उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप
महा एमटीबी   02-Oct-2018हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील.


आपल्या नियोजित कार्यासाठी कृष्णानदीच्या खोऱ्यातील मसूरला आल्यानंतर समर्थांनी अनुग्रह देऊन उत्सवाच्या निमित्ताने हिंदुंना धार्मिक पातळीवर एकत्र आणायला सुरुवात केली. हे आपण मागील भागात पाहिले. मसूर परगणा आदिलशहाच्या ताब्यात होता तरी, आदिलशहाने कराड व मसूर भागाची देशमुखी शहाजीराजांना दिली होती. शहाजीराजांकडे सैन्यही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आदिलशहा शहाजीराजांना वचकून असे. तीर्थाटनाच्या काळात समर्थांची कर्नाटकात शहाजीराजांची भेट घेतली असावी. शिवरायांच्या कार्याला अजून सुरुवात झालेली नव्हती. समर्थांना अंदाज होता की, मसूरला त्यांच्या धार्मिक कार्याला सरळसरळ विरोध करणारे कोणी असणार नाही. समर्थ जालना, बीड, अहमदनगर, पुणे, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड असा प्रवास करत मसूरला आले होते. मसूर हे सातारा जिल्ह्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले, तर तेथून जवळच असलेला सांगली जिल्हा ओलांडला की कर्नाटकची हद्द चालू होते. कर्नाटकात शहाजीराजांचे पूर्ण वर्चस्व होते. तेव्हा सर्वदृष्टींनी मसूर हे स्थान सुरक्षित होते. इ. स. १६४४च्या वैशाख मासात समर्थ कृष्णातीरी येथून पोहोचले. मसूरला ब्राह्मणवस्ती बऱ्यापैकी होती. तेथील अनेकांना स्वामींनी अनुग्रह दिला. इ. स. १६४५ला अवघ्या एका वर्षाच्या आत स्वामींनी तेथील अनुयायांना हाताशी धरून पहिला रामनवमीचा उत्सव मसूरला पार पाडला. स्थानिक अधिकारी मुसलमान असले तरी, उत्सवात मिरवणुकांना परवानगी मिळवणे तितकेसे कठीण नव्हते. कारण, त्या भागात शहाजीराजे, दिनायतराव व बाजी घोरपडे अशा मातब्बर मराठी सरदारांचे वर्चस्व होते. रामदासांनी इ. स. १६४५चा रामनवमीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला. स्थानिक लोकही खूश झाले. समर्थांच्या रुपाने त्यांना एक सात्विक भक्कम धार्मिक नेतृत्व मिळाले. समर्थांनी वेगवेगळी कामे सर्वांना वाटून सर्वांना उत्सवात सामिल करून घेतले. त्याचा अनुकूल परिणाम झाला.

 

कोदंडधारी राम आणि वीर हनुमान यांच्यावर समर्थांचे अतोनात प्रेम होते, भक्ती होती. रामाने त्याच्या आयुष्यात वानरांच्या मदतीने रावणासारख्या बलाढ्य शत्रूंचा नाश केला होता. सत्याचा असत्यावर विजय झाला होता. रामाने स्वपराक्रमाने सीतेला सोडवून आणले होते. रावणाच्या बंदिवासातील देवांची सुटका केली होती. रामाच्या या पराक्रमाचा रामदासांच्या मनावर मोठा प्रभाव होता. रामदासांना वाटत होते की, तत्कालीन राजकीय परिस्थिती रामायणातील रामाच्या वनवास काळासारखी होती. रावण आणि त्याचे हस्तक रामायण काळात निरपराध लोकांना सतत त्रास देत असत. पुराण सांगते की, रावणाने सर्व देवांना तेथे बंदिवासात ठेवले होते. समर्थकालीन राजकीय स्थिती व रामायणकालीन रामाच्या वनवासाची स्थिती यातील साम्य रामदासांसारख्या प्रतिभावंतांच्या लक्षात आले. रामायण काळात रावण अत्याचार करीत होता. त्याने सीतेला कपटाने पळवून नेले होते, तर येथे औरंगजेबसारखा कपटी बादशहा व त्याचे सैनिक हिंदुंवर अत्याचार करीत होते. हिंदू स्त्रियांना पळवून नेत होते. रावण हिंदुस्तानच्या दक्षिण टोकाकडील श्रीलंका बेटावर राहून सारी कामे बिनबोभाट करीत होता, तर इकडे औरंगजेब उत्तरेकडील दिल्ली, आग्रा येथे राहून देवळे पाडणे, मूर्ती फोडणे अशी विध्वंसक कामे करून हिंदुंना त्रास देत होता. रामाने स्वपराक्रमाने रावणाला संपवले. सीतेची सुटका केली. देवांना बंदिवासातून सोडवले. असंच काहीतरी आता घडावे, असे रामदासांना वाटत होते. रामदास अशा हिंदू राजांच्या शोधात सारा हिंदुस्तान पायी फिरले. त्यांना वाटत होते की, कोणीतरी रामसदृश पराक्रमी हिंदू राजाने औरंगजेबाला संपवावे आणि ही हिंदूभूमीरुपी सीता त्याच्या तावडीतून सोडवावी. औरंगजेबाला संपवल्यावर येथील तीर्थक्षेत्रांतील उदंड पाण्याचा येथील लोकांना धार्मिक विचारांचा आनंद घेण्यासाठी उपयोग होईल. तीर्थक्षेत्रे म्लेच्छांच्या तावडीतून मुक्त होतील. रामदासांनी त्यांच्या ‘आनंदवनभुवनी’ या काव्यात हेच स्वप्न पाहिले होते.

 

बुडाला औरंग्या पापी ।

म्लेच्छ संहार जाहला ।

उदंड जाहले पाणी ।

स्नानसंध्या करावया॥

 

समर्थांच्या डोळ्यांसमोर धार्मिक स्वातंत्र्याचे व त्यासाठी हिंदवी राज्याचे स्वप्न होते आणि तेही अखंड हिंदुस्तानासाठी! परंतु, त्या काळचा बहुजन समाज हा मरगळलेल्या स्थितीत होता. राजकीय आक्रमणाबरोबर धार्मिक आक्रमणही मोठ्या प्रमाणावर होत होते. लोक दहशतीखाली वावरत होते. तीर्थस्थाने भ्रष्ट झाली होती. हिंदू दावलमलिकासारख्या पीराला भजत होते. अशा हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील.
 
लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागे हीच रामदासांची दृष्टी समोर ठेवली होती, असे वाटते. लो. टिळक धर्मनिष्ठ व अत्यंत बुद्धिमान होते. धार्मिक एकजुटीचा उपयोग राजकारणासाठी करण्याची कल्पकता रामदासांकडून आली असल्याची शक्यता आहे. ‘केसरी’तील एका लेखात लो. टिळक लिहितात, “...ख्रिस्ती व मुसलमान धर्मात सार्वजनिक प्रार्थनेची जी पद्धत आहे, त्यापासून त्या धर्मातील लोकांस जो फायदा होतो, तशाच प्रकारचा फायदा दहा दिवसांच्या गणपत्युत्सव सार्वजनिक झाल्याने हिंदू लोकांस होईल, अशी आमची खात्री आहे. कोणत्याही देवतेची सर्वांनी एकनिष्ठपणे आराधना करणे यानेच उपासकांच्या मनास एक प्रकारचे वळण लागून त्यांच्यामध्ये उपासक बंधुत्वाची बुद्धी जागृत होते. मन व बुद्धी अशा रीतीने सुसंस्कृत झाल्यावर त्यांचा उपयोग तशाच रीतीने अन्य ठिकाणी ठेवण्यासही अडचण पडत नाही. स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाचा ज्यांस अभिमान वाटत नाही, त्यांस स्वराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान कोठून वाटणार? धर्मोन्नतीचा व धर्माभिमानाचा जर राष्ट्रीय अभ्युन्नतीशी काही संबंध असला तर तो याच प्रकारचा होय.’ (लो. टिळकांचा ‘केसरी’तील लेख) लोकमान्य टिळकांच्या या उद्गारात जणू रामदास स्वामींचे मनोगत व्यक्त झाले आहे. याचाच अर्थ रामजन्मोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्याच्या निमित्ताने रामदासांनी म्लेच्छांच्या विरोधात हिंदूमने एकवटण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची राजकारण सदृश कामगिरी म्हणावी लागेल.
 

- सुरेश जाखडी

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/