उजळावया आलो वाटा...
महा एमटीबी   02-Oct-2018
विवेक जागृत झाला की नश्वरता लक्षात येते. पांडुरंगाच्या भक्तीचा प्रकाश खुणावू लागला. भगवंताच्या भक्तीची गोडी लागली अन् सगळा भार पांडुरंगावर सोपवून ते मोकळे झाले. सामान्य माणूस नैराश्याच्या खोल दलदलीत फसतो. वाट्टेल तसा वागू लागतो. इथेच सामान्य माणूस आणि तुकाराम महाराज यांच्यामधील फरक जाणवतो.

 
संत तुकाराम महाराज अलौकिक सत्पुरुष होते. ते अलौकिक आपोआप झाले असतील का? प्रारंभी संसार, व्यापार करताना उपासमार, भूक, दुष्काळ अशा संकटांनी थैमान मांडलं. याचा भयावह परिणाम म्हणजे त्यांची पत्नी, मुलं डोळ्यांदेखत मृत्यूच्या करालदाढेखाली गेली. वाण्याचा धंदा साफ बुडाला. धंद्याचं दिवाळं निघालं. अन्नवस्त्राची मारामार झाली. समाजात पत उरली नाही. दारिद्र्याचे चटके बसले. सगळ्या बाजूंनी कोंडी झाली. प्रपंच, संसार फाटका आणि विटका असल्याचा प्रखर अनुभव आला. त्यातून वेदना, व्याकुळता यांना त्यांनी अभंगातून वाट मोकळी करून दिली. हळूहळू ते ईश्वरचरणांच्या ध्यासाने भक्तीच्या अभंगवाटेनं वाटचाल करू लागले. स्वप्नामध्ये नामदेवांनी शतकोटी अभंगरचनेची आज्ञा केली.
 

विती एवढेसे पोट । केवढा बोभाट तयाचा॥

जळो याची विटंबना । भूक जना नाचवी॥

 

असे अभंग परिस्थितीच्या चटक्यांमुळे मुखातून उमटले.
 

शरीर संपत्ती मृगजळ भान ।

जाईल नासोन खरे नव्हे ॥

 

नैसर्गिक आपत्तीमधून जीवलगांचे सोडून जाणे, यामुळे देहसंपत्ती खरी नसून ती केव्हाही नासून जाईल, हे सत्य तुकाराम महाराजांना उमजले. त्यांच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल झाला. नाशवंत देहापासून नाशवंत जगतापर्यंतचा अनुभव आला. त्यामधूनच विरक्ती, वैराग्याची झळाळी प्राप्त झाली. विवेक जागृत झाला की नश्वरता लक्षात येते. पांडुरंगाच्या भक्तीचा प्रकाश खुणावू लागला. भगवंताच्या भक्तीची गोडी लागली अन् सगळा भार पांडुरंगावर सोपवून ते मोकळे झाले. सामान्य माणूस नैराश्याच्या खोल दलदलीत फसतो. वाट्टेल तसा वागू लागतो. इथेच सामान्य माणूस आणि तुकाराम महाराज यांच्यामधील फरक जाणवतो. सामान्य माणूस मनानं खचतो. परंतु, तुकाराम महाराज अधिकाधिक पांडुरंगाच्या जवळ गेले. भक्तीमध्ये रमून गेले. इतकंच नाही तर ते सांगतात,
 

उजळावया आलों वाटा ।

खरा खोटा निवाड ॥

बोलाविलें बोलें बोल ।

धनी विठ्ठल सन्निध ॥

 

आपले जीवितकार्य कोणते आहे, ते त्यांनी अभंगांतून कथन केले. भक्तीच्या मार्गातील आडवाटा टाळून मुख्य मार्ग मोकळा व प्रकाशमान करण्यासाठी पांडुरंगानं आम्हाला पाठवलेलं आहे. खरा मार्ग आणि खोटेपणा याचा निर्णय श्रीविठ्ठलाच्या बळावर मी करणार आहे, असा ठाम विश्वास आणि पांडुरंगाच्या स्वामित्वाचा पक्केपणा यामधून जाणवतो. सामान्य माणसाला आपण या जगात कशासाठी आलो आहोत, हेच कळत नाही. संतांना याची जाणीव होते व ते आपला जन्म भगवंताची प्राप्ती करून लोकांच्या उद्धारासाठी झटतात. तुकाराम महाराज प्रारंभी संकटांनी पीडित झाले होते. त्यामधून पांडुरंगाच्या जवळ गेले. साधनेची, तपाची शक्ती, तेज जाणवू लागलं. ते पांडुरंगमय होऊन गेले. त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली. त्यामधून ज्ञानाची प्राप्ती झाली. मग त्यांना पुढील कार्याची जाणीव होऊन, प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा अभंगांतून प्रगट होत गेली.
 

धर्म रक्षावयासाठी ।

करणें आटी आम्हासी ॥

वाचा बोलो वेदनीती ।

करूं संती केलें ते ॥

 

धर्माचं रक्षण करणं, हे आमचं ब्रीद आहे. त्यासाठी आम्हाला परिश्रम करणे आवश्यक आहे. चारही वेदांमधील नीतितत्त्व लोकांना समजावून सांगणं हेच आमचं जीवितकार्य असल्याचं ते ठामपणानं कथन करतात. अधर्माचरण व खऱ्या धर्माला विरोध करणारा समाजघटक सर्वत्र नेहमीच दिसून येतो. त्यामुळेच धर्म, नीती आणि सदाचार यांचा आदेश संतांना वारंवार करावा लागतो. तुकारामांची आत्मानुभूती त्यांच्या अभंगांतून वेळोवेळी जाणवते. प्रचितीचे परखड बोल यामध्ये आहेत. त्यांना समस्त समाजमनाची स्वच्छता करण्यासाठी भगवंतानं पाठवल्याचं ते सांगतात. ते मूळचे कोणत्या स्थानी राहत होते, ते सहजपणानं सांगतात,
 

आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी।

बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥

 

आम्ही मूळचे वैकुंठवासी आहोत. वैकुंठात श्रीविष्णूच्या सहवासात आमचा निवास असतो. परंतु एका विशिष्ट उद्देशानं आम्ही पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे. फार पूर्वी ऋषिमुनींनी जो विचार सांगितला होता ना, तोच विचार खऱ्या स्वरूपात समाजाला सांगावा आणि त्याप्रमाणे वागण्याचं आवाहन करावं म्हणूनच आम्ही पृथ्वीवर जन्म घेतला आहे. समाजाला सुयोग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी भगवंताची भक्ती उत्कटपणानं कशी करावी, ते संत तुकाराम महाराज स्वआचरणातून सांगतात. कीर्तनामधून, अभंगामधून कळकळीनं-तळमळीनं कथन करतात. नरजन्म हा भगवंताला जाणून घेण्यासाठी असतो. त्याकरिता संकटात न घाबरता, निष्ठेनं नामस्मरण, उपासना, साधना करणं गरजेचं आहे. नीती, धर्म यानुसार अंर्तबाह्य शुद्ध होऊन भक्तीमध्ये रममाणं होणं आवश्यक आहे. तुकारामांच्या अभंगांमधून सामान्य माणसापासून ते संतत्वापर्यंतची वाटचाल, प्रगती सहजपणानं प्रतीत होते.त्यांच्या गाथेचा मनापासून अभ्यास करून त्यावर चिंतन-मनन केलं, तर प्रापंचिक माणूस परमार्थामध्ये अफाट प्रगती करू शकेल. अशक्य ते शक्य होऊन जाईल. निराशा, नैराश्याची काजळी चढणार नाही. प्रतिकूलता प्रगतीसाठी साहाय्यक असते, हे लक्षात येईल.

 

निराधारता संपुष्टात येऊन पांडुरंगाचा भक्कम आधार मिळेल. मनाची अस्थिरता संपून पांडुरंगाच्या चरणी स्थिरता प्राप्त होईल. तुकाराम महाराजांचे अभंग कधीही भंग पावण्याचा धोका नाही. त्याची अभंगता चिरकाल टिकणारी आहे. अभंगगाथेला बुडवून टाकण्याची कोणाची ताकद नाही. संपूर्ण जीवनपट उलगडून सांगणारी गाथा अक्षय अशी आहे. प्रारंभीच्या प्रपंचाचे, प्रसंगाचे धक्के बसलेले तुकाराम महाराज नंतर प्रपंच खोटा असल्याच्या मूळ सत्यापर्यंत जाऊन पोहोचले. भंडारा डोंगरावर केलेल्या तपामधून सुवर्णमय अभंगं बाहेर आले. वृक्षांना सगेसोयरे मानणारे तुकाराम पशू-पक्षी आणि अवघ्या निसर्गाशी समरस झाले. पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवून चैतन्यापर्यंत जाऊन पोहोचले. तुकारामांची टप्प्याटप्प्यानं होणारी पारमार्थिक प्रगती अभंगांमधून जाणवते. ते साधकापासून सिद्धापर्यंत, संतत्वापर्यंत कसे पोहोचले ते लक्षात येतं. म्हणून लक्षपूर्वक, एकाग्रतेनं गाथेचं चिंतन करणं गरजेच आहे. लौकिकाचा अंत झाला की, संत होता येतं हे तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं. आपल्याला प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते. परंतु, जी गोष्ट झटपट मिळते ती पटपट संपून जाते. हळूहळू कष्ट करून मिळविलेलं टिकून राहतं. साधनेचे कष्ट केल्याशिवाय खरा परामात्मा कधीच भेटत नाही. अंत:करणात भगवंत भरला की, ज्ञानाचा कधी अंत होत नाही. एक-एक पायरी चढून वर गेलं की पुढे भगवंत उचलून घेतो. त्याला वैराग्याची जोडी जवळ राहिली की अक्षयज्ञानानं जीवन उजळून उठत त्या जीवनप्रकाशामध्ये अनेकांना ‘आत्मभान’ येऊन ‘आत्मज्ञाना’ची परमप्राप्ती होते.
 

- कौमुदी गोडबोले

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/