होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे जुनाट आजाराचा सिद्धांत
महा एमटीबी   08-Oct-2018
जेव्हा निसर्गात एखादा प्रश्न निर्माण होतो तेव्हा निसर्गातच त्याचे उत्तर दडलेले असते व ते आपल्या शुद्धविचार व बुद्धीने शोधायचे असते.

 

होमियोपॅथीचा शोध लागल्यानंतर डॉ. सॅम्युएल हॅनेमान आणि त्यांचे विद्यार्थी होमियोपॅथी औषधशास्त्र वापरू लागले व त्यानुसार रुग्णांवर उपचार करू लागले. सुरुवातीच्या काळातील अनुभवाने डॉ. हॅनेमान यांच्या असे लक्षात आले की, उत्तमातील उत्तम औषधे जरी रुग्णाला दिली गेली तरीही जुनाट आजार हे परत शरीरात येतात व काही ठराविक कलावधीनंतर त्यांच्या लक्षणाची पुनरावृत्ती होते (Recurrence of symptoms) आणि त्यांच्या असेही लक्षात आले की, अॅक्युट रोग जरी जास्त तीव्रतेने असले तरी, त्यांची पुनरावृत्ती होत नाही. या निरीक्षणामुळे डॉ. हॅनेमान अजून एका संशोधन कार्यात मुळापासून व कायमची मुक्ती कशी मिळवायची, या संशोधनात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. अनेक रुग्णांचा अभ्यास केला व त्याचबरोबर अनेक औषधाचांही अभ्यास करून विविध प्रयोग केले. रुग्णाच्या आजारावर निरीक्षणे नोंदविली. या सर्व गोष्टींचे संशोधन करून निर्णयापर्यंत येण्यासाठी त्यांनी तब्बल बारा वर्षे खडतर मेहनत घेतली. हजारो रुग्णांच्या तपासणीच्या आधारे त्यांनी मग हा जुनाट आजारांचा सिद्धांत ‘Theory of chronic disease’ मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार, जुनाट आजाराचे मुख्य कारण हे ‘मायाझम’ हे असते. डॉ. हॅनेमान यांनी सखोल अभ्यासानंतर असे अनुमान काढले की, ‘मायाझम’ हे तीन प्रकारचे असतात.

 

१. सोरा (psora)

२. सायकोसिस (sycosis)

३. सिफिलीस (syphilis)

 

त्याआधी आपण हा ‘मायझम’ म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे पाहूया. ‘मायझम’चा थोडक्यात अर्थ म्हणजे कुठल्याही आजाराचे मूळ. आजाराचे मूलभूत कारण म्हणजे ‘मायाझम’ fundamental cause of disease. ‘मायाझम’ हा शब्द प्रथम ग्रीक भाषेतून आला. मूळ ग्रीक शब्द हा ‘मायाझमा’ आहे. त्याचा शाब्दिक अर्थ हा त्यावेळच्या काळात हा ‘प्रदूषण करणारे घटक’ किंवा विषारी घटक असा होता. परंतु, डॉ. हॅनेमान यांना या नुसत्या शाब्दिक अर्थाच्याही पुढे जाऊन या ‘मायाझम’बद्दल सांगायचे होते. त्यांनी हा शब्द एका प्रक्रियेबद्दल वापरला आहे. रोग निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतील लक्षणे व चिन्हे यांचा अभ्यास व त्यांची शरीरांवर होणारी क्रिया व जशा पद्धतीने रुग्णांवर ही लक्षणे येतात व ज्या क्रमाने येतात, त्यांचा सखोल अभ्यास या ‘मायाझम’मध्ये केला गेला आहे. आजार बरा होत असताना कुठल्या गोष्टी त्यात अडथळा आणतात, हे पाहिले गेले. आजारपणात आपण रुग्णाला पथ्यपाणी सांभाळायला सांगतो व कुठल्याही बाहेरील संसर्गापासून कसे वाचावे ते सांगतो, बाहेरची काळजी जरी आपण घेत असलो तरी, हे जुनाट आजार वारंवार डोके वर काढतातच. म्हणूनच शरीराच्या आतमध्येच असे काहीतरी आहे जे या आजारांना मुळापासून काढण्यासाठी प्रतिबंध करत असते. ही गतिशील शक्ती माणसाच्या चैतन्यशक्तीला प्रभावित करते व परिणामी जुनाट आजार होतात. हे आजार ज्या प्रकारे शरीरावर व मनावर दर्शविले जातात, त्या सर्व लक्षणांचा पॅटर्न कसा आहे, हे डॉ. हॅनेमान यांनी अभ्यासले.

 

या पॅटर्ननुसार त्यांनी या ‘मायाझम’चे विभाग केले. जेव्हा निसर्गात एखादा प्रश्न निर्माण होतो तेव्हा निसर्गातच त्याचे उत्तर दडलेले असते व ते आपल्या शुद्धविचार व बुद्धीने शोधायचे असते. ते उत्तर डॉ.हॅनेमान यांनी शोधले. या परत परत येणार्या जुनाट आजारांसाठी त्यांनी या ‘मायाझम’च्या अनुषंगाने पूर्णपणे घालवून टाकतील अशी काही औषधे शोधून काढली. ही औषधे जुनाट आजाराच्या या पॅटर्नवरच कार्य करत असल्याने हे आजार समूळ नष्ट होण्यास सुरुवात झाली व वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडून आला.

 

-डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/