वाडयाच्या कन्येची ‘बॉईज २’ मधून सिनेसृष्टीत दमदार एंट्री
महा एमटीबी   08-Oct-2018

  
  
वाडा : वाडा तालुक्यातील चिंचघरपाडा (कुडूस) गावाची कन्या सायली पाटील हिने 'बॉईज २' या सिनेमातील 'चित्रा' च्या मुख्य भूमिकेमधून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला आहे. यासाठी सायलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मॉडलिंगच्या जगतात प्रवेश केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेमधे 'पार्वतीची' भूमिका साकारली होती तर असा सासर सुरेख बाई या मालिकेमधील तिने साकारलेल्या 'जुई’च्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सायलीने मालिकांमध्ये साकारलेल्या पात्रांना दिलेल्या योग्य न्यायामुळेच तिला मराठी सिनेसृष्टीत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळणार हे हे निश्चित मानले जात होते.
 

'बॉईज' हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर आत्ता 'बॉईज २' या सिनेमाचा पुढील भाग प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर ( सुमंत शिंदे) हे तिघे असून त्यांच्या जोडीला चित्रा (सायली पाटील) ही प्रमुख भूमिके आहे. 'बॉईज २' या चित्रपटामधे ढुंग्या, धैर्या, कबीर हे तिन्ही मित्र बारावीत असून त्यांचे नऱ्या (ओंकार भोजणे) या सिनिअर सोबत चांगलेच वाकडे आहे. त्याच्या सोबत सतत ढुंग्या आणि धैर्या यांची भांडणे होत असतात. या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी कबीर बारावीच्या वर्षात हॉस्टेलला न राहायचे ठरवतो. पण कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या चित्रा (सायली पाटील)च्या तो प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो होस्टेलला राहायला येतो. पण कबीर, ढुंग्या आणि धैर्या यांचे नऱ्या सोबतचे वाद सुरूच असतात. त्यात या सगळ्यांमध्ये एक पैज लागते. ही पैज पूर्ण करू न शकणाऱ्याला कॉलेज सोडून जावे लागेल असे ठरते. असे या सिनेमाचे कथानक आहे. सायली पाटील हिच्या भूमिकेमुळे वाडा तालुक्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहामधे वळला आहे.

 
 

 

माझे शिक्षण शहरात झाले असेल तरी गावाकडील ओढ ही आजही कायम आहे. गावाकडे आल्यानंतर येथील लोकांचे प्रेम, आपुलकीने मी भारावून जाते. खरे तर हेच प्रेम, हिच आपुलकी आपल्याला पुढे जाण्यास प्रेरणा देते. छोट्या पडदयावरील मालिकांमधील माझ्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आत्ता 'बॉईज २' सिनेमा बघुन तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा.

- सायली पाटील

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/