धोका ग्लोबल वार्मिंगचा...
महा एमटीबी   08-Oct-2018


 


उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. या ग्लोबल वॉर्मिंगला सर्वात जास्त जबाबदार अमेरिका, चीन, युरोपियन देश आणि अर्थातच आपला भारत देश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मानवाने केलेल्या डोळेझाकीचा परिणाम या आयपीसीसीच्या अहवालातून दिसून येत आहे.

 

वर्तमानपत्र उघडलं की दररोज आपल्याला 'ग्लोबल वॉर्मिंग'विषयी काहीना काही वाचायला भेटतं. मात्र बातम्या वाचून आपण त्याकडे दुर्लक्षच करत असतो. आपल्या या दुर्लक्ष करण्याने पृथ्वीचा नायनाट होत चालला आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना आपल्याला ते जाणून घ्यायचं नसतं. हाच माणूस दिवसेंदिवस औद्योगिक प्रगती करतोय. मात्र याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो हा विचार तो कधी करत नाही. मानवाच्या याच डोळेझाक वृत्तीमुळे जागतिक तापमान वाढ हा जगभरात सतावणारी आणि मानवनिर्मित समस्या निर्माण झाली आहे. गेल्या १४७ वर्षांपासून या समस्येला तोंड द्यावे लागत असून याची दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेली आपल्याला दिसत आहे. याचाच परिणाम इंटरगर्व्हनमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) नुकत्याच सादर केलेल्या आवाहलात दिसून आला आहे. या अवहलात जागतिक तापमानवाढीचा अर्थातच ग्लोबल वॉर्मिंगचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील १२ वर्षात जगभरातील तापमान एक ते दिड अंश सेल्सियन्सने वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वैश्विक तापमान वाढीमुळे गरम हवांच्या लाटा निर्माण होऊन उष्माघाताची लाट जगभरात पसरणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीय उपखंडावर होणार असल्याचे देखील या आवाहलात म्हटले आहे. त्यामुळे आपण केलेली डोळेझाक आपल्याच मरणाला आमंत्रण ठरल्याचे या अवहलातून दिसत आहे.

 

इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसी ही जागतिक स्तरावरची हवामान बदलविषयीची प्रमूख संघटना आहे. ही संघटना संशोधन करून हवामान बदल, हवामान बदलाचे परिणाम, भविष्यातील धोके आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी काम करते. त्याच्या आधारावर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलया विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेतले जातात. यापूर्वी देखील या संघटनेने जगभरात ग्लोबल वॉर्मिंग विषयी अलर्ट जारी केले होते. असाच अहवाल आयपीसीसीने काल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार २०३० ते २०५२ दरम्यान पृथ्वीवरील तापमानात १.५ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच या तापमानवाढीमुळे काही भागात उष्माघाताची लाट येऊ शकते. काही भागात दुष्काळाची झळ बसू शकते. तर काही भागात महापूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालात भारतीय उपखंडावर सर्वात जास्त परिणाम होणार असल्याचे नमूद केले असून लाखो लोकांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. भारतीय उपखंडात प्रामुख्याने भारताच्या कोलकाता भागात व पाकिस्तानच्या कराचीमध्ये याचा सर्वात जास्त फटका बसणार असल्याचे म्हटले आहे. आयपीसीसीने प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये ६ हजार शास्त्रोक्त संदर्भ, ४२ हजार तज्ज्ञांनी नोंदविलेली माहिती आणि सरकारच्या प्रतिक्रियाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे ४० देशांतील ९१ लेखकांनी हा अहवाल संपादित केला आहे.

 

आयपीसीसीच्या अहवालानुसार या तापमान वाढीमुळे काही भागात नद्या आटून याचा अन्नधानांच्या उत्पादनावर परिणाम होईल. अगोदरच पाण्याची भीषण टंचाई असताना अजून त्यात भरेल तर महागाई देखील भरमसाठ वाढेल असे भाकीत केले गेले आहे. महागाई आणि अन्नधान्यची टंचाई वाढली तरी मात्र उत्पन्न आहे तसेच राहणार आहे. या सर्वांमुळे भारतात गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून लोकं भुकेने आणि उष्माघाताने मरतील, असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. बेसुमार जंगलतोड, हरित वायूचे उत्सर्जन, वाहनांची वाढती संख्या, यामुळे गेल्या काही वर्षात पर्यावरणात अत्यंत घातक बदल होत आहेत. याचाच परिणाम आपल्याला बदलत्या हवामानाच्या रूपातून दिसून येत आहे. उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. या ग्लोबल वॉर्मिंगला सर्वात जास्त जबाबदार अमेरिका, चीन, युरोपियन देश आणि अर्थातच आपला भारत देश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मानवाने केलेल्या डोळेझाकीचा परिणाम या आयपीसीसीच्या अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे आता गरज निर्माण झाली आहे ती डोळे उघडे ठेऊन पर्यावरण संवर्धन कमी करण्याची आणि जास्तीत जास्त झाडे लावून तापमान नियंत्रित ठेवण्याची.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/