भारताचा वेस्ट इंडिजला धोबीपछाड
महा एमटीबी   06-Oct-2018


 

 

राजकोट: पहिले दीड दिवस फलंदाजांनी गाजवल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी आपली चमक दाखवली. भारताने वेस्ट इंडीजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला. राजकोटच्या या खेळपट्टीवर विजय मिळवून भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

 

भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव हा १८१ धावांवर आटोपला तर दुसऱ्या डावामध्ये १९६ धावांवर सर्व संघ बाद केला. या दोन्ही डावांमध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली. पहिल्या डावामध्ये अश्विनने सर्वाधिक ४ बळी घेतले त्यानंतर शमीने २ बळी घेतले तर उमेश यादव, कुलदीप आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला. दुसऱ्या डावामध्ये कुलदीपने ५ तर जडेजाने ३ आणि अश्विनने २ विकेट घेतले.

 

वेस्ट इंडिजकडून खेळताना दोन्ही डावांमध्ये त्यांचे ३ फलंदाजांना सोडले इतर कोणालाही फिरकीसमोर तग धरता आला नाही. पहिल्या डावामध्ये रोस्टोन चेस याने ५३ तर किमो पॉल याने ४७ धावांचे योगदान दिले. नंतर दुसऱ्या डावामध्ये फॉलोऑनचा पाठलाग करताना किरेन पॉवेल याने ८३ धाव केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला २०चा आकडाही पार करता आला नाही.

 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावामध्ये ६४९ धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या जोरावर आणि पुजारा, रिषभ पंतच्या साथीने हा धावांचा रतीब उभा केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/