गरज सज्जनशक्तीच्या सीमोल्लंघनाची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |

सीमोल्लंघन! ते गरजेचं आहेच. पण त्यातही भेद आहेच. सीमोल्लंघन, प्रभू श्री रामचंद्रांनी केलं की इतिहास निर्माण होतो अन् तसा प्रयत्न रावणाने केला की मात्र मर्यादाभंग होतो. इतिहासाला काळी किनार लागते. हा खरं तर विजयाचा दिवस. अष्टभूजा देवीने महिषासूराचा पराभव करून मिळवलेल्या विजयाचा. रामाने रावणाला परास्त करून मिळवलेल्या विजयश्रीचा. शमीच्या झाडावर ठेवलेली आपली सारी शस्त्रे अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी काढून पुन्हा ताब्यात घेण्याचा...खरं तर रावणाने स्वत:च्या मर्यादांचे भान राखले असते तर प्रभू रामचंद्रांना त्याविरुद्ध उभे ठाकण्यासाठी वेगळ्याने सीमोल्लंघन करण्याची गरज पडली नसती अन् महिषासूराला त्याचे अवधान राहिले असते तर परमेश्वराला तरी कुठे गरज होती अष्टभूजेचे रूप धारण करून त्याचे अस्तित्व संपविण्याची? पण पृथ्वीतलावर, कारण नसताना मर्यादा ओलांडणार्या दुर्जनांचा प्रकोप वाढला की सज्जनशक्तीलाही नाईलाजाने सीमोल्लंघन करण्याचा मार्ग स्वीकारावाच लागतो. कारण सृजनाचा आविष्कार शेवटी त्यातूनच घडत असतो. हे खरं आहे की सज्जनशक्ती सहजासहजी त्या मार्गाने जात नाही. तिच्या सहनशीलतेची सीमा बहुतांशी प्रदीर्घच असते. त्यामुळेच की काय पण, ती शक्यतोवर सहन करीत राहते. अन्याय असला तरीही. अगदी शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंत...त्यानंतर कडेलोट होतो. शिशुपालाचा भेद करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. मुळात, तो पर्याय खुद्द शिशुपालानेच बाकी ठेवलेला नसतो. या स्थितीत त्याला झालेल्या शासनाची दूषणे इतर कुणाला कशी देता येतील? दुर्दैवाने शिशुपालाचीच पिलावळं आजघडीला सर्वदूर वावरताना दिसताहेत.
 
महिषासूर अन् रावणाचा वारसा चालवण्याच्या इराद्यानं झपाटलेली माणसंही कमी नाहीत इथे. राजकारणापासून तर शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत अन् उद्योगजगतापासून तर सामाजिक क्षेत्रापर्यंत, सर्वदूर चलती आहे त्यांचीच. त्यांच्याविरुद्ध ज्यांनी उभे ठाकणे, सीमोल्लंघन करणे अपेक्षित आहेत, ती मंडळी मात्र त्यांच्या अपराधांचे शतक पूर्ण होण्याची वाट बघत बसलेली असते बहुतेक वेळा. बहुधा म्हणूनच, कोवळ्या वयात बालिकांवर बलात्कार करणार्या नराधमांची, सरकारी कार्यालयात सामान्य माणसांची फसगत करणार्या मुजोर अधिकार्यांची, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून बसलेल्या कावेबाजांची, लोकांच्या जीवावर चैन करणार्या राजकारण्यांची, सत्तेचा माज आलेल्यांची, पदाचा दुरुपयोग करणार्या भ्रष्टाचार्यांची, बळाचा गैरवापर करणार्यांची, पैशाच्या जोरावर न्यायव्यवस्थाही विकत घेण्याची भाषा बिनदिक्कतपणे बोलणार्यांची, शेपूट हलवत त्यांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहणार्यांची, दहशत निर्माण करत हवे ते मिळवण्याचा प्रयत्न करणार्या गुंडांची संख्या वाढते आहे.
 
डाव पाहून संधी साधणार्यांची संख्याही बळावतेय् आताशा. हा सारा तमाशा बघूनही जनता शांत असल्याचे भासत असले तरी प्रत्यक्षात ती शिशुपालाच्या अपराधांनी शंभरी गाठण्याची वाट बघतेय् एवढेच. एरवीही, ज्याची त्याची, ज्याला त्याला शिक्षा होणार हे अंतिम तर सत्य आहेच. तशी परिस्थिती उद्भवली तर हीच सज्जन शक्ती त्यावेळी रुद्रावतार धारण करेल, हेही तितकेच खरे आहे. या सज्जनशक्तीला सीमोल्लंघन करायला भाग पाडायचे की नाही, हे अपराध करणार्यांनी ठरवायचे आहे. ही शक्ती जागृत झाली की मग ती कुणालाच जुमानत नाही. तिने एकदा का व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले की मग परिस्थिती कुणाच्याच आटोक्यात राहात नाही. जनता, मग ती सीरियातली असो का भारतातली, ती इरेला पेटली तर काय चमत्कार घडू शकतो, याचे प्रत्यंतर सार्या जगाला आले आहे आजवर. कित्येकदा! भारताच्या संदर्भात बोलायचे तर, गेल्या सुमारे साडेबाराशे वर्षांच्या इतिहासात या देशाने अनुभवलेली गुलामगिरी, परकियांची आक्रमणं, दरवेळी उलथवून लावण्यात आलेल्या परकियांच्या राजवटी, पुन्हा नवी आक्रमणं, पुन्हा नवी लढाई... प्रत्येकवेळी दुर्जनांनी सीमा ओलांडण्याची वाट बघणारी सज्जनशक्ती. हो! इथे रावणाकडून प्रमाद घडायला लक्ष्मणरेषा दरवेळी सीतेनेच ओलांडावी असे कुठे आहे? दुर्जनशक्ती विरुद्ध दंड थोपटण्यासाठी, सृजनात्मक आविष्कार घडविण्यासाठी कित्येकदा सज्जनशक्तीलाही सीमोल्लंघन करावे लागते. समविचारी लोकांना एकत्र आणावे लागते.
 
शत्रूविरुद्ध लढण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे लागते. युद्धाचा बिगूल वाजवावा लागतो, विजयाचा शंखनाद करावा लागतो. भगवान श्रीकृष्णाने तरी यापेक्षा वेगळे काय कले होते? ऐन रणांगणात युद्धास नकार देणार्या अर्जुनाला भगवंतांनी गीतेतून केलेला हितोपदेश त्याच सीमोल्लंघनासाठी होता. स्वत:वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा मुद्दा असो की मग दिल्लीतील एखाद्या बलात्कार प्रकरणी हजारो नागरिकांनी राजपथावर ठाण मांडून, सामूहिक मौनातूनही चीड व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न, सलमान खानसारख्या एका धनाढ्य बेमुर्वतखोराला काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा व्हावी म्हणून त्या गावातल्या आदिवासी तरुणांनी सारी आमिषं, धमक्या झुगारून कोर्टात साक्ष देण्याची बाब असो, की मग कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याप्रकरणात जनमानसात व्यक्त होऊ लागलेला संताप...कालौघात युद्धाचे स्वरूप बदलत गेले असेल कदाचित, कदाचित युद्धात वापरावयाच्या शस्त्रांची परिभाषाही बदलली आहे एव्हाना, पण समाजातला सामान्यातला सामान्य माणूसही एल्गार करू बघतोय्, सीमोल्लंघनासाठी धडपडतोय्, याचीच ती साक्ष. यातली सकारात्मक बाब ही की, यातूनच उद्याचा उष:काल घडणार आहे. अंधाराच्या पखाली वाहणार्या सूर्यापेक्षा, मतदानाच्या पलीकडेही नागरिकांची कर्तव्ये असल्याचा विसर पडलेल्या नागरिकांपेक्षा, लाळघोटेपणा करण्यातच दंग राहिलेल्यांपेक्षा, सर्वच नकारात्मक, चुकीच्या गोष्टींविरुद्ध परिवर्तनाचा बिगूल फुंकणार्या बहादरांची गरज अधिक जाणवते आहे आज. त्याकरिता समाज एकसंध बांधण्यासाठीची साधना करावी लागेल. समाजजागृती करावी लागेल. राजकारण्यांनी करून ठेवलेला खेळखंडोबा आणि एकूणच माणसाचा घसरत चाललेला सामाजिक स्तर... याविरुद्धही शंखनाद करावाच लागेल तमाम सज्जनशक्तीला. पद्धत कोणती, शस्त्र कोणते ही बाब वेगळी. पण आजचा दिवस त्या युद्धासाठीच्या संकल्पाचा आहे. सीमोल्लंघनाचा आहे, हे मात्र खरे!
@@AUTHORINFO_V1@@