भारतीय उपखंडाला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका!
महा एमटीबी   08-Oct-2018


 

 

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने चर्चा सुरु असतानाच, आता जागतिक सरासरी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत न रोखल्यास व कार्बन उत्सर्जन ४५ टक्क्यांनी न घटवल्यास भारतीय उपखंड उष्णतेच्या लाटांनी होरपळण्याची शक्यता असून पुढील वीस ते तीस वर्षांत मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे निष्कर्ष मांडण्यात आले असून यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

आयपीसीसी अर्थात, इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वॉशिंग्टन विद्यापीठ व इतर काही हवामान तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या संशोधनाचा द १.५ हेल्थ रिपोर्ट या अहवालात या बाबी समोर आल्या आहेत. डिसेंबर, २०१९ मध्ये पोलंड येथे होत असलेल्या वर्ल्ड क्लायमेट चेंज समिटच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सध्या जागतिक सरासरी तापमानवाढ प्रचंड वेगाने होत असून, ही तापमानवाढ सरासरी १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखणे नितांत आवश्यक बनले आहे. सध्याची तापमानवाढीची गती पाहता, २०३० पर्यंत जागतिक सरासरी तापमान हे १.५ अंशांनी वाढणार आहे. तसेच, २०५० पर्यंत ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची चिन्हे आहेत. कार्बन उत्सर्जन हे या तापमानवाढीमागचे मोठे कारण ठरत असून २०३० पर्यंत हे कार्बन उत्सर्जन ४५ टक्क्यांनी घटवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

 

जागतिक सरासरी तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास भारतीय उपखंडाला याचा सर्वात मोठा फटका बसणार असून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आदी देश उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघण्याची भीतीही आयपीसीसीच्या या अहवालात वर्तवण्यात आली आहे. तापमानवाढ न रोखल्यास अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण होऊन त्यांच्या किंमती वाढणे, अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणे, नद्या आटून पाण्याची टंचाई निर्माण होणे, महागाई वाढणे व परिणामी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रचंड प्रमाणात गरिबी वाढणे आणि लोकसंख्येची मोठी स्थलांतरे होणे, आदी धोके वर्तवण्यात आले आहेत. कर्कवृत्ताच्या जवळ असलेल्या भारतातील कोलकाता व पाकिस्तानमधील कराची या प्रमुख शहरंसह आसपासच्या प्रदेशाला उष्णतेच्या लाटांचा मोठा फटका बसणार आहे. २०१५ मध्येही भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा फटका बसला होता. अशाच प्रकारचा किंवा याहीपेक्षा मोठा फटका पुढील वीस-तीस वर्षानंतर भारतीय उपखंडाला बसण्याची भीती असून भारतातील महानगरे उष्णतेमुळे घुसमटण्याची व शहरी उष्णतेची केंद्रबनण्याची भीतीही या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

 

जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन उत्सर्जन हा या तापमानवाढीमागील महत्वाचा घटक म्हणून नमूद करण्यात आला आहे. केवळ भारतातच गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ९२९ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. कोळशाद्वारे होणाऱ्या वीजनिर्मितीचा वाटा देशातील एकूण वीजनिर्मितीमध्ये सुमारे ७९ टक्के इतका असल्याचे म्हटले जाते. येत्या डिसेंबरमध्ये पोलंड येथे होत असलेल्या जागतिक परिषदेच्या निमित्ताने या अहवालाला मोठे महत्व प्राप्त झाले असून आता अमेरिका, रशिया, चीन, भारत आदींसह जगातील प्रमुख देश जागतिक तापमानवाढीच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

द १.५ हेल्थ रिपोर्टमधील कळीचे मुद्दे :

 

* जागतिक सरासरी तापमानवाढ १.५ अंशांपर्यंत रोखण्याची तीव्र गरज

* तापमानवाढ २.० अंशांपर्यंत गेल्यास भारतीय उपखंड उष्णतेच्या लाटांनी होरपळणार

* सध्याच्या गतीने २०३० पर्यंत तापमानवाढ १.५ अंशांपर्यंत, २०५० पर्यंत २.० अंशांपर्यंत पोहोचणार

* अन्नधान्याची, पाण्याची कमतरता निर्माण होऊन गरिबी वाढणार

* मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांच्या साथी वाढण्याची भीती

* लाखो लोकांचे विस्थापन होऊन मोठ्या जीवितहानीची शक्यता

* कर्कवृत्ताजवळचे कोलकाता, कराची उष्णतेच्या लाटांनी भाजून निघणार

* कार्बन उत्सर्जन ४५ टक्क्यांनी घटवण्याची तीव्र गरज

 

गेल्या १५० वर्षांत भारतातील शहरांची सरासरी तापमानवाढ :

 

* दिल्ली : १ अंश से.

* मुंबई : ०.७ अंश से.

* कोलकाता : १.२ अंश से.

* चेन्नई : ०.६ अंश से.

 

वास्तव नाकारून कुणाचाच फायदा नाही : भारत

 

जागतिक तापमानवाढ आणि त्यातील धोके हे वास्तव आहे. हे वास्तव नाकारून कुणाचाच फायदा नसल्याची प्रतिक्रिया भारतातर्फे या अहवालावर व्यक्त करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ए. के. मेहता म्हणाले की, भारत आधीपासूनच वातावरणबदलाचे परिणाम भोगत आहे. भारत वातावरण बदलांना खरा धोका मानतो आणि आम्ही आमच्या क्षमतेनुसार या संकटाचा सामनाही करत आहोत. आम्ही एक जबाबदार राष्ट्र म्हणून यावर शक्य त्या सर्व उपाययोजना करत आहोत. तापमानवाढीच्या या संकटाशी सर्व देशांनी सामुहिकरित्या लढण्याची गरज आहे, असे मत मेहता यांनी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/