नकाराचे अस्त्र
महा एमटीबी   29-Oct-2018


नकार... मिळायला सोपा, पण पचवायला तितकाच अवघड. कोणालाही नकोशी वाटणारी ही भावना. मन दुखवणारी, नाती तोडणारी... या नकाराची कारण, त्याच्या खोलवर होणाऱ्या जखमांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेला हा विचार...

 

आपल्या आयुष्यात आपण सगळ्यांना आवडलो पाहिजे, सगळ्यांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, अशी मनाला सदैव प्रसन्न ठेवणारी आपली इच्छा असते. अर्थात, आपण जे जे करू ते ते लोकांना आवडेलच, असे नाही. किंबहुना, या जगातील जन्माला आलेली माणसे प्रत्येकाला आवडलीच पाहिजे, असाही काही तात्त्विक नियम नाही. पण, होते काय की, आपण या तथाकथित आडाख्यांना गृहीत धरून चालतो. किंबहुना, ‘नकारासारखे दुसरे महाभयंकर अस्त्र या जगात नाही. हे धारदार अभिमंत्रीत अस्त्र आहे. हे अस्त्र माणसाला असे घायाळ करते की, आपला जिवंत शत्रूसुद्धा आपल्याला कणाकणाने मारून टाकू शकत नाही. ‘नकारही आपल्या आयुष्यातील जवळजवळ नित्यच होणारी, भळभळणारी भावनिक जखम. ती खूप प्रखर आहे. पूर्वीच्या जमान्यात कुटुंब, जवळची मित्रमंडळी, वाडीतील, आजूबाजूचे लोक, दूरचे नातेवाईक एवढ्यांपुरते आपले सामाजिक वलय मर्यादित होते. त्यामुळे नकाराचे प्रसंगसुद्धा त्या वलयापर्यंतच मर्यादित होते.

 
 
 
आज सोशल मीडियाच्या चॅटच्या अॅप्सच्या कृपेमुळे आपण एकावेळी हजारो लोकांच्या संपर्कात असतो. यापैकी कुणीतरी आपले संदेश वाचत नाही किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला नकार देत असतो, टीका करतो. अशाप्रकारे आपल्याला अस्वीकार करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत चाललेली दिसते. याशिवाय अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्यानामंजुरीअनुभवत असताना आपल्या आयुष्यात खूप मोठमोठेनापसंतीचे गंभीर विध्वंसक प्रसंग घडत असतात. जसे की, आपली प्रेमात फसवणूक होते, कामावरून काढून टाकले जाते, सामाजिक निंदानालस्ती होते. या अशाप्रकारच्या जबर अनुभवांतून होणारं दु: आपल्या मनाला बधिर करून टाकतं. तथापिनकाराची व्याप्ती छोटी असली काय किंवा मोठी असली काय, एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे, आपल्या मनाला क्लेश होणे.
 
 
 

याशिवाय शरीरविज्ञानाच्या माध्यमातूननकाराचा व्यक्तीच्या मेंदूवर होणारा परिणामही खूप महत्त्वाचा आहे. नकारामुळे व्यक्ती स्वत: स्वत:चे नुकसान करते. याचे कारण म्हणजे, आपल्या मेंदूमध्ये या भावनेच्या अनुभवांतून होणारी सक्रियता. मेंदूतील काही भाग नकाराच्या भावनेमुळे विकृतरित्या सक्रीय होतात त्यामुळे माणसाच्या भावनिक प्रतिसादातही विकृत बदल दिसून येतात. आक्रमकता, संताप चीड यांसारख्या भावना उद्दिपीत होऊन त्या वागणुकीतसुद्धा प्रदर्शित होतात. त्याक्षणी आपण आपल्या कुटुंबाचे, सोसायटीचे किंवा देशाचे जबाबदार सदस्य आहोत, हेसुद्धा व्यक्ती विसरून जाते बेजबाबदारपणे वागते. यामुळे आपण भांडणातून टोकाच्या घटना घडलेल्या पाहतो. आत्महत्येपासून ते आपल्या जवळच्या व्यक्तीचा, अगदी आईचासुद्धा खून स्वत:च्या मुलाने केल्याच्या घटना आपण ऐकतो.

 
 

आता प्रश्न असा आहे की, आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपली एखादी गोष्ट नापसंद केली, तर आपल्याला इतकं वाईट का वाटतं? एखाद्या व्यक्तीने आपलं कौतुक नाही केलं, तर आपल्या हृदयात वेदना का होतात? आपला मूड का बिघडतो? आपण का इतके घायाळ होतो? सगळ्यात मोठी मानसिक हानी जी अशानकारानंतर होते, ती आपण स्वत: निर्माण केलेली असते. आपल्या आत्मसन्मानाला झालेली ती इजा असते. आपल्या भावनेची ती गंभीर जखम असते. कधीकधी वरवरची असते पण, कधी कधी ती अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी आयुष्यभर भळभळत वाहत असते. त्या जखमेसाठी जगात तरी औषध सापडणार नाही. कारण, ती आपल्या मनाच्या कप्प्यात खोलवर रुतलेली असते. इतर कोणाला ती दिसत नाही. समजत नाही. दुर्देवाने अशा खच्चीकरण करणाऱ्या नकाराच्या प्रसंगातून जाताना आपण स्वत:लाच नावं ठेवतो. आपल्या वैगुणांवर आक्रोश करतो. स्वत:ची टीका करत राहतो. स्वत:चा तिटकारा वाटतो. एकूण काय, तर आपल्या स्वाभिमानाला जेव्हा निसर्गत: ठेच पोहोचलेली असते, तेव्हाच नेमके आपणच त्याचे गंभीर खच्चीकरण करत असतो. ज्यावेळी मन काही ना काही कारणाने घायाळ होते, दुखावते; तेव्हा गरज असते ती भावनिक मलमपट्टीची. आपल्या सग्यासोयर्यांनी ती केली, तर उत्तमच. पण स्वत: जेव्हा माणूस स्वत:च्या जखमा वाढवितो, तेव्हा दुसरा कुठला वैद्य त्या जखमांना भरणार वा औषध देणार? आणि त्यांनी ती जबाबदारी घ्यावी तरी का? अर्थात, आयुष्य हे अनुभवांचा महासागर आहे. काही गोंजरणारे, तर काही भेडसावणारे. पण, या साऱ्या अनुभवांतून शहाण्या माणसाने शिकावे समृद्ध व्हावे हे खरे.

 

(क्रमश:)

- शुभांगी पारकर  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/