इजिप्शियनांचे वेळेचे गणित
महा एमटीबी   20-Oct-2018


 


रोज उगवणारा प्रकाशमान सूर्य, रात्रीचा शीतल प्रकाश देणारा चंद्र, आकाशात नियमित नेमाने उगवणारे ग्रह आणि नक्षत्र हे तर सर्व शक्तिमान देवता झालेच. त्याबरोबरच आकाशातील त्यांच्या नियमित उदय-अस्त अशा आवर्तनांमुळे ते आपले वेळेचे गणित सांभाळू शकतात, हे इजिप्तमधील चाणाक्ष विद्वानांच्या लक्षात आले.


चीन इजिप्त हे राष्ट्र आणि त्याचा सांस्कृतिक-सामाजिक-सांप्रदायिक इतिहास फार गूढ आणि गहन आहे, त्याबरोबरच खूप रंजकसुद्धा आहे. त्या चिह्नसंस्कृतीचा विचार करताना आता आपल्यासमोर या संदर्भात काही मूलभूत प्रश्न उभे राहतात. आपणच आपल्याला सगळे प्रश्न विचारू आणि त्याचे उत्तर आपणच शोधायचा प्रयत्न करूया. आपला पहिला प्रश्न : प्रत्येक गावात वेगळे पंथ-संप्रदाय का असावेत आणि खूप साऱ्या देवी-देवतांची उपासना, आराधना का केली जात असावी? त्यात एकसंधता का दिसत नाही? निसर्गचक्राचे नियमित आवर्तन व्हावे, त्यामध्ये पूर-दुष्काळ येऊ नयेत, माणसे-पशु-पक्षी यांचे जीवन सुरक्षित असावे ही देव-देवतांकडून असलेल्या अगदी प्राथमिक अपेक्षा होत्या. यासाठीच देवतांची उपासना-आराधना केली जात होती. रोज उगवणारे, ऊर्जा-उष्णता आणि शांत चंद्रप्रकाश देणारे सूर्य-चंद्र या आकाशस्थ तारे-ग्रह यांची निवड यातील काही देवता म्हणून केली गेली. आपला दुसरा प्रश्न आहे... देव-देवता काय देणार आहे किंवा तिची उपासना, आराधना का करायची? याची संकल्पना कशी मांडली असावी आणि त्यावरून शिल्प-मूर्ती-चित्र अशा व्यक्त माध्यमातील रचना का आणि कशी केली गेली असावी? आपणच आपल्याला हा प्रश्न विचारायची प्राथमिक गरज अशासाठी की, या संकल्पना आणि व्यक्त रचना यांना सांधणारा दुवा म्हणजे आपले आपला अभ्यास... चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ!

 

वरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकत्रितपणे शोधणे आवश्यक आहे. कारण, त्यांची सरमिसळ खूप प्राचीन इजिप्तमधे अगदी सहजपणे झालेली आहे. रोज उगवणारा प्रकाशमान सूर्य, रात्रीचा शीतल प्रकाश देणारा चंद्र, आकाशात नियमित नेमाने उगवणारे ग्रह आणि नक्षत्र हे तर सर्व शक्तिमान देवता झालेच. त्याबरोबरच आकाशातील त्यांच्या नियमित उदय-अस्त अशा आवर्तनांमुळे ते आपले वेळेचे गणित सांभाळू शकतात, हे इजिप्तमधील चाणाक्ष विद्वानांच्या लक्षात आले. अर्थात, या सर्व अभ्यासाला काही शतकं वेळ नक्कीच लागला असेल. काळ-वेळेचे गणित समजू लागले म्हणजे अमुक एक नक्षत्र आकाशात अमुक ठिकाणी आले की, आकाशातून पाऊस पडायला लागतो. अमुक एका नक्षत्राच्या उगवण्यामुळे पाऊस पडायचा थांबतो, अशी साधी सोप्पी मात्र महत्त्वाची गणिते त्या विद्वान अभ्यासकांना मांडता आली. काही शतकांपासून येणारा पूर, रोगराई, नुकसान कसे टाळता येईल त्यांची तयारी आधीच करता येऊ लागली. त्या काळात एका राजघराण्याची सत्ता दीर्घकाळ एका प्रदेशावर टिकून राहिलेली असे. वर्तमानातील सत्ताधारी राजा म्हणजे फरोहा याच्या नावाने आकाशातील एखादा ग्रह किंवा नक्षत्र निवडले जात असे. प्रत्यक्ष फरोहा राजाचे दर्शन झाले नाही तरी, त्या नक्षत्राकडे पाहून श्रद्धावान प्रजेला प्रत्यक्ष राजाच भेटल्याचा आनंद मिळत असे. पूर्वी सत्तेवर असलेले शक्तिमान फरोहा ज्यांचा आता मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने आकाशात रोज दिसणारे एखादे नक्षत्र निश्चित केले जात असे आणि प्रजेला रोज त्यांच्या दर्शनाचा आनंद मिळत असे. अशा तारे-ग्रह-नक्षत्र स्वरूपातील आजी-माजी राज्यकर्त्यांचे दैनंदिन होणारे दर्शन याला त्या काळात फार मोठे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-सांप्रदायिक-धार्मिक महत्त्व निर्माण झाले होते.

 

 
चित्र क्र. १ 
 

दिवसा दहा-बारा तास दिसणाऱ्या सूर्यदेवाच्या या सगळ्या नियमित निसर्गचक्राचा अभ्यास काही शतकांपासून जरी झालेला होता तरीही उपासना, आराधना केल्याशिवाय सूर्यदेव उगवणार नाही, अशी एक श्रद्धा(आजच्या काळाच्या संदर्भात अंधश्रद्धेकडे झुकणारी) त्या काळात प्रचलित होती. याचे कारण, उगवतीपासून मावळतीपर्यंतच्या या दहा-बारा तासांच्या काळातसुद्धा दर तासागणिक बदलणारी त्याची रूपं आणि त्या कला त्यांना दिसत होत्या. अगदी उगवतीला आणि अगदी मावळतीला सौम्य आणि शीतल दर्शन देणारा केशरी, नारिंगी सूर्यदेव त्यांना दिसत होता. तसाच मध्याह्नीला डोक्यावर तळपणारा प्रखर, दाहक सूर्यदेवही त्यांना जाणवत होता. कित्येक दिवस पावसाच्या दिवसांत भरपूर काळ्या ढगांच्या आड लपून दर्शन दुर्लभ झालेला सूर्यदेव त्यांना कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. सुरुवातीच्या अप्रगत समाजासाठी नाईल नदीचे वार्षिक पूर हा आपत्ती आणि नुकसानदायक झाला होता. कालांतराने तीन महिने सतत वाहणाऱ्या पुराच्या पाण्याने वाहून येणारा सुपीक गाळ किती महत्त्वाचा आहे, पुढच्या शेतीव्यवस्थेसाठी त्याचे महत्त्व काय आहे, याची जाणीव इजिप्शियन समाजाला झाली होती. ‘इजिप्शियन सिलिंडर’ (चित्र क्र १ आणि २) या कालमापन व्यवस्थेमध्ये आणि त्या नावाच्या अवजारामध्ये, ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपासून ते ख्रिस्तजन्मापर्यंत, या पूर्ण काळातील खगोलीय तारे- ग्रह-नक्षत्रे, नाईल नदीचे वार्षिक पूर, शेती उत्पादन, राजे फरोह यांचा जन्म-मृत्यू, फरोहांच्या विरोधात झालेली बंडाळी आणि सत्तापालट या सर्व घटनांची नोंद केली गेली होती.

 

 
चित्र क्र.  
 

आधुनिक चिह्नं अभ्यासकांना याच कालमापन व्यवस्थेतून आणि उपलब्ध झालेल्या सिलेंडरच्या माध्यमातून इजिप्शियन चिह्नसंस्कृती, त्यातील चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ यांचा अभ्यास करणे सहज शक्य झाले आहे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे सूर्यदेवाला ‘आमून रे’ अथवा ‘आमून रा’ या नावाने संबोधित केले गेले होते. याचे सर्वात प्राथमिक चिह्न म्हणजे सिंहाच्या शरीरावर स्त्रीचे तोंड अशा स्वरूपाचे होते. त्यानंतरच्या काळात मानवी शरीरावर गरुडाचे तोंड आणि त्यावर एका सर्पाने वेढून घेतलेली सूर्याची तबकडी अशा रचनेतील सूर्यदेव, तत्कालीन समाजात फार लोकप्रिय चिह्न होते. मानवी शरीरावर मेंढ्याचे तोंड असलेली चिह्न रचना, सूर्यास्तानंतर आपला सूर्यदेव अशा श्रद्धेने समाजाने स्वीकारली होती. या सर्व चिह्न आणि प्रतीकांना त्या त्या पंथ, सांप्रदायिक श्रद्धेनुसार चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ दिले गेले होते. ‘हेलिओपोलिस’ या राज्याच्या देवळात या ‘आमून रे’ या सूर्यदेवाच्या शिल्पाची झालेली स्थापना हे या संकल्पनेला प्रथम मिळालेली समाजमान्यता असेच म्हणायला हवे. ‘हेलिओपोलिस’ या शब्दाचा इजिप्शियन भाषेतील अर्थ ‘सूर्यदेवतेचे शहर’ असाच आहे. ‘आमून रे’ या जोड शब्दातील ‘आमून’ म्हणजे सूर्याची अजूनही न दिसलेली अलौकिक शक्ती असा अर्थ व्यक्त करते. त्यातील ‘रे’ हा शब्द म्हणजे नियमित उगवून जगाला प्रकाश देणारा, अस्ताला जाणारा सूर्यदेव असा अर्थ व्यक्त करतो. जसे जसे राजे फरोहा शक्तिमान झाले तसे तसे त्यांनी स्वतःला ‘आमून’ असे संबोधित करायला सुरुवात केली. जणू काही अलौकिक शक्ती प्राप्त झालेली देवता. आता ‘आमून रे’ या नावाचा संधी नष्ट झाला आणि नियमित उगवणाऱ्या सूर्यदेवाला फक्त ‘रे’ असे संबोधन कालांतराने प्राप्त झाले. आज, ‘रे’ म्हणजेच इंग्लिश शब्द RAY जगभरातील सर्व भाषांत ‘सूर्यकिरण’ या एकच अर्थाने स्वीकृत झालेला आपल्याला दिसतो. ‘वैश्विक सत्य’ आणि ‘अविचल न्याय’ या दोन निश्चित संकल्पना या इजिप्शियन सूर्यदेवाच्या चिह्न - प्रतीकाला प्राप्त झाल्या. एका अस्तंगत मात्र अतिप्राचीन इजिप्शियन चिह्नसंस्कृतीचा प्रभाव, जगभरातील अनेक संस्कृती आणि भाषांवर पडलेला आहे याची जाणीव आपण ठेवायलाच हवी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/