द्रोणांचा उद्रेक!
महा एमटीबी   24-Oct-2018
 
 

दुर्योधनाला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी द्रोण ११व्या दिवशी एकदमच आक्रमक झाले. युधिष्ठिराला कैद करायचे होते म्हणून त्यांनी निकराची लढाई सुरू केली. त्यातच त्यांना नेमके असे काही क्षण मिळाले जेव्हा अर्जुन आपल्या भावासोबत नव्हता. या संधीचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी त्यांनी चंग बांधला आणि पांडवांच्या सैन्याचा धुव्वा उडवत ते पुढे आले. त्यांनी आपल्या सारथ्याला आपला रथ युधिष्ठिराच्या रथासमोर नेण्यास सांगितले. ते म्हणाले, “आपल्या शिष्यांशी युद्ध करणे महाकठीण काम आहे. पाचही पांडव, धृष्टद्युम्न, शिखंडी आणि सात्यकी हे सारे माझेच शिष्य... परंतु, आता ही संधी दवडता कामा नये. अर्जुन परत येण्यापूर्वी मला माझे ध्येय साध्य केलेच पाहिजे.”

 

त्यांच्या जोशापुढे पांडवांचे सैनिक हतप्रभ झाले. द्रोण बाणांचा वर्षाव करत करत युधिष्ठिराकडे सरकत होते. युधिष्ठिराचे लक्ष नसताना त्यांनी त्याला गाठलेही! तो निकराने लढला पण, द्रोणांचा हल्ला तो थांबवू शकला नाही. युधिष्ठिराच्या धनुष्याचे द्रोणांनी दोन तुकडे केले. तो असहाय्य झाला! त्याला मदत करण्यासाठी धृष्टद्युम्न सरसावला आणि जशी धरती सागरास थोपवते तसे त्याने द्रोणांना थोपवून धरले. युधिष्ठिराच्या रथाच्या संरक्षकास द्रोणांनी जेरीस आणले. त्यांनी शिखंडी आणि उत्तमौज यांनाही जखमी केले. द्रौपदीचे पुत्रही द्रोणांपुढे हतबल ठरले. सात्यकी आणि विराट यांनीही त्यांच्यापुढे हार पत्करली. मग परिस्थितीचे गांभीर्य धृष्टद्युम्नाच्या लक्षात आले. तो खूप निकराने लढू लागला पण, द्रोणांच्या अंगात जणू कोणतीतरी अमानवी शक्ती संचारली होती नव्हे, यमच अवतरला होता! त्यांना कसेही करून आज युधिष्ठिराला कैद करून न्यायचे होते आणि दुर्योधनाला दिलेल्या वचनाची पूर्ती करायची होती.

 

इतक्यात वेगाने अर्जुनाचा रथ तिथे आला. रथाच्या दोन्ही बाजूला कौरवांच्या सैनिकांचे मृतदेह पडत होते. अर्जुन रक्तात न्हाऊन निघाला होता. तो प्रचंड वेगाने द्रोणापर्यंत येऊन धडकला! दुर्योधनाची बाजू आपल्या गुरूंनी घ्यावी, हे त्याला बिलकुल आवडले नव्हते आणि त्यांच्याविषयी मनात जो आदर होता तो नष्ट झाला होता. त्याच्या नयनांतून द्रोणांविषयी क्रोध आणि तिरस्कार आगीप्रमाणे बाहेर पडत होता. त्याच्या धनुष्यातून बाणांचा पाऊस पडत होता. शेवटी द्रोणांना कळून चुकले की, त्यांची हातची संधी आता चुकली आहे. द्रोणांनी शर्थ करूनही त्यांना अर्जुनाने हतप्रभ केले आणि इतक्यात सूर्यही मावळला. युद्धाचा ११वा दिवस अशा रितीने पांडवांची सरशी होऊन संपला!

 
- सुरेश कुळकर्णी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/