अणुऊर्जेचे सुकाणू कमलेश व्यासांच्या हाती
महा एमटीबी   07-Oct-2018डॉ. कमलेश व्यास यांच्याकडे यापूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी होती. मात्र, आता त्यांच्याकडे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद आणि अणुऊर्जा विभागाचे सचिवपद सोपवण्यात आले आहे.


पाच वेळा होमी भाभा औद्योगिक पुरस्काराचे मानकरी, २०११ साली न्युक्लिअर सोसायटीचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळवणारे बुद्धिमान व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. कमलेश व्यास. नुकताच त्यांनी अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शेखर बसू यांच्यासारख्या दिग्गज अणुशास्त्रज्ञांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यातच व्यास यांच्यावर आता या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉ. कमलेश नीलकंठ व्यास यांच्याकडे यापूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी होती. मात्र, आता त्यांच्याकडे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद आणि अणुऊर्जा विभागाचे सचिवपद सोपवण्यात आले आहे. व्यास हे मूळचे गुजरातमधील बडोद्याचे रहिवासी. १९५७ साली व्यास यांचा जन्म झाला. बडोद्यातील एमएस विद्यापीठातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी मिळवली आणि भाभा अणुशक्ती केंद्राच्या प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांनी प्रवेश मिळवला. त्यानंतर ते भाभा अणुशक्ती केंद्रातच अणुभट्टी विभागात रूजू झाले.

 

अणुभौतिकी हा व्यास यांचा आवडता विषय. त्यामुळे त्यांनी अणुभट्ट्यांसाठी लागणार्या इंधनावर बऱ्याच कालावधीसाठी संशोधन केले. इंधन आरेखन आणि विकास या क्षेत्रांत त्यांना विशेष रस होता. त्यामुळेच त्यांनी या विभागात उत्तम काम करत आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांनी आण्विक रिअॅक्टर इंधन डिझाईन आणि विश्लेषण करण्यासाठी कार्य केले आहे. रणनीतिक अनुप्रयोगांसाठी नवे इंधन डिझाईन आणि त्याच्या विकासासाठीही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. थर्मल हायड्रोलिक आणि मोठ्या रिअॅक्टर कोर घटकांच्या विश्लेषणातही त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय होते. व्यास यांनी केलेल्या कार्याची दखल सर्वच स्तरांवर घेण्यात आली. शासनानेही त्यांच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेतली. २००६ ते २०१३ या कालावधीत पाच वेळा व्यास यांना होमी भाभा औद्योगिक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते, तर २०११ साली न्युक्लिअर सोसायटीच्या उत्कृष्ट सेवा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना इंडियन नॅशनल अकॅडमीची फेलोशिपही मिळाली होती. व्हिएतनाम येथे अणुऊर्जा विषयक परिषदेसाठी गेले असताना त्यांना अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबद्दल माहिती देण्यात आली.

 

भारतात १४ एप्रिल १९४८ रोजी अणुऊर्जाविषयक कायदा तयार करण्यात आला. १० ऑगस्ट १९४८ रोजी भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. या अणुऊर्जा आयोगाकडून सुरुवातीपासूनच अण्वस्त्रे तयार करण्यात येणार नाहीत, असे धोरण ठरवण्यात आले होते. १९४५साली टाटा उद्योगसमूह आणि तत्कालीन मुंबई सरकारच्या सहकार्याने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चया संस्थेची स्थापना होऊन अणुऊर्जाविषयक कार्यास चालना मिळाली. १९४८मध्ये स्थापन केलेल्या अणुऊर्जा आयोगाचे डॉ. होमी भाभा अध्यक्ष होते. भारतातील अणुऊर्जेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या खनिजांचे सर्वंकष संशोधन करणे, या खनिजांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे, अणुऊर्जेचा शांततामय कार्यासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा शास्त्रीय व तांत्रिक विषयांतील संशोधन करणे, अशा संशोधनाची जबाबदारी पेलू शकणारा शास्त्रज्ञांचा वर्ग तयार करणे, आपल्या प्रयोगशाळांमधून अणुकेंद्रविषयक मूलभूत संशोधनावर भर देणे, विद्यापीठे, महाविद्यालये व राष्ट्रीय संशोधनसंस्थांमधून अशा संशोधनास उत्तेजन देण्यासारख्या योजनांना आयोगाने प्राधान्य दिले.

 

विद्युतनिर्मिती करणार्या अणुभट्ट्या बांधण्याच्या आधी त्यांच्याविषयीचे संशोधन करण्यासाठी व त्यातील तांत्रिक भागाचा अनुभव मिळविण्यासाठी मुंबईतील अप्सरा, सायरस आणि झर्लिना या तीन संशोधनोपयोगी अणुभट्ट्यांची १९५४ ते १९६२ पर्यंतच्या काळात यशस्वी उभारणी करण्यात आली. तसेच तुर्भे येथील संशोधनसंस्थेचा विस्तार करणे, अणुऊर्जेसाठी उपयुक्त खनिजांची विस्तृत प्रमाणावर पाहणी करणे, त्याचबरोबर युरेनियमयुक्त खनिजांपासून शुद्ध धातू मिळविण्याची प्रक्रिया कार्यान्वित करणे, अणुभट्टीत वापरण्यास योग्य असे इंधनदंड तयार करणे, प्लुटोनियम वेगळा करण्यासाठी यंत्रणा उभारणे, इलेक्ट्रॉनीक उपकरणांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे अशी कामे हाती घेण्यात आली. आता अणुऊर्जा आयोगाची जबाबदारी डॉ. व्यास यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. व्यास हे २०२१ सालापर्यंत म्हणजेच वयाची ६४ वर्षे पूर्ण होईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आयोगावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे व्यास यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. व्यास यांचा दीर्घकालीन अनुभव पाहता ते ही जबाबदारी अगदी योग्यरित्या सांभाळतील यात काही शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/