‘असेन मी, नसेन मी तरी, असेल गीत हे’
महा एमटीबी   30-Oct-2018

 


 
  
एखादी व्यक्ती आपल्यातून गेली तरी, ती तिच्या कार्यामुळे आपल्या सदैव स्मरणात राहते. त्यात जर तो कलाकार असेल, तर त्यांच्या कलेच्या स्वरूपातून तो आपल्याला नेहमी भेटतच राहतो. कारण, मरण हे माणसाला असते, कलेला नसते, हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाले आहे.
 
यशवंत देव हे संगीत क्षेत्रात अदबीने घेतले जाणारे नाव. ‘असेन मी, नसेन मी तरी, असेल गीत हे’ असे आपल्या गीतातून सांगणारे यशवंत देव हे काळाच्या पडद्याआड गेले. काल मंगळवारी पहाटे शुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एखादी व्यक्ती आपल्यातून गेली तरी, ती तिच्या कार्यामुळे आपल्या सदैव स्मरणात राहते. त्यात जर तो कलाकार असेल, तर त्यांच्या कलेच्या स्वरूपातून तो आपल्याला नेहमी भेटतच राहतो. कारण, मरण हे माणसाला असते, कलेला नसते, हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाले आहे. ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ याचा प्रत्यय यशवंत देव यांच्या जीवनाकार्याकडे पाहून येतो. यशवंत देव आता आपल्यात नाहीत. परंतु, त्यांच्या सदाबहार गीतांच्या स्वरूपात ते नेहमीच आपल्या हृदयात जीवंत राहतील.
 

संगीतातील त्यांचे योगदान पाहता देव यांची जागा दुसरे कोणीच घेऊ शकणार नाही. त्यांच्या निधनाने संगीत जगतात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहेभातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हीदेखील त्यांचीच अजरामर कलाकृती! पण, ‘अर्ध्यावरती डाव मोडणाऱ्या’ या अधुऱ्या कहाणीप्रमाणे आपली संगीताच्या प्रवासाची कहाणी यशवंत देव यांनी अधुरी राहू दिली नाही. त्यांनी आपला संगीत प्रवास पूर्णत्वास नेला. परंतु, आयुष्याचा प्रवास करताना प्रत्येकालाच अखेरच्या स्थानकावर कायमस्वरूपी थांबावेच लागते. ते म्हणजे कधीही परत न येण्यासाठी! हा नियम त्यांनाही चुकला नाही.

 

यशवंत देव यांना आजवर ‘गदिमा पुरस्कार,’ ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ अशा अनेक मानाच्या पुरस्करांनी गौरविण्यात आले होते. आकाशवाणीशी देव यांचे अनोखे नाते होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी काम केले होते. आकाशवाणीवरील त्यांचा ‘भावसरगम’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला. पुढे जाऊन संगीतकार, गीतकार आणि गायक म्हणून संगीतातील हा ‘देव’ आपल्या कर्तृत्वाने उदयास आला. संगीताचे बाळकडू यशवंत देव यांना घरातूनच मिळाले. यशवंत देवांचे वडील हेच त्यांचे पहिले गुरू. यशवंत राव यांचे वडील विविध वाद्ये वाजवायचे. तबलावादनात त्यांचा विशेष हातखंडा होता. वडिलांकडूनच त्यांना आयुष्याचा खरा ताल गवसला.

 

जीवनात ही घडी अशीच राहू देअशी प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी भावना यशवंत देव यांनी या गीतातून संगीतबद्ध केली. ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ या मंगेश पाडगावकरांच्या कवितेला, अरुण दाते यांच्या सुरेल स्वरात लयबद्ध करून यशवंत देव यांनी आपणा सर्वांनाच या गीताच्या हिंदोळ्यावर झुलायला लावले. पाडगावकर, दाते आणि देव या तिघांचे जणू काही समीकरणच जुळले होते. देवांच्या या गीतांची सुरेल मैफल आता आपल्याला पुन्हा प्रत्यक्षात त्यांच्या मुखातून अनुभवता येणार नाही, याचे दु:ख सदैव जाणवत राहील. यशवंत देव यांनी वयाची नव्वदी पार केली होती. परंतु, चालू घडामोडींची त्यांना बित्तमबातमी असायची. एवढेच नव्हे, तर सध्या कुठे काय चालले आहे, याचा ते आढावा घ्यायचे. अनेक नाटकांना तसेच सिनेमांनादेखील यशवंत देव यांनी संगीत दिले.

 

अशी पाखरे येती

आणिक स्मृती ठेवून जाती,

दोन दिसांची रंगतसंगत,

दोन दिसांची नाती,

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,

गीत एक मोहरले ओठी,

त्या जुळल्या हृदयांची गाथा,

सूर अजूनही गाती...

 

देव यांनी संगीतमय केलेल्या या गीताचा सुरेल अर्थ आपल्याला खूप काही सांगून जातो. यशवंत देवांच्या स्मृती आपल्यासोबत सदैव राहणार आहेत. आयुष्य हे क्षणभंगूर आहे, याचीच आठवण करून देणारे हे गीत! ‘तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे रे...’ हेदेखील देवांचे एक अजरामर गाणे. यशवंत देवांची अशीच अनेक सदाबहार गीते गाण्यासाठी आम्हालाही सूर लावू दे, असे म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. देव यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक मोठा आसामी आपण गमावला आहे. आजवर त्यांच्या या संगीतावर ‘सूर लावू दे रे’ या गीतातील ओळींप्रमाणे कित्येक गायकांनी आपल्या स्वरांची पौर्णिमा यशवंत देव यांना वाहिली आहे. देव यांच्या स्वरांची पहाट आता आपल्यासाठी पुन्हा कधीच उजाडणार नाही. हे अटळ सत्य जरी असले तरी, त्यांच्या संगीताने, त्यांच्या गीतांमधून ते आपल्यातच राहणार आहेत.

 
 - साईली भाटकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/