सल्ल्यांची गरज नाही!
महा एमटीबी   15-Oct-2018

 

आपल्याला आपल्या आयुष्यात सध्या सगळ्याच गोष्टी महाग वाटू लागल्या आहेत. पण या प्रचंड महागाईत एक गोष्ट आपल्याला फुकटात मिळत असते ती म्हणजेसल्ला.’ इतर लोकांनाच नाही, तर आपल्याला स्वत:लासुद्धा कुणी आपणहून विचारले नाही तरी, कुणाला गरज वाटली नाही तरी, वा कुणाला त्यात रस नसला तरी फुकटचा सल्ला द्यायला आवडतो. खरं तरफुकटचा सल्लादेण्याची आपल्याला एवढी स्फूर्ती का येते? सहज सोप्या शब्दात सांगायचे म्हटले, तर आपलीविद्वत्ता आपले विचार प्रकट करून आपली एक विशिष्ट प्रकारची महती सिद्ध करायची संधी आपल्याला त्या क्षणी मिळालेली असते. विशिष्ट प्रकारची महती अशासाठी की, आपल्याला त्या विषयाचे ज्ञान असतेच असे नाही पण, तरीही आपण त्या विषयावर सल्ले देत असतो. आपल्याला त्या विषयाचे योग्य ज्ञान आहे का नाही, याचा विचार करता अगदी हक्काने आपण फुकटचे सल्ले देत असतो.

कधी कधी सल्ले द्यायचा पण, आपण अतिरेक करतो. जसे की त्या विषयातील निष्णात व्यक्तीसमोरही आपण आपल्याला त्या विषयाचे ज्ञान नसताना सल्ल्याचे तारे तोडतो. बर्‍याचवेळा आपण डॉक्टरच्या समोर बसूनही वैद्यकीय विषयांवर अनेक सल्ले देतो. बिचारे डॉक्टर्स, त्यांनाही काही सुचत नाही की, आता या अशा थातुरमातूर सल्ल्यांचे आपण करायचे तरी, काय काय? उदा. कुठल्याही शारीरिक आजारावर पूर्ण लंघन करायचे हा सल्ला. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा सल्ला खरे तर घातक ठरू शकतो. पण सल्लागार व्यक्तीला मात्रगंभीरपणेवाटते की, आपल्याबाबतीत जे फायद्याचे ठरले ते इतरांसाठीसुद्धा फायद्याचे ठरू शकते किंवा काहीजणांना असेही वाटते की, आपली वैचारिक पातळी किंवा भूमिका ही इतरांच्या तुलनेत अधिक योग्य असते म्हणून आपली मते इतरांपेक्षा खास असू शकतात.

बर्‍याच सल्लागारांना स्वत:बद्दल एक प्रकारचा अहंभाव असतो. स्वत:च्या क्षमतेबद्दल अहंकर असतो. या लोकांना असा विश्वास वाटतो की, त्यांच्या उपदेशाशिवाय या जगाचे अजिबात भले होणार नाही. किंबहुना इतरांचे पानही हलणार नाही. बरे असेही नाही की या फुकटच्या उपदेशाचे डोस पाजणार्‍या लोकांना इतरांची काळजी वाटत असते किंवा इतरांचे भले करायचा त्यांचा उद्देश असतो. त्यांना उपदेशाचे डोस पाजताना एक प्रकारे आपण इतरांना आपल्या मुठीत ठेवतो, याचा आनंद वाटत असतो. एक प्रकारचा दरारा आपण लोकांमध्ये निर्माण करतो आहोत, याचे विकृत समाधानही त्यांना मिळत असते. आपण या फुकट्या सल्लागारांच्या सल्ला देण्याच्या सवयीकडे पाहिले, तर त्यांना आपले विचार दुसर्‍यांवर लादण्याची गरज वाटताना दिसते. खरे तर ते जितके वरवर खात्रीपूर्वक वागत असल्याचे दिसत असले तरी, त्यांच्यात ती खात्री वा आत्मविश्वासदिसत नाही. त्यांना दुसर्‍यांच्या विचारांची किंवा भावनांची जाणीव तर नसतेच पण, त्यांना स्वत:च्या भावनांचीही जाणीव नसते. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यांचेफुकटचे सल्ले लोकांना आता नकोसे झालेले असतात. या मंडळींना खरी तर आपल्या स्वत:च्या अस्मितेचीसुद्धा जाणीव नसते. कदाचित काही सल्लागार लोकांमध्ये समस्या सोडवण्याकडे कल वा कला असू शकते. त्याचा उपयोग त्यांना स्वत:च्या आयुष्यात होतही असतो पण, दुसर्‍यांच्या आयुष्यात नाक खुपसायची सवय इतर लोकांना बहुधा आवडत नाही. कारण, ही सल्लागार मंडळी असे सल्लेहिटलरशाही स्टाईलमध्ये देतात. त्यात हुकूम असतो, फर्मान असते.

साहजिकच अनेक स्वाभिमानी मंडळींना असे फर्मान रूचत नाही. अनाहूत सल्ले हे बर्‍याच माणसांच्या स्वायत्तेला आव्हान देेतात. कधीकधी क्वचितच, हितकारक सल्ला देण्याचे फायदेशीर काम करणारी सल्लागार व्यक्ती अस्सल प्रामाणिकही असू शकते. पण बर्‍याचवेळा आपल्या वैयक्तिक जीवनात सतत सल्ले देणार्‍या व्यक्तीबद्दल थोडासा विचार करायची गरज आहे. कारण, या व्यक्ती कदाचित अंतर्मनातून असुरक्षित असतात. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांना सतत दुसर्‍याशी तुलना करायची खुमखुमी वाटत असते. सतत तुमच्याबरोबर शाश्वत अहमहमिका करण्यात त्यांच्यातील असुरक्षित मनाला सुरक्षित वाटत असते. एक प्रकारे त्यांना तो आपला विजय वाटत असतो. अधिकारवाणीने दुसर्‍या व्यक्तीवर मात मिळवायचा तो अथक प्रयत्न असतो. सल्ले योग्य असतील, तर ते दुसर्‍या व्यक्तीने जरूर स्वीकारावेत. जेव्हा वैयक्तिक नात्यांमध्ये दोन व्यक्तींत अशाप्रकारची अधिकाराची रस्सीखेच दिसते तेव्हा तिथे सावधपणा महत्त्वाचा ठरतो. अशा व्यक्तींशी डोके शांत ठेवून व्यवहार केला, तर ते आपल्या केव्हाही फायद्याचे ठरेल.

- डॉ. शुभांगी पारकर