बातम्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी : विनोद तावडेएनयुजे महाराष्ट्रच्या कार्यकारिणीचे तावडॆंच्या हस्ते उद्घाटन, तर करंबेळकरांच्या हस्ते समारोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |
 
 

बातम्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी : विनोद तावडे
एनयुजे महाराष्ट्रच्या कार्यकारिणीचे तावडॆंच्या हस्ते उद्घाटन, तर करंबेळकरांच्या हस्ते समारोप

 
मुंबई , १७ ऑक्टोबर 
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना तावडे पुढे म्हणाले की, पत्रकारांनी समाजाच्या आणि नेत्यांच्या चुका दाखविल्याच पाहिजेत. मात्र समाजात केवळ नकारात्मक गोष्टीच घडत नसतात, तर समाजात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात त्या पुढे आणल्या पाहिजेत. लोकमान्य टिळकांनी जी पत्रकारिता केली त्यातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली ,पत्रकार हा कुठल्या ना कुठल्या विचारसरणीला बांधील असतोच, तसा तो हवाच; असे संगून तावडे पुढे म्हणाले की परंतु त्याच्या बातमीदारीत विचारसरणी दिसता कामा नये, बातमी ही जशी घडली तशीच निष्पक्ष दिली पाहिजे. तसेच दुसरा केवळ वेगळ्या विचारसरणीचा आहे म्हणून त्याचा द्वेष करता कामा नये, . आजकाल खरी शोध पत्रकारिता कमी झाली आहे, अशी खंतही तावडॆंनी यावेळी व्यक्त केली. आज पत्रकारांसमोर तंत्रज्ञानामुळे मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत, त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्र आत्मसात केले पाहिजे आजची पत्रकारिता समाजमाध्यमांमधून चालवली जात आहे (सोशल मिडिया ड्रिव्हन आहे) असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.
यावेळी झालेल्या चर्चेत एनयुजेच्या विविध जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा तावडे यांनी ग्रामीण पत्रकारांच्या कौशल्य विकासासाठी केल्या जाऊ शकणाऱ्या उपायांची चर्चा केली आणि सरकार त्यासाठी एनयुजेसोबत काम करेल असे सांगितले. ग्रामीण पत्रकारांना विधिमंडळचे कामकाज माहित व्हावे प्रत्यक्ष बघता यावे म्हणून विशेष प्रयत्न करू असे ते म्हणाले. तसेच ग्रामीण पत्रकारांना राज्य परिवहनची सवलत तसेच इतर विषयांवर शासन म्हणून प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
आजच्या काळातील पत्रकारितेचा अजेंडा एनयुजे ने नव्याने मांडावा  - करंबेळकर
परंपरागत डाव्या विचारसरणीवर चालणारी पत्रकारिता आज मागे पडल्याने किंबहुना ती समाजाने नाकारल्याने पत्रकारितेत एक पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळे आजच्या काळानुरुप पत्रकारितेचा नवा निष्पक्ष अजेंडा तयार करण्याची गरज असून ते काम एनयुजे ने करावे अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आणि दै.तरुण भारतचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी व्यक्त केली. एनयुजे महाराष्ट्र च्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करतेवेळी ते बोलत होते.
 
आजच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानामुळे तसेच निर्माण झालेल्या वैचारिक पोकळीमुळे पत्रकारितेसमोर गंभीर प्रश्न उभे आहेत असे सांगून करंबेळकर म्हणाले की जगभरात आज पत्रकारितेच्या क्षेत्रात आत्मपरीक्षण सुरू आहे. जगभरातील जनमानस आज दुसऱ्या टोकाला गेल्याने परंपरागत डाव्या अजेंड्यावर चालणारी पत्रकारिता आज संदर्भहीन होत आहे, असे ते म्हणाले. एनयुजे ने एक युनियन म्हणून काम करताना पत्रकारितेचा नवा पाया घालण्याची गरज आहे .समाजातील अस्थिरतेच्या वातावरणात स्थीरता आणण्याचे काम पत्रकारांना करावे लागेल, त्यासाठी नवी कार्यक्रमपत्रिका घेऊन पत्रकारिता उभी राहिली पाहिजे, एनयुजेच्या भूमिका विषद करणाऱ्या पत्रात आद्य पत्रकार म्हणून महर्षी नारदांचा उल्लेख आहे, त्यावर करंबेळकरांनी नारद हे उत्कृष्ट पत्रकार का होते हे महाभारतातील श्रीकृष्णाच्या शब्दातून सांगितले. ते म्हणाले की समोरच्याचा खरा आत्मीय हितचिंतक, समोरचा काय म्हणतोय हे सखोल कळणारा खरा अभ्यासक, जे काही संभाषण समोरच्याबरोबर होईल ते पूर्ण गुप्त राखण्याइतके स्वत:च्या मनावर नियंत्रण हे तीन गुण श्रीकृष्णाने नारदाचे सांगितले आहेत आणि याच तीन गुणांच्या आधाराने आजही पत्रकार सर्वोत्कृष्ट बनू शकतो.
  
पत्रकार आणि प्रसार माध्यमांनी डाव्या आणि उजव्या संकल्पनेत न अडकता स्वतंत्र परिपक्व भारतीय पत्रकारिता करावी असे आवाहन एनयुजे महाराष्ट्रने एका विशेष ठरावाद्वारे पत्रकारिता क्षेत्राला केले आहे.एनयुजे महाराष्ट्रच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीच्या या बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्यांवर तसेच ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा झाली. बैठकीचे अध्यक्षपद अध्यक्ष डॉ.उदय जोशी यांनी भूषवले तर नवनिर्वाचित महासचिव राजेश प्रभु साळगांवकर यांनी विविध प्रस्ताव मांडले.    बैठकीचे प्रस्ताविक कोल्हापुर जिल्हा सरचिटणीस संदीप आडनाईक यांनी केले तर आभारप्रदर्शन सोलापूर जिल्हा सरचिटणीस गोपाळ वाघमारे यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@