महर्षी दयानंद सरस्वती यांचा वारसा पुढे नेण्याची गरज : राष्ट्रपती
महा एमटीबी   26-Oct-2018
 
 

आंतरराष्ट्रीय आर्य संमेलन २०१८ चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन   

 

नवी दिल्ली : देशाला विश्वगुरु बनण्यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शक तत्वांवर चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले, महर्षी दयानंद सरस्वती यांच्या अभियानाला पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन, जुन्या चालीरीती आणि महिला सशक्तीकरणासह आधुनिक विचार रुजवण्याचे काम सुरू ठेवण्याची सध्या गरज असल्याचेही ते म्हणाले. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार देश प्रगतीथावर पोहोचत आहे.

 

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी दिल्लीतील प्रदुषणाविषयीही चर्चा केली. सण उत्सवादरम्यान पर्यावरणाला बाधा येणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ते म्हणाले, दिल्लीत प्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. इथल्या लोकांना श्वास घेतानाही अडचणी येतात. दिवाळीत फटाक्यांमुळे दिल्लीची हवा आणखी विषारी बनण्याचा धोका आहे. आपण आपले सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची हानी नाही याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.

 

सणासुदीच्या काळात समाजात शांतता आणि एकोपा नांदावा यासह पर्यावरणाचीही हानी होणार नाही यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, गेल्या काही काळात हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून त्यामुळे दिल्लीत धुसर वातावरण असते. याला काही नैसर्गिक कारणे आहेत. मात्र, वाहनांतून होणारे प्रदुषण, बांधकाम उद्योगांद्वारे उडणारी धूळ, पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यांत शेतीसाठी शेतातील तण जाळण्याचे काम सुरू असते. याचा एकत्रित परिणाम दिल्लीच्या प्रदुषणावर होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वांनीच पर्यावरण रक्षणाचा विचार करावा, असे राष्ट्रपती म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/