दासबोध
महा एमटीबी   31-Oct-2018

 


 
 
समर्थवाङ्मय म्हटले की, सामर्थ्याची उपासना, समर्थ तत्त्वज्ञान, समर्थभक्ती आणि सामर्थ्याचे पद्धतशीर संघटन करून तत्कालीन धर्मजागृती यांची आठवण येते. समर्थांनी पुष्कळ वाङ्मय निर्मिती केली असली तरी, त्यापैकी ‘दासबोध’ व ‘मनाचे श्लोक’ हे विशेष लोकप्रिय आहेत.
 
 
एक काळ असा होता की, ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’, ‘तुकारामांची अभंग गाथा’ आणि ‘समर्थांचा दासबोध’ यापैकी एकतरी ग्रंथ मराठी घरात असायचाच. वीस दशकी दासबोध ही समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण, असे विधान समर्थांनी स्वतः केलेले आहे. समर्थ रामदासस्वामींनी माघ वद्य ९ शके १६०३ म्हणजे इ. स. २२ जानेवारी, १६८२ या दिवशी शनिवारी इहलोकाची यात्रा संपवली. त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला. तत्पूर्वी दोन-तीन दिवस आधी त्यांच्या भोवती जमलेल्या शिष्यांना उद्देशून ते म्हणाले होते,
 

माझी काया आणि वाणी ।

गेली म्हणाल अंतःकरणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥

 

हे ऐकल्यावर स्वामी आता लवकरच आपल्याला सोडून जाणार आहेत, याची शिष्यांना कल्पना आली. ते दुःखी झाले. त्यावेळी समर्थ शिष्या आक्काबाई त्यांना म्हणाल्या, “महाराज, आपण विश्वात निरंतर राहणार आहात. हे खरे असले तरी, आम्हाला यापुढे आपले मार्गदर्शन मिळणार नाही. आम्हाला आपणाबरोबर भाषण करता येणार नाही. आपला उपदेश मिळणार नाही. आपण जाणार म्हणता, मग आम्ही कोणाकडे बघायचे?” हे ऐकल्यावर समर्थ म्हणाले,

 

आत्माराम दासबोध ।

माझे स्वरूप स्वतःसिद्ध ।

असता न करावा खेद । भक्तजनी ॥

 

समर्थ म्हणाले होते, याचा अर्थ दासबोधातील तत्त्वज्ञान, उपदेश, प्रतिपादिलेला भक्तिमार्ग व ज्ञान तुमच्यासोबत राहणार आहे. मग दुःख का करता? हे शरीर सांडावे लागले म्हणून बिघडले कुठे? ते खरेच आहे. कोणत्याही विभूतीचे अमरत्व हे शारीरिक असत नाही, ते आत्मिक असते. हा देह केव्हा ना केव्हा तरी सोडावा लागतो. पण त्या विभूतीचे विचार ग्रंथरुपाने चिरकाल टिकून राहतात. दासबोध ग्रंथही अशीच समर्थांची वाङ्मयीन मूर्ती असून ती अनेक शतके मराठी माणसाच्या मनात टिकून राहील. मराठी माणसाला प्रेरणा देत राहील.

 

आजवर अनेक विद्वानांनी, अभ्यासकांनी दासबोध ग्रंथाची विविधांगी समीक्षा केली आहे. थोर विचारवंत लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “भारतीय तत्त्वज्ञानाचे सुगम, सुरेख, प्रसन्न, उदात्त, भव्य असे विवरण समर्थांनी दासबोधात केले आहे. दासबोध ग्रंथाचे मराठी भाषेवरील ऋण कधी न फिटणारे आहे. मराठीचे अपार शब्दवैभव, विविध अर्थांची बोधक शब्दसामर्थ्ये समर्थांच्या ग्रंथाइतकी इतकी इतरत्र आढळत नाहीत. दासबोधात, एकंदर रामदास वाङ्मयात तर्कशुद्ध विचारसरणी व साहित्यसौंदर्य यांचे हृद्यमिलन झाले आहे. सृष्टीचे व मानवी व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण त्यात प्रतिबिंबीत झाले आहे.” (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश), न्यायमूर्ती म. गो. रानडे म्हणतात, “समर्थांचा दासबोध हा राजनीती व व्यवहारनीती यांचा एन्सायक्लोपीडिया आहे.” लो. टिळकांच्या मते, “वेदान्त व्यवहारात कसा उतरवावा, हे आम्हाला रामदासांनी शिकवले.”

 

दासबोधाच्या पहिल्या दशकातील पहिल्याच समासात समर्थांनी सांगितले आहे की, या ग्रंथाचे नाव दासबोध. हा गुरू-शिष्यांचा संवाद असून त्यात भक्तिमार्ग विशद केला आहे. त्यात नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्याची लक्षणे असे अध्यात्मनिरूपण केलेले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा अनुभव आल्यानंतरच त्या सांगितल्या आहेत. समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे मानतात.

 

नाना ग्रंथांच्या संमती ।

उपनिषिदें वेदान्त श्रुती ।

आणि मुख्य आत्मप्रचिती ।

शास्त्रेसहीत ॥ (१.१.१५)

 

ज्या ग्रंथांच्या संमती समर्थांनी घेतल्या, त्या ग्रंथांची नावे त्यांनी पहिल्या दशकामधील पहिल्या समासातील ओवी क्र. १८, १९ मध्ये दिली आहे. त्यातील उपनिषदे व भागवत ही नावे प्रचलित आहेत. परंतु, त्यात उल्लेखिलेल्या विविध गीता, जसे शिवगीता, गर्भगीता, ब्रह्मगीता, पांडवगीता, हंसगीता इ. नावे आता प्रचलित नसली तरी, ३५० वर्षांपूर्वी तत्त्वज्ञानाचे ग्रंथ अभ्यासकांना माहीत असतील. आज आम्हाला गीता म्हटले की, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीताच आठवते. लो. टिळकांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथात २६ गीतांचा उल्लेख केलेला आहे. ज्या नाना ग्रंथ संमतीचा निर्देश समर्थ उपर्निदिष्ट १.१.१५ या ओवीत करतात, त्यांच्यासंबंधी थोडी माहिती दासबोधातील दशक सात, समास सातमधून मिळते. त्यातील असार काढून सार तेवढे समर्थांनी घेतले आहे. ज्या ग्रंथांचा उल्लेख समर्थ करतात, त्यात शंकरांनी पार्वतीला सांगितलेली गुरूगीता, दत्तात्रेयांनी गोरक्षास सांगितलेली अवधूतगीता, विष्णूने राजहंसाच्या रुपात ब्रह्मदेवाला सांगितलेली हंसगीता, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेले चतुःश्लोकी भागवत, वसिष्ठऋषींनी रघुनाथाला उपदेशिलेले वसिष्ठसार आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली सप्तश्लोकी गीता.

 

वसिष्ठसार वसिष्ठऋषी ।

सांगता जाला रघुनाथासी ।

कृपण सांगे अर्जुनासी ।

सप्तश्लोकी गीता’ ॥(७.७.३७)

 

आपल्याला माहीत असलेल्या भगवद्गीतेत ७०० श्लोक आहेत. परंतु, ‘सप्तश्लोकीगीता’ मला कुठे सापडली नाही. असो, तथापि या सर्व संस्कृत ग्रंथांचा आधार त्यांनी दासबोधातील ‘अध्यात्मनिरुपणा’साठी घेतला आहे. त्यामुळे ते स्पष्टपणे सांगतात की, ‘भगवद्वाक्यविरहीत नसे बोलणे येथीचे।या त्यांच्या अभ्यासप्रक्रियेत आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ग्रंथांतील सार तेवढे काढून त्यांचा समर्थांनी दासबोध ग्रंथात उपयोग करून घेतला आहे. ‘ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ।’ (४.१.२९) ही त्यांची अभ्यासाची पद्धत असल्याने त्यांनी अभ्यासिलेल्या सर्व गीतासारांचा उपयोग समर्थांनी दासबोध विवरणात करून घेतला आहे. रामदासांच्या अध्ययन प्रक्रियेत त्यांनी श्रवण, वाचन, मनन (अभ्यास), ग्रंथसंग्रह इ. गोष्टींना महत्त्व दिले आहे. तथापि स्थळ, काळ यांचा उल्लेख नसल्याने निश्चित आधार देता येत नाही. अर्थात, तो दोष समर्थांचा नाही. समर्थांसारख्या विभूतीची दखल त्या काळातील पंडितांनी घेतली नाही, असे फार तर म्हणता येईल. या ग्रंथांची फलश्रुती श्रोत्यांनी विचारली म्हणून समर्थांनी सांगितली आहे, ती अशी आहे.

 

नासे अज्ञान दुःखभ्रांती ।

शीर्घची येथे ज्ञानप्राप्ती ।

ऐसी आहे फलश्रुती । ईये ग्रंथी ॥’ (१.१.३०)

 
 
 - सुरेश जाखडी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/