उद्योग उभारणी करणारी नोकरदार
महा एमटीबी   19-Oct-2018
 
तुमच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष होण्यासाठी दिली जाणारी लाच म्हणजे तुमचा महिन्याचा पगार... या विधानाला छेद देत यशोशिखर गाठलेल्या उद्योजिका पूजा महाजन...
 
कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करावा, अशी महत्त्वाकांक्षा बाळगून अनेक नवउद्योजक व्यवसाय सुरू करतात. पण, यशाची चव प्रत्येकाला चाखायला मिळतेच असे नाही. दिल्लीतील एक नोकरदार महिला असलेल्या पूजा महाजन यांची कहाणी काहीशी वेगळीच... औद्योगिक क्षेत्रात गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. दिल्लीतील प्रथितयश कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. आज ‘युनिटास फूड्स’ या कंपनीच्या संचालकपदावर त्या कार्यरत असून ‘यम यम डमसम’च्या नावे विक्री केले जाणारे मोमोज देशभर प्रसिद्ध आहेत. महिन्याभरात १० ते १२ लाख मोमोजचे उत्पादन त्यांच्या फॅक्टरीत घेतले जाते. यातही शाकाहारी, मांसाहारी मोमोज, स्प्रिंग रोल, समोसा, इडली, बटाटावडा आदी खाद्यपदार्थ त्यांच्या ब्रॅण्डखाली विकले जातात. पूजा महाजन यांच्या कुटुंबात उद्योगाची पार्श्वभूमी नसताना देखील उद्योगक्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवून यशस्वी उद्योजिका म्हणून नावारुपाला आल्या.
 
 
 
आई-वडील दोघेही शिक्षक. कुटुंबात कुणाचाही उद्योगधंदा नाही आणि स्वत:ही एका खासगी कंपनीत नोकरी करणार्या पूजा महाजन यांचे नोकरी करून सारेकाही भागत होते. १९९८ पासून त्या या क्षेत्रात नोकरी करत होत्या. पण, स्वत:चा व्यवसाय असावा, असे त्यांचे कायमचे स्वप्न होते. सुरुवात कुठून करायची, हा प्रश्नच होता. शेवटी २००४ साली त्यांनी नोकरी सोडून गुरुग्राममध्ये एका मॉलमध्ये ‘बॉम्बे चौपाटी’ नावाचे एक रेस्टॉरंट सुरू केले. मात्र, व्यवसाय म्हटला की अडचणीही पाचवीला पूजलेल्याच. त्याप्रमाणे सुरुवातीला धंद्यात जम बसेना. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ‘रेस्टॉरंट ट्रॉली’ सुरू केली. मुंबईतील एक ‘सीड फ्रॅन्की’ नावाच्या ब्रॅण्डसह करार करून त्यांनी नवा व्यवसाय सुरू केला आणि हा धंदा जोमात चालू लागला. फ्रॅन्कीच्या व्यवसायात असताना त्यांना मोमोज विकण्याची कल्पना सुचली आणि याच ट्रॅालीवर मोमोजची विक्री सुरू केली. मात्र, मोमोजची मागणी लक्षात घेता त्यांना पुरवठादारच सापडेना. बाजारात मोमोज विकणारे किंवा मोमोज बनविण्यासाठी विशिष्ट असे उत्पादकच नाहीत, असे त्यांच्या लक्षात आले. या क्षेत्रात संघटित असे उद्योजकच नाहीत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय करत होते. २००८ मध्ये दिल्लीत घिटोरनी या ठिकाणी मोमोज बनवण्याची फॅक्टरी उभी केली आणि सुरू झाला महाजन यांचा एक नवा प्रवास...
 
 
उद्योगात उतरण्याचा निर्णय तर झाला. फॅक्टरीही सुरू झाली. मात्र, व्यवसायाचा कुठलाही अनुभव गाठीशी नसल्याने आणि मार्गदर्शक नसल्याने अडचणीही आल्याच. सुरुवातीला काही चुका झाल्या आणि त्यातून व्यवसायात नुकसानही होऊ लागले. सलग दोन ते तीन वर्षे परिस्थिती कायम होती. म्हणावी तशी सुरुवात अजूनही झाली नव्हती. फॅक्टरीमध्ये त्यावेळेस हाताने मोमोज बनवले जात. त्यामुळे मागणी असूनही उत्पादन कमी असे. त्यावेळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणून सरकारी योजनेतून त्यांनी कर्ज घेतले. अन्य ठिकाणांहूनही पैसे उभे करून एक कोटींचे भांडवल उभे केले. त्यानंतर तैवानहून मोमोज बनवण्याची मशीनरी आयात करण्यात आली. मोमोज साठविण्यासाठी लागणारे शीतगृह उभारण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मोमोजचे उत्पादन वाढले. विक्रीही वाढली. आज त्यांच्या प्लांटमध्ये हजारो मोमोज दिवसाला बनवले जातात आणि देशभरातील विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. देशभरातील सिनेमागृह, मल्टीप्लेक्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये मोमोज पाठवले जातात. सर्व माल फ्रिजरमधून पाठवला जातो. कंपनी केवळ २० ते २५ मोठ्या गुंतवणूकदारांशीच व्यवहार करते. छोट्या आणि किरकोळ वितरकांना अद्याप थेट माल पाठवला जात नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांनी हा पर्याय निवडला आहे. ‘युनिटास फूड्स’ कंपनीचा प्रत्येक वितरक तीन ते चार लाख मोमोज खरेदी करतो. ही मागणी सर्वसाधारण दिवसातील आहे. सुटीच्या दिवसात यात वाढ होते. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय विस्तार करण्यामागचे कारण म्हणजे, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, चव आणि मोमोज ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत घेतली जाणारी काळजी. “भारतात अजूनही घरात मोमोज बनवण्याची पद्धत अद्याप सुरू झालेली नाही. लोकांमध्ये स्ट्रीट फूड खाण्याची ओढ गेली कित्येक वर्षे कायम आहे. त्यातूनही ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आम्हाला कायम ऊर्जा देतो,” असे महाजन सांगतात.
 
- तेजस परब 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/