चला, अंधांना डोळस करूया...
महा एमटीबी   14-Oct-2018दृष्टिहीन लोकांना आपल्या सारखंच जग न्याहाळता यावं आणि त्यांनाही डोळसपणे जीवनदर्शन करता यावं व त्यांना एक नवी जीवनदृष्टी मिळावी, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ‘नेत्रदान’ करण्याचा संकल्प करूया. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.

 

मित्रहो, तुम्हा-आम्हाला डोळे आहेत, चांगली दृष्टी आहे. त्याद्वारे आपण सार्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. मनमुराद आनंद लुटू शकतो. पण ज्यांना डोळे नाहीत, दृष्टी नाही, त्यांचा कधी आपण विचार केला आहे का? तात्पर्य, त्यांचादेखील आपण सामाजिक कर्तव्यबुद्धीने विचार करायला हवा. कारण, तेही समाजाचे अविभाज्य घटक आहेत. दृष्टिहीन लोकांना आपल्या सारखंच जग न्याहाळता यावं आणि त्यांनाही डोळसपणे जीवनदर्शन करता यावं व त्यांना एक नवी जीवनदृष्टी मिळावी, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ‘नेत्रदान’ करण्याचा संकल्प करूया. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. पांढरी काठी घेऊन रस्त्यावर चालणारी व्यक्ती ही अंध आहे याचं सामाजिक भान ठेवून त्याला मदतीचा हात देणं, हा एक कर्तव्याचा भाग आहे, हे लक्षात ठेवावे. जागतिक पातळीवर दृष्टिहीन लोकांची संख्या पाहता, त्यातील २० टक्के लोक एकट्या भारतात आहेत. अशा गंभीर जागतिक प्रश्नावर रामबाण उपाय म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकाने नेत्रदान करण्यास स्वयंस्फुर्तीने पुढे येणं व ही काळाची गरजदेखील आहे. जगात सुमारे १८० दशलक्ष लोक दृष्टिहीन असून, त्यातील जवळ जवळ ३५ दशलक्ष लोक भारतात आहेत. जगातील सुमारे ९० टक्के अंध हे विकसनशील देशांमध्ये राहणारे आहेत. वार्धक्य, बदलती जीवनशैली, गरिबी, निरक्षरता, मानवी विकासाचा अभाव, सामाजिक मागासलेपणा, अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता या प्रमुख गोष्टी अंधत्वाच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात नमूद केलं आहे.

 

जागतिक पातळीवर ‘अंधत्व’ या समस्येवर मात करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक संस्था (आयएपीबी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) यांनी संयुक्तपणे ‘२०२० व्हीजन’ हा कार्यक्रम राबवून, प्रत्येकाला ‘दृष्टीचा अधिकार’ ही संकल्पना साकार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भारतासह ४० देशांनी योगदान देण्याची तयारी दर्शविली, ही उल्लेखनीय बाब आहे. खरं तर, भारताच्या खालोखाल दक्षिण आफ्रिका व चीन या देशद्वयामध्येही अंधत्वाची समस्या लक्षणीय आहे. वैश्विकस्तरावर जनजागृती करून अंधत्वाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी व ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. जगातील लहानमोठ्या सर्वच देशांनी वैश्विक कर्तव्य या नात्याने या मोहिमेला यशस्वी करण्यात कटिबद्ध व्हावे, हे अपेक्षित आहे. प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्याच्या मनातील अंध म्हणून न्युनगंडाची भावना घालविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारनेही नेत्रचिकित्सा व कॅटरॅक्टसवर अद्ययावत उपचारपद्धती या बाबींवर भरीव आर्थिक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. शासनयंत्रणेने अंधत्व मिटविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास अंधत्व निर्मूलन अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

 

अंधांसाठी प्रत्येकाने सहानुभूतीपेक्षा स्वानुभूतीची भूमिका अवलंबिली पाहिजे. स्वत:चे डोळे पट्टीने बांधून काही वेळ जगायची अनुभूती घ्यावी, म्हणजे त्यातील गांभीर्य कळून येईल. अंध, अपंग, मतिमंद वा मूकबधिरांना गुणदोषांसह स्वीकारून त्यांना आपलसं करणं यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. अंधांना सामाजिक जाणिवेतून रस्ता ओलांडताना मदत करणे, रेल्वे-बसमध्ये बसण्यास आपली जागा देणे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे, जीवनाशी निगडीत विभिन्न विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणे, एनकेनप्रकारे त्यांचे मनोबल वाढविणे या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात वावरताना करायला पाहिजेत. इतकेच नव्हे तर, एक पाऊल पुढे टाकून एखाद्या अंध व्यक्तीशी डोळस व्यक्तीचा विवाह करून देऊन त्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमय करणं हे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनात करू शकतो. आजच्या घडीला अंधत्वाची समस्या मिटविण्यासाठी नेत्रदान ही मोहीम लोकचळवळ होणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मानव म्हणून जीवंतपणी अनेकप्रकारे पुण्यकर्म करीत असतो, हे कौतुकास्पद आहे. तथापि, मृत्यूनंतरही नेत्रदान करून आपण आणखी एका पुण्यकर्मात भर टाकू शकतो. म्हणून ही संधी दवडू नका. यासाठी नेत्रदानाकरिता आधीच इच्छापत्र भरून द्या, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर आपली नेत्रं दुसर्या अंधव्यक्तीला दान देऊन त्याला नवीन दृष्टी देता येईल. चला तर, नेत्रदान करून अंधत्वाची समस्या मिटविण्यास वचनबद्ध होऊया.

 

- रणवीर राजपूत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/