विनम्र
महा एमटीबी   02-Oct-2018


 
 

नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. जाणीवपूर्वक ती आपल्याला आचरणात आणायला लागते. नम्र माणसांना आतूनच आनंदाची जाणीव सतत होत राहते. स्वतःचा ढोल वाजवायच्या आवेशात नम्र माणसे दुसऱ्याचे खच्चीकरण करायचा प्रयत्न कधीच करत नाही. आपल्यासमोर नम्र माणसे आपल्या यशाच्या पत्त्यांचा बंगला उभा करायचा प्रयत्न कधीच करीत नाहीत. कारण, तो बंगला आतून मजबूत नसल्याने केव्हाही कोसळू शकतो.

 

महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि आज मनमोहन सिंग या साऱ्या जनतेच्या नजरेतील महान व्यक्ती. पण या व्यक्तींचं निरीक्षण केलं, त्यांच्याबद्दल वाचलं, तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, त्यांच्यातील ‘विनम्रता.’ आपले महान संतसुद्धा आपल्याला हीच शिकवण देतात. आज माणसे स्वत:ची शक्ती सिद्ध करण्यासाठी आक्रमक झालेली आपण पाहतो. यासाठी ती कुठल्याही थराला पोहोचतात, नको ती मनमानी करतात, ‘हम करे सो कायदा’ या थाटात वावरतात. खरे तर स्वतःला सातत्याने ‘सिद्ध’ करायचे हे दुष्टचक्र आहे. आपण सतत मग चकाकणाऱ्या सोन्यासारखे असण्याचा प्रयत्न करतो. क्षणोक्षणी आपण आपले यश झळकवण्याचा, फुशारक्या मारण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांना आपण कसे महान आहोत, हे दाखवायचा प्रयत्न करतो. या सगळ्या प्रयोगांत आपण अगदी वाहत जातो. आपली अमूल्य ऊर्जा यात वाया जाते. खरे पाहता, आपण स्वत:ची शेखी मिरविणे, इतर लोकांना आवडलेच पाहिजे असे जरूरीचे नसते. खरे तर स्वतःची शेखी मिरवणाऱ्या लोकांच्या यशाची किंवा त्यांना ज्या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो, त्या गोष्टींची लोकं थट्टा किंवा निंदाच करतात. अशा बेलगाम वागणुकीमुळे लोकांच्यात तुमच्याबद्दलचा आदर खूप कमी होतो. असे एक टॉप ऑफिसर आहेत की, त्यांची शेखी मिरवण्याची शैलीसुद्धा त्यांच्या ऑफिसातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रकारची अढी निर्माण करीत असे. ‘मी हे असे केले,’ ‘मी तुमच्यासाठी इतक्या गोष्टी केल्या,’ ‘माझ्यामुळे हे झाले,’ ‘माझ्यामुळे ते घडले’ असे म्हणणाऱ्या माणसांना ना घरात, ना ऑफिसात आदर मिळतो. तुम्ही जितकी जास्त बढाई मारता तितके जास्त लोक तुमच्यापासून दूर जातात. ते तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी वाईट बोलतात. लोकांच्या हेही लक्षात येते की, हा ‘मोठा’ समजला जाणारा माणूस मनाने किती ‘छोटा’ आहे. हा माणूस अहंपणाच्या कवचातच जगू शकतो. हे कवचसुद्धा बाह्यस्वरूपाचे आहे. क्षणभंगूर आहे. अशी कवचं परिस्थितीतील कुठल्याही आघाताने फुटू शकतात. त्यावेळी हा माणूस तळमळतो, तडफडतो. अशावेळी त्याला जगणे मुश्किल होते. सतत लोकांच्या डोळ्यांत व प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय असल्याने अशी माणसे ती प्रसिद्धी मिळाली नाही, तर सपशेल आपटतात.

 

याउलट जी माणसे बढाईखोर नसतात किंवा त्यांना लोकांना आपण खूप महान आहोत हे ‘सिद्ध’ करण्याची गरज भासत नाही. खरीखुरी ‘महानता’ ही फुलाच्या सुगंधासारखी आहे. ती नैसर्गिकरित्या दरवळत राहते. अशी महान माणसे आतून एक निरामय आनंद व आंतरिक समाधानाचा अनुभव घेतात. यश वा अपयश हे आयुष्यातील कर्मयोगाचाच भाग आहे, हे त्यांना पुरते पटलेले असते. त्यांचा निष्पाप आत्माच त्यांना मार्गदर्शन करतो. अभिमानाच्या आवाजाला ते थारा देतच नाही. अशा लोकांबद्दलचा आदर जनमानसात वाढतो. त्यांच्या मोठेपणाची खात्री लोकांना आपणहून पटते. लोक स्वतःहून या सच्छील व समाधानी माणसांचा गौरव करतात. खरे तर या लोकांना इतरांनी आपली स्तुती करावी किंवा उदो उदो करावा, अशी अपेक्षाच नसते. ते अंतर्मनातून सुरक्षित असल्याने त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास पूर्णपणे भरलेला असतो. त्यांना नेहमी चांगले दिसण्याची व भासण्याची किंवा आपण करतो ती प्रत्येक गोष्ट ‘बरोबर’ किंवा ‘महान’ आहे ते सिद्ध करण्याची मुळीच गरज भासत नाही. ते पुरेपूर त्यांच्या नैसर्गिक अस्मितेला सांभाळून जगतात. बाह्य स्तुतीची किंवा दिमाखाची त्यांना गरज भासत नाही. ते आपल्या हृदयातून लोकांशी संवाद साधतात. म्हणूनच अशी माणसे हृदयाला स्पर्शून जातात. याला आपण ‘नम्रता’ म्हणतो. नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. जाणीवपूर्वक ती आपल्याला आचरणात आणायला लागते. नम्र माणसांना आतूनच आनंदाची जाणीव सतत होत राहते. स्वतःचा ढोल वाजवायच्या आवेशात नम्र माणसे दुसऱ्याचे खच्चीकरण करायचा प्रयत्न कधीच करत नाही. आपल्यासमोर नम्र माणसे आपल्या यशाच्या पत्त्यांचा बंगला उभा करायचा प्रयत्न कधीच करीत नाहीत. कारण, तो बंगला आतून मजबूत नसल्याने केव्हाही कोसळू शकतो. पण, त्यांची महानता ही आंतरिक आहे. त्यांच्यातील एक निरामय माणूसच आपल्यासमोर देवासारखा उभा राहतो. म्हणूनच त्यांच्या महानतेचे हृदय तरंग आपोआप इतरांपर्यंत पोहोचतात व मनाला भिडतात.
 

-डॉ. शुभांगी पारकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/