शरणागतीच्या उंबरठ्यावर
महा एमटीबी   23-Oct-2018होंडुरास शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,” असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.


अमेरिकेपुढे सध्या होंडुरास नामक भले मोठे संकट आ वासून उभे आहे. “होंडुरास शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,” असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. होंडुरास शरणार्थी हे अवैध पद्धतीने अमेरिकेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. सध्या मेक्सिकोच्या सीमेवरील एका पुलावर हे शरणार्थी अडकून पडले आहेत. काळजीची बाब म्हणजे तब्बल तीन हजार शरणार्थींच्या ताफ्यात महिला आणि बालकांची संख्या जास्त आहे. एकूण पाच हजार जण या ताफ्यात होते. त्यापैकी दोन हजार जण आपल्या देशात परतले. पण उरलेल्या लोकांनी एका पुलावर आसरा घेतला. त्यापैकी काही जणांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केल्याचादेखील आरोप त्यांच्यावर आहे. याला प्रत्युत्तर देत पोलिसांकडून या जमावावर अश्रूधुराचे फवारे सोडण्यात आले.

 

गरिबी आणि हिंसाचाराला कंटाळून होंडुरास शरणार्थ्यांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला. मुळात एखाद्या देशातील लोकांनी देश सोडून जाणे हे त्या देशासाठी नामुष्कीचे लक्षण. पण गरिबी अर्थात दारिद्य्र ही एक अशी गोष्ट आहे, जी भल्याभल्यांना नको नको ते करायला लावते. जास्त पैसा आल्यावर जसा डोळ्यांसमोर धूर येतो, असे म्हणतात तसेच गरिबीमुळे डोळ्यांपुढे अंधार दिसू लागतो. अशावेळी काय करावे, हे सुचत नसते. योग्य मार्ग दिसत नसतो. त्यात हिंसाचाराच्या घटनांची या स्थितीला जोड असणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल. शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. असेच जीव मुठीत धरून देश सोडून आलेले हे होंडुरास शरणार्थी या पुलावर सध्या आसऱ्याला आहेत. त्यांच्याबरोबर अनेक लहान मुले आपल्या तहानभुकेवर नियंत्रण ठेवून तग धरून आहेत. दया म्हणून तरी अमेरिकेचे दरवाजे आपल्यासाठी केव्हातरी उघडतील, ही भाबडी आशा त्यांनी बाळगली आहे. अमेरिकेने एकदा का आपल्याला स्वीकारले की मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते तयार आहेत. पण ही झाली नाण्याची एक बाजू, दुसऱ्या बाजूने अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनेही विचार करायला हवा.

 

एवढ्या अफाट संख्येने असलेल्या जमावाला देशात प्रवेश देणे हेदेखील एखाद्या देशासाठी मोठे संकटच असते. असेच जर सगळे देश शरणार्थींवर दया दाखवत राहिले तर अतिरिक्त लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित होईल. देशातील मूळ लोकसंख्येवर नियंत्रण मिळविणे हेच मोठे आव्हान असते. नुसतेच लोकसंख्या नियंत्रित असून उपयोग नाही तर त्या लोकसंख्येचा परिपूर्ण विकास होणेही तितकेच गरजेचे असते. देशातील लोकांना सेवासुविधा पुरवणे, हे त्या देशाचे कर्तव्य मानले जाते. या कर्तव्याची धुरा राष्ट्राध्यक्षावर असते. जर होंडुरास शरणार्थींना प्रवेश दिला तर त्यामुळे पुढे अनेक समस्यांना अमेरिकेला तोंड द्यावे लागेल. परिणामी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी यामुळे वाढतील. होंडुरास शरणार्थींना प्रवेश दिला, तर लोकसंख्यावाढ होईलच, पण अमेरिकेतील सार्वजनिक परिवहनाची साधने आणि सार्वजनिक साधनसंपत्तीवर या लोकसंख्यावाढीचा ताण येईल. या अतिरिक्त ताणामुळे मूळ अमेरिकन नागरिकच देश सोडून गेले तर? हादेखील विचार एकदा करून पाहायला हवा. जगात महासत्ता म्हणून मिरविणारी अमेरिका या संकटावर कशी मात करणार? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून आहे. पण होंडुरास शरणार्थींच्या ताफ्यातील लहानग्यांचा यात काय दोष? अशा भीषण परिस्थितीत ही बालके आपल्या कुटुंबासोबत अडकली आहेत. या दरम्यान घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांच्या जखमा त्यांच्या आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील. आपल्या मुलांची जडणघडण ही एका सुरक्षित पोषक वातावरणात व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटते. मग होंडुरास शरणार्थी याला अपवाद का ठरावेत?

 

स्थलांतरित लोकांनी जायचे तरी कुठे? त्यांनी स्थलांतर करावे तरी कोणत्या देशात? हा आज अवघ्या जगाला पडलेला प्रश्न आहे. पण या प्रश्नाचे उत्तर मिळणार तरी कोणाकडून? अमेरिकन नागरिकांकडून तरी का तडजोडीची अपेक्षा करावी? त्यांनाही त्यांच्या देशात मूळ नागरिक म्हणून अधिकार आहेतच. पण मग देशातील अंतर्गत प्रश्न वेळीच सोडवायला हवेत. म्हणजे देश सोडून जाण्याची वेळच येणार नाही. आज हे शरणार्थी अमेरिकेला शरण आले आहेत. उद्या जगातील इतर देशांनाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असे होऊ नये, यासाठी शेजारी राष्ट्र म्हणून निदान आपल्या शेजारच्या देशातील लोकांवर देश सोडून जाण्याइतकी वाईट परिस्थिती ओढवणार तर नाही ना, याचा अंदाज घेणे गरजेचे झाले आहे. मग याबाबतीत हस्तक्षेप करायचा की नाही ही पुढची गोष्ट आहे. पण सतर्क राहणे नेहमी फायद्याचे ठरते.

 

- साईली भाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/