संदिग्ध स्वभाववैशिष्ट्य
महा एमटीबी   02-Oct-2018

 


 
 
 
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातलं संदिग्ध व्यक्तिमत्त्व कोण, असा प्रश्न केला तरी राजकारणाची अगदी प्राथमिक माहिती असणारे सहजच त्यांचं नाव ओळखतील. आज एखादं सनसनाटी वक्तव्य करुन गलेच उद्या ‘यू टर्न’ कसा घ्यायचा, याची कलाच जणू अजाणतेपणी या ‘जाणत्या राजा’ला अवगत झालेली असावी. सोनिया गांधींच्यास इटालियन मुळांमुळे काँग्रेसमधील शरद पवार, तारिक अन्वर आणि पूर्णो संगमा या त्रिमूर्तीने काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १९९९ साली स्थापना केली. पण, त्यानंतरही राजकारणातील मुख्य प्रवाहात राहण्यासाठी राष्ट्रवादीला आपले ‘घड्याळ’ काँग्रेसच्याच ‘हाता’नुसार चालवाले लागले. राज्याच्या विधानसभेत २००४ मध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. ७१ जागा राष्ट्रवादीकडे तर ६९ जागा काँग्रेसकडे असतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देत वेगळाच डाव खेळला आणि तरीही सत्तेची सर्व सूत्र आपल्या हातीच ठेवली. पवारांच्या राजकारणाचे चटके आणि फटके आजवर अनेकांना बसले. त्यामुळे अनेकजण त्यांच्यापासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. त्यांच्या या संदिग्ध व्यक्तिमत्त्वाची उशिरा का होईना जाणीव झालेले तारिक अन्वरदेखील राष्ट्रवादीला सलाम करून निघून गेले. राफेलच्या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केली जावी, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित होऊ नये, असे वक्तव्य पवार यांनी केल्यानंतर सर्वांनीच आपली बोटे तोंडात घातली. काँग्रेसला हा धक्का असल्यामुळे त्यांच्या गोटातून प्रतिक्रिया येणं साहजिक होतं आणि तसं झालंही. याचवेळी पवारांच्याच हेतूबद्दल अन्वर यांनी शंका उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीच दिली. त्यांच्यामागोमाग त्यांचे समर्थक म्हणून परिचयाचे असलेले मुनाफ हकीम यांनीसुद्धा राष्ट्रावादीला अलविदा केला. दोघांच्याही जाण्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले, असे काही म्हणता येणार नाही. परंतु, पवारसाहेबांच्या कोलांटउड्यांमुळे पक्षांतर्गत नाराजीचे सूर उफाळून आले आणि अन्वरसारख्यांनी थेट बाहेरची वाट धरली. अन्वर यांच्या राजीनाम्यानंतर ‘पॉवरफुल’ कन्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काही उपयोग मात्र झाला नाही. आधी मोदींना राफेल प्रकरणी क्लीनचिट देणारे पवारसाहेब नंतर त्यांच्यावर संशयाच्या भोवऱ्यात ढकलूनही मोकळे झालेच. असो. हे काही नवीन नाहीच. निवडणुकांपर्यंत साहेबांच्या या संदिग्ध लीला निसंदिग्धपणे पाहायच्या एवढेच!
 

‘राजा’ची साथ द्या...

 

पवारांचे ‘राज’कारण हा कोणाच्याच पचनी पडलेला मुद्दा नाही. अगदी त्यांच्या सख्ख्या सोयऱ्यांच्याही. राफेलनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राजा’ला साथ देत सोबत घेण्याच्या त्यांच्या प्रस्तावाने सर्वांनाच गोंधळात टाकले. मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांच्या विरोधी धोरणानंतरही पवार साहेबांनी मनसेला दिलेला आघाडीचा कथित प्रस्ताव सेक्युलॅरिझमचा बुरखा घेतलेल्या काँग्रेसला बघवेल तरी कसा? मुंबई, पुणे, नाशिकचा काही भाग सोडला तर मनसेला जनाधार नाही. एकेकाळी त्यांच्याकडे असलेला जनाधार दुरावण्यासाठी ‘राजा’च जबाबदार. असो... काँग्रेसच्या ‘भारत बंद’ला मनसेच्या इंजिनाचा धक्का साहेबांना ‘पॉवरफूल’ वाटला असणार. म्हणूनच साहेबांनी काँग्रेसदरबारी राजाची शिफारस केलेली दिसतेगेली काही वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादीला आता सत्तेपासूनचा दुरावा सहन होत नसावा. त्यामुळेच जे होईल त्या पद्धतीने सत्तेच्या जवळ जाण्याचे त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. कोणतेही सरकार बनले तरी त्यात सहभागी होणे, ही राष्ट्रवादीची काळाची गरज बनली आहे. मनसेचीही अगदी तीच स्थिती. एकेकाळी मोदींचे गुणगान गाणारे राज ठाकरे आज त्यांचे कट्टर विरोधक बनले आहेत. मनसे जर महाआघाडीत आली तर शिवसेनेसाठी ती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये असलेली परिस्थिती आज नाही, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे शिवसेना असेल किंवा भाजप, मनसेला जवळ करणे हे त्यांच्यासाठी किमान राज्यात तरी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. परंतु, मनसेला काँग्रेस आघाडीत सामील करुन घेणार नाही, हेही तितकेच खरे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही मनसेला सोबत घेण्यास कडाडडून विरोध केला. याच निरुपमांनी शिवसेनेत असतानाही छटपूजा आयोजित करून उत्तर भारतीयांना शिवसेनेच्या मागे उभे करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, राज यांच्या विरोधामुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यातच युतीचे सरकार असताना प्रमोद महाजनांवर केलेल्या आरोपांमुळे त्यांना सेना सोडावी लागली होती. कालांतराने राजही शिवसेनेपासून वेगळे झाले. आता राष्ट्रवादी असेल किंवा मनसे, दोन्ही पक्ष एकाच नावेतून प्रवास करत आहेत. त्यातच राष्ट्रवादीला मनसेच्या साथीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तेव्हा, आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे कुणीकडे झुकतात, ते पाहणे औत्स्क्युाचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/