प्रा. अष्टेकरांना आईनस्टाईन पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
वॉशिंग्टन : भारतीय वंशांचे अमेरिकेतील शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित असा आईनस्टाईन पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून ही घोषणा करण्यात आली. प्रा. अष्टेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रथमच एका मराठी माणसाला हा आईनस्टाईन पुरस्कार दिला जात असल्याने अवघ्या महाराष्ट्रातील जनसामान्यांना त्यांचा अभिमान वाटत असून त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

प्रा. अभय अष्टेकर हे गेल्या ४० वर्षांपासून गुरुत्वाकर्षण विज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून प्रा. अष्टेकर यांना १० हजार डॉलर्सची रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाणार आहे. १९९९ पासून महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. प्रा. अष्टेकर हे पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅवेहिटेशन अँड द कॉसमॉसचे निर्देशक आहेत. विज्ञानातील भौतिकशास्त्रातील ब्लॅक होलचा सिद्धांत, सामान्य सापेक्षता आणि क्वांटम फिजिक्समधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

 

प्रा. अभय अष्टेकर हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. पुढे त्यांनी टेक्सास विद्यापीठातून गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी संपादन केली. त्यानंतर शिकागो विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले. आजवर अनेक नामांकित विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. फ्रान्स, कॅनडा आणि भारतातील महत्वाच्या पदावरही त्यांनी काम केले आहे.

 

शाळेत असताना मी न्यूटनचा सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षणाची माहिती घेतली. ज्या बलामुळे कोणतेही साहित्य पृथ्वीवर येते त्याच बलामुळे पृथ्वी ही सुर्याची परिक्रमा करत आहे. असे प्रा. अष्टेकर यांनी म्हटले. तसेच येत्या अनेक दशकांपर्यंत भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रातील शोधांवर गुरुत्वाकर्षण या विषयाचे प्रभुत्व राहील. भौतिक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ हे चांगले काम करत आहेत. भौतिक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ हे चीनच्या तुलेनेत पुढे आहेत. असे मत प्रा. अष्टेकर यांनी मांडले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@