शेअर बाजाराला आशा दिवाळीची
महा एमटीबी   14-Oct-2018

 


 
 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचा सतत नव्याने गाठला जाणारा तळ यामुळे गेल्या काही महिन्यांत शेअर बाजाराच्या निर्देशांकांची लोळण आणि गुंतवणूकदारांच्या बुडणाऱ्या पैशांना सणासुदीच्या दिवसातील खरेदीचा फायदा ठरेल, अशी आशा तूर्त तरी दिसते आहे. गेल्या आठवड्याभरात झालेली नफेखोरी आणि रुपयाच्या अवमूल्यनाची धास्ती यामुळे बाजार गुरुवारी सुमारे एक हजार अंकांनी कोसळला मात्र, दुसऱ्या दिवशी आठवड्याच्या अखेरीस ७३२.४३ अंशांनी झालेली वाढ ही गेल्या १९ महिन्यांतील सर्वाधिक वाढ ठरली आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या खरेदीविक्रीच्या व्यवहारांमधली तेजी यामुळे बाजार सद्यस्थितीतून आणखी सावरेल, अशी अपेक्षा सध्या तरी दिसते आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ लक्षात घेतली तर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय सध्या तरी नाही. दुसरीकडे डॉलरसमोर सतत नांगी टाकणाऱ्या रुपयाचा मुद्दा. भारतीय चलनमूल्याचे सततचे होत असलेले अवमूल्यन सावरण्यासाठी सरकारने दोन महिन्यांत दोनदा आयातशुल्क वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आयात घटल्यास रुपया स्थिरावण्यास काहीशी मदत होईल आणि तिसरा प्रश्न भारताबाहेर चाललेल्या परकीय गंगाजळीचा. आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीबद्दल फारच सजग असल्याने बाजारातून पैसा काढून घेण्यास सुरुवात करतात. मात्र, बाजार यातून लवकरच सावरेल, अशी शक्यता सध्या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ज्याप्रमाणे जागतिक मंदीचा भारतावर फारसा परिणाम जाणवला नाही, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजाराचे तितकेसे पडसाद भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावर पडण्याची फारशी चिन्हे नाहीत. सणासुदीच्या दिवसांत बाजारात चौफेर खरेदी दिसून येते. गुंतवणूकदार चांगला परतावा देणाऱ्या शेअर्सवर नजर ठेवून असतात. त्यातही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता बाजारावर फार काळ मंदीचे सावट राहणार नाही, याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या विकासदरावर दाखविलेला विश्वास असो वा जागतिक पातळीवरील अर्थविश्लेषकांनी भारताच्या घोडदौडीविषयी केलेली सूचक वक्तव्ये असो. शेअर बाजार लवकरच सावरेल, अशी सद्यस्थितीवरून तरी अपेक्षा आहे.
 

इतिहासजमा होणार मुंबईची ‘शान’

 

बेस्टची ‘बेस्ट’ बस म्हणजे ‘डबलडेकर’ बस, २०२३ पर्यंत रस्त्यावरून नामशेष होण्याची शक्यता असल्याची बातमी गेल्या आठवड्यातच पसरली आणि मुंबईकरांच्या डोळ्यासमोरून डबलडेकर बसशी जोडलेल्या आठवणींचा पट सरकून गेला. अगदी सिनेमापासून ते पर्यंटकांचे आकर्षण ठरलेल्या या डबलडेकर बसच्या निरोपाच्या बातमीने मुंबईकरांच्या काही आठवणी निश्चितच जाग्या झाल्या असतील आणि वाईटही वाटले असेल. मुंबईच्या रस्त्यावरून जिथे माणसाला चालण्याची पंचाईत तिथे इतक्या मोठ्या आकाराचे वाहन चालविणाऱ्यांचे कौतुकही वाटते. १९९३ मध्ये डबलडेकर बसची संख्या ही ८८२ होती. त्यानंतर बेस्टने या बसच्या संख्येत कपात करत केवळ १२० वाहने शिल्लक ठेवली. शिवाय तोट्यात चाललेला कारभार हाकणाऱ्यांना ही डबलडेकर बस आता पांढरा हत्ती वाटू लागला असेल. यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील वातानुकूलित बसबद्दलही असाच निर्णय घेण्यात आला. त्यावेळीही असेच कारण देण्यात आले. मात्र, शेजारची नवी मुंबई महापालिका आजही त्यांच्या वातानुकूलित गाड्या मुंबई महानगर परिक्षेत्रातून चालवते आणि तिचे तिकीटही सामान्यांना परवडणारे आहे. मात्र, बेस्टने ताफ्यातील एका एका वाहनाला इतिहासजमा करण्यात आणि खर्च वाढत असल्याचे कारण पुढे करून नांगी टाकण्यात जास्त धन्यता मानली. काळाप्रमाणे बदलणे उत्तम मात्र, नवे काही आत्मसात करण्यापेक्षा आहे ते प्रकल्प गुंडाळणे याशिवाय नव्याने काही बेस्टच्या इतिहासात आजवर झालेले दिसत नाही. सीएनजीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय असो किंवा तोट्यात चाललेल्या फेऱ्यांबाबतचा विचार असो, याकडे लक्ष देणे सध्यातरी गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेली मासिक पासची सुविधा, ई-तिकिटांचा तुटवडा यामुळे सेवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावला आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास बेस्टच इतिहासजमा होईल, अशी भीती मुंबईकरांना आहे. मुंबईतील प्रवास हा रेल्वे आणि बेस्टशिवाय अपूर्णच आहे. रिक्षा-टॅक्सीवाल्यांची मनमानी यातून दिलासा देण्यासाठी हे दोनच स्वस्त पर्याय मुंबईकरांसमोर असतात. मेट्रोच्या जाळ्याची व्याप्ती अजूनही तितकीशी झालेली नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्याच्या अर्थसंकल्पात ७२० कोटींची तूट प्रस्तावित आहे. इतक्या मोठ्या तोट्यातून सावरण्यासाठी उपाययोजना न केल्यास डबलडेकर बसप्रमाणे बेस्टही नामशेष होण्याच्या मार्गावर येईल, ही भीती त्यामुळेच व्यक्त केली जात आहे.

 
 - तेजस परब
  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/