मातृभूमीची ओढ अनावर...
महा एमटीबी   17-Oct-2018
 

 

आपली भूमी आणि आपली माती याची अनावर ओढ लागली की त्या भूमीला, मातीला स्पर्श करावासा वाटतो. तिथे जाण्यासाठी मन आसुसतं. असं काय असतं त्या भूमीमध्ये? म्हटलं तर सर्वत्र असणारीमाती सारखीच नाही का? परंतु आपल्या मातीला जो आपुलकीचा गंध असतो ना तो इतरत्र कसा काय जाणवणार?
 

अवघ्या वसुंधरेवर जिथे जमीन आहे तिथे माती असते. कुठे काळीशार, लालचुटूक, तर कुठे पिवळसर माती दिसते. कुठे सुपिकता अधिक, तर कुठे सकसपणा कमी. मातीच्या प्रतवारीवर कधी माया अवलंबून असते का? माया, ममत्व आपलेपणातदडलेलं असतं. एखादी भूमी ओसाड, डोंगराळ, नापीक असली तरी तिच्याविषयी ओढ वाटते. तिच्या उपयुक्ततेवर भावना कमी-अधिक होत नाहीत. प्रत्येक गोष्टी या फायदा-तोट्याच्या तराजूत मोजल्या जात नाहीत. अस मोजायला तो व्यापार आहे का? बरं मनाला सांगावंदेखील लागत नाही की तुला जन्मभूमी, मातृभूमी याची ओढ वाटावला हवी. ती सहज सुंदर भावना आहे. त्या भावनेचा झरा अंतस्थ हृदयात अखंड रुणझुणत असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीव मातृभूमीच्या भेटीसाठी व्याकूळ झाला. त्यांचं मन पाण्याबाहेर काढलेल्या माश्यासारखं तळमळू लागलं. विरह असह्य झाला. त्यांचा मुखातून विरहगीत बाहेर पडले,

ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळला... सागरा...

त्या अनावर ओढीतून त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. फार मोठ धाडस केलं. त्यांनी समुद्रात धाडकन उडी मारली. प्रचंड महाकाय लाटा, अथांग पसरलेला सागर! त्या लाटांशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्या मनात होती. इतर कशाचाही विचार, भीती त्यांच्या मनाला स्पर्श करू शकली नाही. भयाचा मागामूसही नव्हता. सर्वत्र भयावह वातावरण असूनही ते निर्भय होते. कारण, मनाचा निर्धार पक्का होता. वाटेल त्या संकटांशी सामना करावा लागला तरी, मातृभूमीला परतायचं. ही ओढ सगळ्यात महत्त्वाची. ती सगळ्यांशी झुंजण्यास बळ देते. ‘झुंजता झुंजता मरेन... महनमंगल मातृभूमीसाठी, आनंदानं मृत्यूला कवटाळेन’ इतकी अढळ निष्ठा! इतकं उत्कट प्रेम! या उत्कट प्रेमातून, मायेतून निर्माण होणार्‍या मंगलमय, नि:स्वार्थ प्रेमाची सारी किमया. ज्यामध्ये स्वार्थाची भेसळ असते ना तिथे हिणकसपणा आलाच. स्वार्थरहितता असते तिथे शुद्धता असते. जितकी शुद्धता अधिक तितका भाव शुद्ध! शुद्धता कशी हवी, तर स्फटिकासमान! हा शुद्धतम् भाव महत्त्वाचा! हल्लीच्या प्रदूषणयुक्त वातावरणात शुद्धता सापडणं कठीण! प्राणवायूमध्ये इतर प्रदूषित पदार्थांचा भरणा, भेसळ जास्त असते. त्यामुळे शुद्ध हवा मिळणं अवघड झालं आहे. हवा प्रदूषणयुक्त त्यामुळे श्वासागणिक प्रदूषण शरीरात शिरतं. पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय जगणं शक्य नाही. एकवेळ अन्नावाचून राहता येईल; परंतु पाण्याविना राहणं कसं शक्य आहे? अन्नात भेसळ... पाण्यात भेसळ... एवढंच नाही तर हवेत भेसळ. भेसळीचा, अशुद्धतेने युक्त असा अवघड काळ आला आहे. फायदा-नफ्यामागे धावणारे, दुसर्‍यांच्या आरोग्याचा-जीवाचा विचार न करणारे. अशा प्रदुषणयुक्ततांनी भरलेल्या भेसळयुक्त, अशुद्ध जगतामध्ये कुठेतरी शुद्धतम् भाव गवसतो आहे हे सुखद आश्चर्यच! हे सुखद, आनंददायी आश्चर्य आजच्या काळात अनुभवणे हा भाग्यकारक योग! मनाचा भाव शुद्ध राहणं हे त्या व्यक्तीच्या संस्कारांवर, सुसंगतीवर अवलंबून असतं. सुसंस्कारांनी मातृभक्ती रुजते, फुलते, फळते...

 

मातृभूमीवरील भक्ती दृढ होत जाते. कारण, भक्तिभाव आला की श्रद्धा येते. श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती हातात हात घालून सुखनैव नांदतात. मग आपल्या भूमीपासून कितीही दूर गेले तरी भूमीला, मातीला विसरण्याची शक्यताच नाही. वाहणारा वारा आपल्याच भूमीवरून वाहत आला आहे ही आल्हाददायक भावना सुखाविणारी असते. दाहक तप्ततेमध्येही शीतलता देणारा हा मातृभूमीवरचा, मातीवरचा वारा! हा शीतल वारा मनाला थंडावा देऊन जातो. आपल्या भूमीकडे पावलं आपोआप वळतात.व्यवहार्य जगतामध्ये प्रेमाची शिंपण करणारी पवित्र भूमी. तिच्यावर पडणार्‍या प्रत्येक थेंबातून येणारा मृद्गंध मनमोराचा पिसाराफुलवतो. रूक्ष जीवनात ओलावा निर्माण करतो. आनंदानं मन नृत्य करू लागतं. सभोवताली प्रतिकूल परिस्थिती असली तरी, अंतरात मात्र आनंदाचा अविरत वर्षाव चालू राहतो. मातेच्या छायेत आलं की कसं निर्धास्त निश्चिंत वाटतं. तसंच मातृभूमीच्या छायेत वाटतं. ‘मातृभावामध्ये’ समानता, सारखेपणा,साधर्म्य यांचा त्रिवेणी संगम झालेलाअसतो. त्यामध्ये सचैल स्नान केलं की मलीनता नाहीशी होते. नवचैतन्य, संजीवनी अवघ्या जगण्याला बळ देणारी. मातृभाव, मृदूता, मना-मनात झिरपत नेणारी. याच मातीनं ओल्या मनाला सुरेख आकार दिलेला असतो. इथल्या मातीनं बालपणात अंगा-खांद्यावर खेळवून बालपणाचा निरागस आनंद दिलेला असतो. मातीतून परिस्थितीशी झुंजण्याचं बळ प्राप्त झालेलं असतं. तारुण्यातही समतोल विचारांचा साज, विरश्रीचा गाज मातीतून काना-मनात गुंजत राहिला. अनेक सवंगडी.. खरे स्नेही.. जीवाभावाच्या सख्या दिलेल्या! या मातीशी बेईमान होणं स्वप्नातही शक्य नाही. इथेच जिजामाता, शिवाजीराजे घडले. मातृत्व, दातृत्व, नेतृत्व या मातीतून जन्माला आलं. इतकी पवित्र माती ही मस्तकी भस्माप्रमाणे, बुक्याप्रमाणे लावावी अशी! कडेकपारीतून हिंदवी स्वराज्याचा नाद घुमला. भूमाता वंदनीय पूजनीय. याच भूमीवर रामदास स्वामी, विष्णूदास महाराज, ज्ञानोबा, तुकोबा अशी संतांची मांदियाळी आवतीर्ण झाली. संतांची भूमी! पावन भूमी! कीर्तनांचा गजर इथेच दुमदूमला. दिगंबराचा दत्तघोष... विठ्ठलाचा गजर कानी आला. अशा या ज्ञान, भक्ती, तेज, वीरता, वैराग्य यानं परिपूर्ण, पावन भूमीचं विस्मरण कदापि शक्य नाही. उलट या मातीचं, भूमीचं ऋण आपल्यावर आहे. कृतज्ञ भावाने मन काठोकाठ भरून येतं आणि नकळत मस्तक धरणीमातेच्या चरणी विनम्र होतं.

 
- कौमुदी गोडबोले  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/