सुप्रीतिक
महा एमटीबी   31-Oct-2018

 


 
 
 
बाराव्या दिवशी त्रिगर्त सामोरे आले. त्यांनी आपल्या सैन्याची रचना चंद्रकोरीसारखी केली. अर्जुन एकटाच त्यांच्याशी लढायला आला. त्याचे स्वागत त्रिगर्तांनी बाणांच्या वर्षावाने केले. पण, अर्जुनाने त्यांचा हल्ला परतवला. सुबाहू आणि सुधन्वा या त्रिगर्तांना त्याने पराभूत केले. मग सुबाहू चवताळून पुढे आला. अर्जुनावर त्याने बाणांचा इतका घनदाट वर्षाव केला की, एकदम अंधारून आले. अर्जुनाने संतापून ‘त्वष्ट्रा’ या देवतेला आवाहन केले आणि अस्त्र सोडले. त्या अस्त्रामुळे त्रिगर्ताच्या सैन्याला हजारो अर्जुन आणि श्रीकृष्ण दिसू लागले. शेजारचा सैनिक अर्जुनच आहे असे भासत होते. त्यामुळे ते आपापसातच लढू लागले आणि एकमेकांना मारू लागले. पण, तरीही त्रिगर्त वरचढ ठरले. त्यांनी सोडलेल्या बाणांनी सर्वत्र अंध:कार पसरला. श्रीकृष्णाला तर जवळ असलेला अर्जुन पण दिसत नव्हता. यामुळे अर्जुन अधिकच संतापला आणि त्याने वायव्यास्त्र सोडले. त्या प्रचंड वादळात त्रिगर्तांनी सोडलेले सारे बाण उडून गेले. वाळलेल्या पाल्यापाचोळ्यासारखे त्रिगर्तांचे सैनिक उडून जाऊ लागले. इकडे द्रोण युधिष्ठिराकडे सरकत होते. पण, धृष्टद्युम्न युधिष्ठिरास योग्य संरक्षण देत होता. तो आणि द्रुपदाचे बंधू पांडवांसाठी शर्थीने लढत होते. त्यातच राजपुत्र सुचित्र मारला गेला. त्यामुळे पांडवांचे सैनिक चवताळले, द्रोणांचा वध करा असे ते ओरडू लागले. द्रोणांचा हा पराक्रम पाहून दुर्योधन मात्र खूप खूश झाला. तो राधेयाला म्हणाला, “राधेय, पाहा द्रोण पांडवांचा कसा धुव्वा उडवत आहेत! त्या भीमाला तर त्यांनी त्रस्त करून सोडले आहे. आज दिवस संपेतो हे युद्धच संपुष्टात येईल, असे वाटत आहे. विजयश्री द्रोणांच्याच गळ्यात माळ घालेल.” पण, राधेयाने त्याला सांगितले, “पांडव इतके दुबळे नाहीत. ते समर्थ योद्धे आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर केलेल्या एकेक अन्यायाचा सूड उगवल्याशिवाय ते राहाणार नाहीत.” भगदत्त आपल्या महाप्रचंड सुप्रीतिक नावाच्या हत्तीवर बसून पांडवांवर चाल करून आला. त्यांने भीमाच्या रथाचे तुकडे केले. भीम ठार झाला, असेच सर्वांना वाटू लागले. पण भीमाने खाली उडी मारली. त्या हत्तीने भीमाला आपल्या सोंडेत धरले आणि उंच उडवले. भीम चपळाईने हत्तीच्या खाली जाऊन बसला आणि हत्तीला गरागरा फिरवू लागला. सुप्रीतिक हत्तीने सात्यकीच्या रथाचेही तुकडे केले. जर सात्यकी वेळीच निसटला नसता, तर त्याचे मरण अटळ होते. या महाकाय हत्तीने पांडवांच्या सैन्यात घबराट निर्माण केली. सैनिक भयाने आक्रोश करू लागले...
 
 
- सुरेश कुळकर्णी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/