भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत परतले मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश
महा एमटीबी   06-Oct-2018

 
 

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत परतले
 मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

 
 
भुसावळ, ६ ऑक्टोबर
भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शनिवार ६ रोजी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आ.चौधरी यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.परंतु शिवसेनेत त्यांचे मन काही लागत नसल्याने ते सेनेत शेवटपर्यंत सक्रीय झालेच नाही शनिवाररोजी  पुन्हा मुंबईत राष्ट्रवादीत स्वगृही परतल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
    मुंबईत प्रवेश केला त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, हेमंत टकले, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी आ.दिलीप वाघ, भुसावळ तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
राजकारणाचा चढता आलेख ते ‘किंगमेकर’
१९१९ मध्ये संतोष चौधरी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९५ मध्ये शिवसेनेतर्फेही उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना आमदारकीचे तिकीट जाहीर झाल्यानंतरही संतोष चौधरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मतांचे सामाजिक गणित लक्षात आणून दिल्यानंतर दिलीप भोळे यांना तिकीट देवून संतोष चौधरी यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका तेव्हा बजावली होती. यानंतर त्यांनी बंड करून विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली पण विजयश्री खेचता आली नाही . नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक जिंकली . भुसावळ विधानसभा संघ अनुसूचित जाती साठी राखीव  झाल्याने त्यांनी त्यांचे स्वीय्य सहाय्यक संजय सावकारे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आणून पुन्हा किगमेकर ठरले.
 
 
शिवसेनेत संतोष चौधरी होतेच कुठे? संतोष चौधरी यांनी शिवसेना कधीचीच सोडली ते शिवसेनेत होते तरी कुठे? नगरपालिका निवडणूकीच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मुलाचा प्रचार केला तेव्हापासूनच ते शिवसेनेत नव्हते. त्यांनी जनआधार विकास आघाडीवर निवडणूक लढविली होती. माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही शिवसेनेवर कुठलाही परिणाम होणार नाही. - समाधान महाजन, तालुकाप्रमुख शिवसेना
 
 
रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आ.संतोष चौधरी यांच्या प्रवेशामुळे नवसंजीवनी निर्माण होईल. येणार्‍या काळामध्ये लोकसभा, विधानसभा निवडणूकीमध्ये फार मोठे योगदान त्यांचे राहणार आहे. संतोष चौधरी यांच्या प्रवेशाने उत्साहाचे वातावरण भुसावळ तालुक्यासह रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे. मागचा बॅकलॉक भरुन निघणार आहे. तसेच जळगाव आणि रावेर लोकसभेचे खासदार राष्ट्रवादीचे राहतील यात तिळमात्र शंका नाही. - रवींद्र नाना पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस