दुष्काळाशी दोन होत करणारा ‘जलदूत’
महा एमटीबी   28-Oct-2018

 


 
 
 
दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर आधीपासूनच घोंगावत होते. हे सावट वेळीच ओळखून त्यावर मात करण्यासाठी जलसंधारणाची तयारी आधीच सुरू केली, ती पंचाक्षर जंगम यांनी!
 

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. परंतु, या येणार्‍या दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर आधीपासूनच घोंगावत होते. हे सावट वेळीच ओळखून त्यावर मात करण्यासाठी जलसंधारणाची तयारी आधीच सुरू केली ती पंचाक्षर जंगम यांनी! पंचाक्षर जंगम हे सांगलीतील तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावचे सरपंच आहेतगावचे सरपंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच दुष्काळ नावाचा शत्रू त्यांना दिसू लागला होता. आपल्या सिद्धेवाडी गावापुढे दुष्काळाचे संकट उभे राहू नये, म्हणून त्यांनी दीड वर्षापूर्वीच गावातील अग्रणी नदीवर बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. पंचाक्षर जंगम यांच्या हाकेला ओ देत गावकरीही या कार्यासाठी एकवटले. आपला सरपंच स्वत: गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इतके कष्ट घेत आहे, हे दिसून आल्यामुळे गावकरीही या कामात हातभार लावू लागले. गावातील अग्रणी नदी गावकऱ्यांनी मिळून गाळमुक्त केली. विशेष म्हणजे या गाळातूनच अग्रणी नदीवर पाच बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे आज नदी पुनर्जीवित झाली आहे. नदीच्या आसपासचे ओढे, विहिरी, कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढली आणि सिद्धेवाडी हे गाव पुन्हा एकदा हिरवेगार झाले.

 

आज दीड वर्षानंतरही दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हीच अग्रणी नदी आणि त्यावरील पाच बंधारे संपूर्ण गावाला बळ देत आहेत. याविषयी बोलताना पंचाक्षर जंगम सांगतात की, “पाऊस पडणे, न पडणे हे काही आपल्या हातात नसते. परंतु, मग आपल्याला जे शक्य आहे. निदान ते तरी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” पंचाक्षर जंगम यांचे जलसंधारणाचे कार्य इथेच थांबत नाही, तर गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी चरे मारून पाणी अडवण्याचे कार्यही त्यांनी केले. तसेच घरांच्या पागोळ्यांतील पाणी साठविण्याचे आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले. पंचाक्षर यांनी केलेल्या या आवाहनाला योग्य प्रतिसादही मिळाला. आज पंचाक्षर यांच्या कार्यामुळे गावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. किमान पुढील मार्च, एप्रिल महिन्यांपर्यंत म्हणजेच पुढील उन्हाळ्यापर्यंत तरी अख्ख्या गावाला पाणी पुरेल, इतका मुबलक पाणीसाठा आता सिद्धेवाडी गावाकडे उपलब्ध आहे. सिद्धेवाडी हे गाव गेली १० ते १५ वर्षे दुष्काळाचा सामना करत होते. पूर्वी गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागायचे. पण आता पंचाक्षर जंगम यांच्या कामगिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

 

गाळातूनच बंधारे बांधण्याची ही अनोखी कल्पना पंचाक्षर जंगम यांच्याच सुपीक डोक्यातून आली. अग्रणी नदीतील एवढ्या गाळाचे आता करायचे काय? हा प्रश्न डोळ्यांपुढे होताच. याच गाळाचा वापर करून बंधारे तयार केले तर? ही कल्पना त्यांना सुचली. गाळातूनच बंधारे बांधल्यामुळे मुसळधार पावसात ते वाहून जाण्याची शक्यता होती. त्यासाठी या बंधाऱ्यांचे पक्के बांधकाम होणे गरजेचे होते. पंचाक्षर यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांची साथ तर लाभलीच पण, त्याचबरोबर आता सरकारही त्यांच्या मदतीला धावून आले आहे. बंधाऱ्यांचे बांधकाम पक्के करण्यासाठी सरकारकडून लवकरच ४० लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती पंचाक्षर यांनी दिलीआपल्याला या जलसंधारणाच्या कार्यासाठीची प्रेरणा त्यांना राजेंद्रसिंह राणा यांच्याकडून मिळाली,” असे पंचाक्षर आवर्जून सांगतात. “राजेंद्रसिंह राणा यांचे राजस्थानमधील जलसंधारणाचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याबद्दल मी ऐकून होतो. त्यातूनच मला ही प्रेरणा मिळाली,” असे त्यांनी सांगितले.

 

हे जलसंधारणाचे कार्य करण्यासाठी आलेल्या एकूण खर्चासाठी गावकऱ्यांकडून पैसे जमविण्यात आले. तसेच पंचाक्षर यांनीही आर्थिक मदत केली. सिद्धेवाडी या गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. सरपंच म्हणून पंचाक्षर जंगम यांनी गावाच्या कल्याणासाठी केलेले कार्य गावकऱ्यांनी आजवर पाहिले आहे. त्यामुळेच पंचाक्षर यांच्यावर गावकऱ्यांनी दृढ विश्वास दाखविला आणि या जलसंधारणाच्या कार्यात त्यांना मोलाची साथ दिली. याबद्दल पंचाक्षर गावकऱ्यांचे आभार मानायला विसरत नाहीत. सांगलीतील इतर तालुक्यांतील गावांनीच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील गावांनी सिद्धेवाडी गावाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा. यासाठी हे कार्य आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करू,” असे पंचाक्षर जंगम विश्वासाने म्हणतात.

 

- साईली भाटकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/