल्यावरच जाणवते. बाबा आमट्यांकडेही जितक्यांदा मी गेलो तितक्या वेळा मला जाणवले ते हेच की, अजूनही खूप काही चांगले शिल्लक आहे. गरज आहे ती फक्त अशा कामांचा गुणाकार होण्याची. डॉक्टरसाहेबांनी मघाशी रक्तापासून रक्तघटक कसे तयार होतात ते मला दाखवले. तशाच पद्धतीने चांगली कामे बघून मिळणाऱ्या प्रेरणेपासून संवेदना, सक्रीयता, सामंजस्य, सद्भावना असे समाजोपयोगी घटक नाही का तयार होऊ शकणार? हा गुणाकार आपल्याला हवा आहे. हे जेव्हा होईल तेव्हा तयार झालेल्या प्रेरणेचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला असे म्हणता येईल. रक्तघटकांचा उपयोग गरजू रुग्णांना होतो तसा. असो.
 
आज माझ्यासारख्या एका रक्तविहीन व्यक्तीला आपल्यासारख्या रक्तसाधकांसमोर बोलायला उभे करण्यात आयोजकांची नेमकी काय कल्पना आहे, याचा मला अजूनही अंदाज आलेला नाही. हे म्हणजे श्रेष्ठ शास्त्रीय गायकांच्या मैफिलीमध्ये कुठल्यातरी नवोदिताने स्वरालंकार म्हणून दाखविण्यासारखे आहे. पण 'या निमित्ताने नवोदिताला योग्य स्वरज्ञान व्हावे’ असाही आयोजकांचा छुपा हेतु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीही असो. आज आपणा सर्वांना भेटुन बरं वाटलं. मी स्वत: आज रक्त देण्याच्या स्थितीत नसलो तरी आपल्यासारख्यांशी सातत्याने बोलुन उरलंसुरलं रक्त आटवण्याची मात्र माझी मनापासून तयारी आहे. त्यामुळे आपलं नातं हे रक्ताचंच आहे. ऋषी दधिचींच्या आत्मबलिदानापासून ते ज्ञानोबा-तुकोबांच्या निर्हेतुक पंढरीच्या वारीपर्यंत चालत आलेल्या एका महान पारमार्थिक परंपरेशी थेट जोडणारं हे नातं आहे.
 
आपण श्रद्धेने करता ते रक्तदानही या नात्याचेच एक प्रकटीकरण आहे. ते रक्तदान चिरायू होवो ! रक्ताची नातीही चिरायू होवोत !! धन्यवाद !!!
 
 
- महेंद्र वाघ