आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक
महा एमटीबी   08-Oct-2018


 

जकार्ता: जकार्ता येथे चालू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. भालाफेकपटू संदीप चौधरी याने हे पदक पटकावले आहे. त्याने ६०.०१ मीटर लांब भालाफेक करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकानंतर भारताच्या खात्यात १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदक जमा झाले आहेत.

 

संदीपने पहिल्या सेटमध्ये ५४.३१ मीटर भालाफेक केली. त्यानंतर सातत्याने सुधारणा करत पुढच्या सेटमध्ये त्याने ५७.२७, ६०.०१, ५९.५० आणि ५६.६४ मीटर भालाफेक केली. तिसऱ्या सेटमधील अंतर त्याला सुवर्ण पदक जिंकून देण्यास पुरेसे ठरले. श्रीलंकेच्या हेत्ती अराचचिगे चामिंडा (५९.३२) आणि इराणच्या ओमिदी अली (५८.९७) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

 

जकार्ता येथे चालू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सची सुरुवात ६ ऑक्टोबरला झाली. पहिल्याच दिवशी भारताने २ रौप्य आणि ३ कांस्य पदकाची कमाई केली. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई आहे. यामध्ये आशिया खंडातील ४३ देशांचा समावेश आहे. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये ३३ पदके मिळवली होती. ज्यामध्ये ३ सुवर्ण, १४ रौप्य आणि १६ कांस्य पदके जमा होती.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/