पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर
महा एमटीबी   03-Oct-2018

 


 
 
मुंबई : गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘गानसरस्वती पुरस्कार’ मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे आद्यशिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरू केला आहे.
 

भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात यश मिळवलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या कलाकारास हा गानसरस्वती पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१७ साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होतापं. संजीव अभ्यंकर हे ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पं. जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे, तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला आहे. या पुरस्काराबाबत पं. संजीव अभ्यंकर म्हणाले, “हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद मला झाला आहे. या पुरस्कारच्या रुपाने किशोरीताईंचा आशीर्वाद मला मिळाला असल्याचे मी समजतो.” मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पं. संजीव अभ्यंकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/